Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 9 February, 2009

गोवा विद्यापीठाचापदवीदान समारंभ

जनरल रॉड्रिगीस, रवींद्र केळेकर, डॉ. माशेलकर सन्मानित

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - "आपली शैक्षणिक व्यवस्था अजूनही वसाहतींच्या पदचिन्हांवर चालली आहे. ब्रिटिश राजवट येण्यापूर्वी भारतात भिकारी नव्हते, चोर नव्हते. त्यामुळे भारतावर सत्ता गाजवायची असेल तर येथील व्यवस्थेवर घाव घालणे अत्यावश्यक होते. त्यामुळे त्यांनी अशी शैक्षणिक व्यवस्था तयार केली की ज्याद्वारे त्यांना त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचणे सहज शक्य होईल. दुर्दैव म्हणजे आपण त्यांनी घातलेल्या पायंड्याचाच अजूनही अवलंब करत आहोत,' असे सडेतोड प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल तथा निवृत्त लष्करप्रमुख जनरल सुनित रॉड्रिगीस यांनी आज येथे केले. गोवा विद्यापीठाच्या २१ व्या पदवीदान समारंभात मानद डी. लिट. पदवी स्वीकारताना ते बोलत होते.
"एनआयओ' प्रेक्षागृहात आयोजिलेल्या २१ व्या पदवीदान समारंभात जनरल रॉड्रिगीस यांना गोव्याचे राज्यपाल डॉ. एस एस. सिद्धू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्ञानपीठ विजेते साहित्यिक रवींद्र केळेकर आणि द्रष्टे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचाही गौरव करण्यात आला. राज्याच्या या दोन्ही अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या सुपुत्रांनाही राज्यपालांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आपली मानद उपाधी आपल्या आईस समर्पित करून डॉ. माशेलकर यांनी सांगितले की, आतापर्यंत त्यांना २७ मानद उपाध्या प्राप्त झाल्या आहेत. आजची उपाधी त्यांच्यासाठी सर्वांत प्रतिष्ठेची आहे. कारण त्यांना त्यांच्या जन्मभूमीत प्राप्त झाली आहे.
अणुकरारावर झालेल्या स्वाक्षऱ्या म्हणजे भारताने त्याच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी जिंकलेले तिसरे मोठे युद्ध असल्याचे डॉ. माशेलकर यांनी नमूद केले.
गेल्यावर्षी अमेरिकेसोबत झालेल्या अणुकरारामुळे भारताला उर्जा विकसित करण्याची संधी मिळाली. २१ व्या शतकात ज्यावेळी अन्य देश विविध क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करत असतील त्यावेळी भारत माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक महासत्ता म्हणून पुढे येईल. माहिती आणि तंत्रज्ञान भारतीय तंत्रज्ञानावर अवलंबून असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी गोवा विद्यापीठाकडून भाषा विभागात ५ डॉक्टरेटस, समाजशास्ज्ञात ४, नेचरल सायन्समध्ये ५ जीवन आणि पर्यावरणात २५ तर वाणिज्य क्षेत्रात ३ उपाधींचे वितरण झाले. गोव्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक विषयांमध्ये पूर्ण संशोधनाची गरज असल्याचे मत यावेळी राज्यपाल एस. एस. सिद्धू यांनी व्यक्त केले.

No comments: