Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 8 February, 2009

आग्नेल फर्नांडिस यांना अटक करा कळंगुटवासीयांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) : कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांच्या गुंडगिरीसमोर सरकारने हात टेकले आहेत. रेइश-मागूशचे पंच फ्रान्सिस सेर्राव यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातही त्यांचा हात आहे. सरकारने ताबडतोब या गुंडगिरीचा बंदोबस्त केला नाही तर रस्त्यावर उतरू,असा इशारा आज कळंगुटवासीयांनी दिला.
आज पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रेइश मागूशचे पंच सदस्य फ्रान्सिस सेर्राव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. गुन्हेगारांना अटक केली नाही तर कळंगुटवासीयांना आपला इंगा दाखवावा लागेल,असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी कळंगुटचे माजी आमदार तथा मंत्री सुरेश परूळेकर,कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा,रेइशमागूशच्या सरपंच सुश्मीती पेडणेकर,उपसरपंच वीरेंद्र शिरोडकर,पंच सदस्य सुदेश गोवेकर,मोहन कळंगुटकर,नेरूल नागरिक कृती समितीचे अध्यक्ष मोहन कळंगुटकर,नेरूल-वेरे कृती समितीचे अध्यक्ष गजानन नाईक व इतर नागरिक उपस्थित होते.
कळंगुटचे सरपंच सिक्वेरा यांच्यावर भर पंचायत कार्यालयात हल्ला झाला त्याचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही. कळंगुटचे पंच लक्ष्मण परब यांच्यावरही हल्ला झाला त्या चौकशीचाही पत्ता नाही व आता फ्रान्सिस सेर्राव यांना जीवे मारण्याचे प्रयत्न झाला. या राज्यात कुणाचा पायपोस कोणाच्याही पायात राहिलेला नाही. मुख्यमंत्री जणू कठपुतळी बनले आहेत. विद्यमान सरकारकडून न्याय मिळत नसल्याने आता मानवी हक्क आयोगाकडे दाद मागणे अपरिहार्य बनल्याचे सांगण्यात आले.
आग्नेल फर्नांडिस यांच्या सर्व भानगडींची गुन्हा अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी,अशी मागणी करणारे निवेदन राज्य व केंद्र सरकारला सादर केले जाईल,असेही सिक्वेरा यांनी यावेळी सांगितले. आग्नेल हे सध्या कॉंग्रेसलाच भारी ठरत आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांना या गोष्टीची कल्पना दिली तरी ते काहीही करीत नाहीत, गृहमंत्र्यांना तर याबाबत सगळी माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री फक्त आश्वासने देतात. या स्थितीत या न्याय कुणाकडे मागावा,असा सवालही यावेळी करण्यात आला.
विधानसभा सभागृहात केलेल्या आरोपांना आव्हान देण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे आग्नेल यांना एवढीच हिंमत असेल तर त्यांनी भर जनतेसमोर हे आरोप करावेत,असे आव्हान सुरेश परूळेकर यांनी दिले. पंच सदस्य भष्टाचार प्रकरणांत गुंतले आहेत व त्यामुळे त्यांना कुणीतरी मारणारच, असे विधान आग्नेल यांनी सभागृहात केले. पंच सदस्य भष्टाचार करीत असतील तर त्यांना जाब विचारण्याचा अधिकार त्यांना निवडून दिलेल्या लोकांना आहे व त्यासाठी ग्रामसभेचे व्यासपीठ आहे. येथे बुरखाधारी गुंडांकडून हल्ला झाल्याने ही चिंतेची बाब आहे,असेही परूळेकर म्हणाले.
दरम्यान,रेइशमागूशचे उपसरपंच तथा युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र शिरोडकर यांनी, आग्नेल यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना त्यांचा तोल गेल्याची टीका केली. फ्रान्सिस सेर्राव यांनी "एफआयआर'दाखल केला असून त्यात आग्नेल फर्नांडिस यांच्यावर संशय व्यक्त केला होता. आपण वेश्याव्यवसायात गुंतल्याचा आरोप करणारे आग्नेल हे रात्री अपरात्री "पब'व डिस्कोबारमध्ये काय करतात हे लोकांना ठाऊक आहे,अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. विविध विकासकामांना अडथळा निर्माण केला जात असल्याने पंचायत कामांवरही परिणाम झाल्याचा तपशील पक्षाध्यक्षांना सादर केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
हल्ल्याचे मूळ "कॅसिनो'परवाना
दरम्यान, फ्रान्सिस सेर्राव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे मूळ कॅसिनोला दिलेला परवाना असल्याची माहिती ऍड.जतीन नाईक यांनी दिली.पूर्वीच्या पंचायत मंडळाने वेरे येथे या कॅसिनोला परवाना दिला होता.सदर पंचायत मंडळावर अविश्वास ठराव दाखल करून नवीन पंचायत मंडळाने हा परवाना मागे घेतला. हा परवाना रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्यानेच फ्रान्सिस सेर्राव यांच्यावर हा हल्ला झाला,असेही यावेळी सांगण्यात आले.
"नार्को' व "ब्रेनमेपिंग' करा
कळंगुट मतदारसंघात झालेल्या पंच सदस्यांवरील हल्ल्यांत आग्नेल फर्नांडिस यांचा हात असून त्यांची नार्को व ब्रेनमेपिंग चाचणी घेतल्यास सत्य उजेडात येईल,अशी मागणी सरपंच सिक्वेरा यांनी केली.

No comments: