Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 14 February, 2009

वेतनवाढीची मागणी मालकांनी फेटाळली

कामगार खवळले

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) - किमान वेतन वाढीस कंपन्यांचे मालक तयार होत नसल्याने अखेर आज वेतन वाढीवर निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करून दोन महिन्यात निर्णय कळवण्याचे आश्वासनानंतर किमान वेतनवाढ मंडळाची बैठक आटोपती घेण्यात आली. या बैठकीत कंपन्यांचे प्रतिनिधी "दहशतवाद्यां'प्रमाणे वागल्याचा आरोप "आयटक'चे नेते ख्रिस्तिफोर फोन्सेका यांनी केला. तसेच या दुटप्पी धोरणामुळे कामगार सरकारवर खवळले असून याला
कामगार मंत्री ज्योकिम आलेमाव जबाबदार असल्याचे यावेळी श्री. फोन्सेका म्हणाले.
" हे सरकार निर्णय घेत नसून केवळ समित्यांची स्थापना आणि वेळकाढू धोरण अवलंबून सामान्य कामगारांची पिळवणूक करीत आहे. तसेच कंपन्या गुलामासारखी वागणूक कामगारांना देऊ इच्छितात, अशी प्रखर टीका फोन्सेका यांनी केली. आज सकाळी सचिवालयात मंत्री ज्योकीम आलेमाव यांच्या अध्यक्षतेखाली कंपन्यांचे व्यवस्थापन व कामगार संघटनांच्या नेत्यांत झालेल्या या बैठकीत किमान वेतनवाढीसंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ही बैठक सुरू असताना पणजी बसस्थानकाच्या समोर "आयटक'च्या कामगारांनी मोर्चा काढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सरकारने किमान वेत २५० रुपये वेतन वाढीची मागणी मान्य न केल्यास गोव्यातील सर्व कामगार रस्त्यावर उतरतील, असा इशारा राजू मंगेशकर यांनी दिला.
दरम्यान, आजच्या बैठकीत उद्योजकांनी मंदीचे कारण पुढे करून वेतनवाढ शक्य नसल्याचे स्पष्ट केले. प्रस्तावित अधिसूचनेत रु. १५० असे निश्चित केलेले किमान वेतन हे अत्यल्प असून अकुशल कामगारांना २२५, अर्धकुशल कामगारांना २५० रु., कुशल कामगारांना ३०० रु., व अतिकुशल कामगारांना ३५० रु. किमान वेतन दिले जावे, अशी कामगार संघटनांची मागणी आहे. सध्या १०३ रुपये रुपये किमान वेतन असून गेल्या सात महिन्यात ४० टक्के महागाई वाढल्याने कामगारांना जगणे मुश्कील होत असल्याचे फोन्सेका म्हणाले.

No comments: