Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 14 February, 2009

लालूंची सुपर फास्ट "निवडणूक एक्स्प्रेस'!

७० हजार कोटी रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर


- सर्व गाड्यांच्या प्रवास भाड्यात २ टक्के घट
- मेल-एक्स्प्रेसच्या भाड्यात १ रुपया कपात
- रेल्वेला ९० हजार कोटींचा नफा
- ६ बुलेट ट्रेनचा प्रस्ताव
- पाच वर्षांत ८ टक्के विकास दर राखला
- ४३ नवीन गाड्यांची घोषणा
- रेल्वे अपघात घटल्याचा दावा
- आगरतळा रेल्वेच्या नकाशावर
- ठाणे व भागलपूरला नवा विभाग


नवी दिल्ली, दि. १३ - लालूप्रसाद यादव यांनी आज आपले शेवटचे रेल्वे अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकाच्या रूपातील लालूंची निवडणूक एक्स्प्रेस सुपरफास्ट धावली. अंदाजपत्रक सादर करताना त्यांनी सर्वच लोकप्रिय घोषणा केल्या. सर्वच गाड्यांच्या प्रवासी भाड्यात केलेली दोन टक्क्यांची कपात, ४३ नवीन गाड्यांची घोषणा, गेल्या आर्थिक वर्षांत रेल्वेला झालेला ९० हजार कोटी रुपयांचा नफा आदी अनेक वैशिष्ट्ये आज लालूंनी सादर केलेल्या अवघ्या चार महिन्यांच्या रेल्वे अंदाजपत्रकाची ठरली!
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राष्ट्रीय पक्षांसोबतच विविध प्रादेशिक पक्षांनीही या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रातील संपुआ सरकारचे शेवटचे रेल्वे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करण्यात आले. निवडणुका तोंडावर आहेत आणि रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव त्याचा फायदा घेणार नाहीत, असे होणे शक्यच नव्हते. म्हणूनच की काय आजचे रेल्वे अंदाजपत्रक पाहाता तो संपुआ सरकारचा जाहीरनामा तर नाही ना, अशी शंका येते.
लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची आचारसंहिताही येत्या काही दिवसांत लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपुआ सरकारला येत्या चार महिन्यांपर्यंतचा काळ काढायचा असल्यामुळे हे हंगामी अंदाजपत्रक आज सादर करण्यात आले. दुपारी १२ वाजता रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांचे रेल्वे बजेटवरील भाषण सुरू होणार होते. मात्र, ते सुमारे १५ मिनिटे विलंबाने सुरू झाले. आपल्या सुमारे ४५ मिनिटांच्या भाषणात लालू प्रसादांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या खास शैलीत आणि मध्येच केव्हा तरी शेरोशायरी करून लालूंनी आपले हे बजेट सादर केले. एकदोन वेळा विरोधी बाकांवरील सदस्यांनी लालूंच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी तो आपल्या शैलीने दूर केला. लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनीही यासाठी त्यांना सहकार्य केले.
मी नुकताच जपान, जर्मनीचा दौरा करून आलो आहे. तेथे मी ताशी ३०० किमी वेगाने चालणाऱ्या बुलेट ट्रेन बघितल्या आहेत. अशा बुलेट ट्रेन भारतातही सुरू करण्याचा विचार आल्यामुळे त्यासाठी सहा मार्गांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली आहे. या मार्गांवरील यशस्वीतेनंतरच पुढील मार्गांचा विचार केला जाणार असल्याचेही लालूप्रसाद यांनी सांगितले. आधी रेल्वे मंत्र्यांनी यापैकी काही मार्गांचे नावे जाहीर करताच विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्यांना चिमटा काढताना पाटणाचा समावेश नाही का, असे छेडले. तेव्हा "है भाई...' असे हसत सांगून दिल्ली ते पाटणा मार्गावरील बुलेट ट्रेन चालविण्याबाबत लवकरच संशोधन सुरू केले जाईल, असे जाहीर केले. याशिवाय दिल्ली-अमृतसर, अहमदाबाद-मुंबई-पुणे, हैदराबाद-विजयवाडा-चेन्नई, चेन्नई-बंगलोर-एर्नाकुलम् आणि हावडा-हल्दिया या मार्गांवर बुलेट ट्रेन चालविण्याचा प्रस्ताव सादर करून या मार्गांच्या अभ्यासाचे काम सुरू आहे, असेही रेल्वे मंत्री म्हणाले.
रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी सर्वप्रकारच्या प्रवासी भाड्यात कपातीची घोषणा केली. साधारण पॅसेंजर गाड्यांच्या प्रवासी भाड्यात दहा किमीपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी पन्नास रुपयांच्या एका तिकिटावर एक रुपयाची सवलत दिली आहे. सर्व मेल, एक्स्प्रेस आणि साधारण व प्रवासी गाड्यांच्या द्वितीय श्रेणी, शयनयान श्रेणीच्या ५० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त तिकीट दर असलेल्या प्रवासाच्या तिकीट दरात दोन टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि कुर्सीयान वातानुकुलित भाड्यातही दोन टक्क्यांची कपात केली आहे.
रेल्वेचा वाढता विस्तार लक्षात घेता आणि मुंबईमध्ये असलेल्या दोन विभागांमध्ये वाढलेले काम पाहता ठाण्याला वेगळा विभाग देण्याची घोषणाही रेल्वे मंत्र्यांनी आज केली. ठाण्यासह भागलपूरमध्येही रेल्वेचा वेगळा विभाग राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
भारत स्वतंत्र झाल्यापासून यंदा प्रथमच पूर्वोत्तर राज्यांपर्यंत रेल्वे पोहोचविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून त्रिपुराची राजधानी असलेल्या आगरतळाला आज रेल्वेच्या नकाशावर आणण्यात आले आहे. तसेच काश्मीर खोऱ्याला रेल्वे लाईनने जोडण्याचे कामही जोमाने सुरू आहे. लवकरच अनंतनाग ते राजपंशेर या रेल्वे लाईनचे काम पूर्ण केले जाईल. नंतर बारामुल्ला, काजीगुंडपर्यंत रेल्वे लाईन वाढविली जाईल, अशी माहितीही रेल्वे मंत्र्यांनी दिली.
गेल्या आर्थिक वर्षात रेल्वेने ९० हजार कोटी रुपयांचा नफा कमाविला असून ७० हजार कोटी रुपयांचे शिल्लकीचे अंदाजपत्रक आपण सादर करीत आहोत, असे लालूंनी सांगताच सत्तारूढ बाकांवरील सदस्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची आम्ही तातडीने अंमलबजावणी केली असून त्याचा १६ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना, तसेच ११ लाख निवृत्ती वेतनधारकांना लाभ झाला आहे, असेही यादव यांनी सांगितले.
२००८-०९ या सत्रात भारतीय रेल्वेने माल व प्रवासी वाहतुकीमध्ये चांगली उपलब्धी प्राप्त केली आहे. या काळात माल वाहतुकीत ९ टक्के, तर कमाईत १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर प्रवासी वाहतुकीमुळे रेल्वेच्या उत्पन्नात १४ टक्क्यांची वाढ झाली आहे, असेही रेल्वे मंत्री म्हणाले.
दहा गरीब रथांसह ४३ नवीन गाड्यांच्या घोषणेप्रमाणेच रेल्वेमंत्र्यांनी मार्ग व दिवस वाढविलेल्या प्रत्येकी चौदा गाड्यांचीही माहिती सादर केली. गेल्या वर्षात रेल्वे अपघातात घट झाली असल्याचाही दावा याप्रसंगी त्यांनी केला. आधीच्या आर्थिक वर्षात १९४ रेल्वे अपघात झाले होते, तर गेल्या आर्थिक वर्षात ११७ अपघात झाले असल्याची माहितीही त्यांनी सादर केली.
भारतीय रेल्वेने गेल्या वर्षात केलेल्या कामांची माहिती, तसेच प्राप्त उपलब्धींची माहिती सादर करताना रेल्वे मंत्र्यांनी भविष्यातील काही योजनांचीही माहिती सादर केली. शेवटी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि संपुआ प्रमुख सोनिया गांधी यांचे सहकार्याबद्दल आभार मानून आपले अंदाजपत्रकीय भाषण आपल्याच शैलीत एक शेर सादर करून पूर्ण केले.

चौकट....
विदर्भाच्या तोेंडाला पाने पुसली!
भारतीय रेल्वेच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचे केंद्र असलेल्या नागपूर, विदर्भाच्या पदरात मात्र दोन दिवसांपूर्वीच विदर्भ दौऱ्यावर येऊन गेलेल्या लालूप्रसादांनी काहीच दान टाकले नाही. कामाचा व्याप लक्षात घेता नागपूर विभागाची मागणी रेल्वे मंत्री पूर्ण करतील, अशी अपेक्षा असताना लालूप्रसादांनी नागपुरातील दोन गाड्यांच्या मार्गाचा विस्तार व दिवसांची वाढ वगळता या क्षेत्राला काहीच दिले नाही. नुकतीच सुरू झालेली अमरावती-मुंबई ही गाडी आठवड्यातून तीन दिवसांऐवजी आता रोज धावणार आहे. तर नागपूर-गया दीक्षाभूमी पारसनाथ एक्स्प्रेसचा मार्ग वाढवून पारसनाथ मार्गे धनबादपर्यंत करण्यात आली आहे.

No comments: