Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 11 February, 2009

उत्तर गोव्याबाबत राष्ट्रवादी ठाम, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी

पणजी, दि.५ (प्रतिनिधी): आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उत्तर गोव्याची जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. एका कार्यक्रमासाठी गोव्यात आलेल्या राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते तारिक अन्वर यांची भेट घेऊन गोव्यातील राष्ट्रवादी नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर गोव्यातील जागा राष्ट्रवादीलाच मिळावी, यासाठी केंद्राकडे जोरदार मागणी केली जाणार असल्याचे अन्वर यांनी कबूल केले असून येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी जाहीर करण्याची हमी अन्वर यांनी दिली असल्याचे खास सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष उत्तरोत्तर आणखी टोकदार होण्याचे संकेत मिळाले आहेत.
या निवडणुकीत आपल्यालाच उमेदवारी मिळावी अशी मागणी करणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनीही आता कॉंग्रेसला पदच्युत करण्यासाठी "हाय कमांड'ने निवडलेल्या उमेदवारासाठीच सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे मान्य केले आहे. आज दुपारी येथील एका पंचतारांकित हॉटेलात झालेल्या या चर्चेवेळी प्रदेशाध्यक्ष डॉ. डिसोझा, राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटाचे नेते जुझे फिलिप डिसोझा, पर्यटनमंत्री मिकी पाशेको, संसदीय सचिव नीळकंठ हळर्णकर, कार्मो पेगादो, युवा अध्यक्ष राजन घाटे, प्रा. सुरेंद्र शिरसाट, एडव्हीन फर्नांडिस व अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इक्बाल शेख हजर होते.
उत्तर गोव्याच्या उमेदवारीसाठी सहा जणांची संभाव्य यादी बनवण्यात आली असून त्यात डॉ. विल्फ्रेड डिसोझा, संगीता परब, फातिमा डिसा, राजन घाटे, सुरेंद्र फुर्तादो व ऍड. अविनाश भोसले यांच्या समावेश आहे. गेल्या दि. १४ जानेवारी रोजी कांदोळी येथील "किंगफिशर व्हिला'मध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत ही यादी बनवण्यात आली होती. परंतु, ज्यांनी दोन वर्षापूर्वी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे, त्यांनाच उमेदवारी दिली जावी, त्याचप्रमाणे उत्तर गोव्यातील उमेदवार हा बहुजन समाजाचा उमेदवार असावा, अशी मागणी गोव्यातील नेत्यांनी पक्षाकडे केली आहे. उत्तर गोव्यात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि विद्यमान सरकारात आरोग्य मंत्री असलेले विश्वजित राणे तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उमेदवार तथा सरकारमधील वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांची मदत घेण्याचेही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी गेल्या महिन्यात शरद पवार यांनी या दोन्ही मंत्र्यांबरोबर एका गुप्त बैठकही घेतल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

No comments: