Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 12 February, 2009

कचरा प्रकरणी सरकारचा पुढाकार

दिल्लीच्या कंपनीस प्रकल्प सादरीकरणासाठी निमंत्रण

मडगाव, दि. ११ (प्रतिनिधी) : गोव्यातील कचराप्रश्नी तोडग्यासाठी आपण दिल्लीच्या आय.एल.एफ.एस. नावाच्या आस्थापनास त्यांच्याकडील कृतीयोजनेच्या सादरीकरणासाठी गोव्यात येण्याचे निमंत्रण दिले आहे; तसेच या विषयावरील सभागृह समितीची बैठकही बोलावली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे गेली काही वर्षे सरकारच्या व पर्याये जनतेसाठी डोकेदुखी ठरलेल्या या मुद्यावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हजेरी प्रकरणावरून मडगाव पालिकेत उद्भवलेला वाद कामत यांच्या हस्तक्षेपामुळे मिटला. त्यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनी सोनसोडोचे पुढे काय, अशी विचारणा केली असता त्यांनी ही माहिती दिली .
ते म्हणाले, नुकत्याच दिलेल्या दिल्ली भेटीत आपण स्वतः त्यांच्या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली व त्यांनी विकसित केलेल्या प्रक्रिया पध्दतीने आपण प्रभावीत झालो. या कंपनीचे एकूण तीन ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत. काही ठिकाणी तर ही कंपनी स्वतः कचरा गोळा करण्याचे कामही करते. अशी पध्दत गोव्यासाठी मदतरूपी ठरू शकते व त्यासाठीच आपण त्यांना सादरीकरणासाठी निमंत्रण दिले आहे.
सदर कंपनी स्वतः च प्रकल्प उभारते व तिला कचऱ्यासंदर्भात टनामागे पैसे द्यायचे अशी पध्दत तेथे सुरू आहे. त्यांच्या अटी व शर्तींबाबत आपण काहीही बोलणी केलेली नाहीत. सादरीकरणावरच पुढील सारे अवलंबून असेल . त्यांच्या गोवा भेटीची तारीख अद्याप ठरलेली नाही अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यात कचराप्रश्न जटिल बनत चाललेला असतानाही सभागृह समितीची बैठक हल्ली झालेली नाही व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या समितीची बैठक बोलावण्याची मागणी सातत्याने केली आहे.

No comments: