Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 9 February, 2009

घराणेशाही संपविण्यासाठी हीच योग्य वेळ - मोदी

नागपूर, दि. ८ - अमेरिकेत ज्याप्रमाणे बुश आणि क्लिंटन परिवाराकडे अनेक वर्षे सत्ता असल्यामुळे जनता घुसमट अनुभवत होती. त्याप्रमाणे भारतातही एकाच घराण्याच्या वर्चस्वाने जनता गुदमरली आहे आणि जनतेला या घुस्मटीतून बाहेर पडायचे आहे. जनतेला सक्षम पर्याय म्हणून अडवानींचे नेतृत्व पुढे आले आहे. त्यांना पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटीबद्ध व्हावे असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
देशात ६१ वर्षांपैंकी ५५ वर्ष कॉंगे्रसी गोत्राचेच सरकार होते. त्यातही ३७ वर्षे एकाच परिवाराकडे सत्ता होती. तर ५ वर्ष सत्तेत न राहताही हा परिवार सरकार चालवत होता. फक्त ७ वर्ष कॉंग्रेसी गोत्राचे नसणारे अटलजी सरकार चालवित होते. ही सात वर्षे बघा आणि एरवीची ५५ वर्ष बघा आणि तुम्ही निर्णय घ्या असे आवाहन मोदी यांनी केले. एका परिवाराच्या हितासाठी कॉंगे्रसने देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.
आज या देशाला आतंकवादी कारवायांनी जर्जर केलेलेे आहे. परिणामी सामान्य माणसाचे जीवन असुरक्षित झालेले आहे. हे थांबवायचे असेल तर आतंकवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल. ही ताकद भाजपच्या नेतृत्त्वातील रा.लो.आ. सरकारच दाखवू शकते, असा विश्वास मोदी यांनी केला.
भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत आज दुसऱ्या दिवशी मांडलेल्या राजकीय ठरावावर बोलतांना केंद्र सरकार व्होट बॅंकेचे राजकारण करीत असल्याचा आरोप मोदींनी केला. मुंबईतील आतंकवादी हल्ल्यासंदर्भात या देशातला अशिक्षित माणूसही सांगेल की हा प्रकार स्थानिक मदतीशिवाय शक्य नव्हता. या स्थानिक मदतगारांपर्यंत सरकार का पोहोचू शकत नाही असा सवाल मोदी यांनी केला.
मुंबईतील हल्ल्यानंतर जगाला देशाच्या पंतप्रधानांच्या दुबळेपणाचे दर्शन घडले असा आरोप करीत पंतप्रधानांनी देशाला निराश केल्याची टीका मोदींनी केली. जगात भारतीय सन्मानाने जगू शकणार असेल तर पंतप्रधानांमध्ये दम आहे असे ठामपणे म्हणता येईल. अशी अपेक्षा व्यक्त करतांना सध्या देशात अदृश्य पंतप्रधान आहे अशी मल्लीनाथी त्यांनी केली.
भाजपला यशस्वी करा ः अडवाणी
केवळ राजकीय चातुर्याने देश चालविता येत नाही, त्यासाठी प्रामाणिकपणे काम करून प्रश्न विचार बाजूला ठेवून राष्ट्राच्या विकासाला सर्वोच्च स्थान देऊन काम केले तरच देश मोठा होतो. आम्हाला देश मोठा करायचा आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य घेऊन पुढे जायचे आहे. आणि आम्हाला सत्तेत येण्यासाठी जिंकायचे नाही तर आम्हाला भारत जिंकवायचा आहे. त्याकरीता आपण सारेच कटिबद्धच होऊ या, असे भावपूर्ण आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या नागपुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या अधिवेशनाचा समारोप आज अडवाणीच्या भाषणाने झाला. आपल्या सुमारे ४५ मिनिटाच्या भाषणात त्यांनी जुन्या जनसंघाच्या स्थापनेपासून तर आजच्या सत्तेच्या परिघात फिरणाऱ्या भाजपच्या वाटचालीचा आढावा घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत विदेशी प्रेरणास्त्रोत नसलेला भारतीय पक्ष काढायचा या हेतूने स्व. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघाची स्थापना केल्याची माहिती त्यांनी दिली. संघाची विचारधारा पूर्णपणे राष्ट्रवादावर आधारित आहे. त्याच मार्गावर मार्गक्रमण करीत आम्ही सत्ता हे केवळ साध्य न ठरवता देशहीत सर्वोतोपरी मानलेले आहे. आमची पार्टी ही नेशन फर्स्ट पार्टी आहे, असा दावा अडवाणींनी केला. भाजपला जातीयवादी ठरवणाऱ्यांचा समाचार घेत या देशात जेनुईन सेक्युलॅरिझम आणि स्यिडो सेक्युलॅरिझम अशा दोन संकल्पना अस्तित्वात असून कॉंग्रेस हा स्यिडो सेक्युलर आहे तर आमचे मात्र जेनुईन सेक्युलॅरिझम आहे, असे आग्रही प्रतिपादन यांनी यावेळी केले.

No comments: