Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 12 February, 2009

"मागण्या मान्य करा, मगच चर्चा करू'

रेजिनाल्ड यांच्या वक्तव्याचा निषेध
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) - कदंब महामंडळाला कोणत्याही परिस्थिती सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन द्यावे लागणारच आणि आम्ही ते मिळवणारच परंतु महामंडळाच्या अध्यक्षांनी कामगारांच्या काळजावर घातलेल्या घावाची जखम कधीही भरून येणार नाही. यापूर्वी स्व. बाबय प्रभू, मनोहर पर्रीकर असे नेते या मंडळाचे अध्यक्ष होऊन गेले, त्यांनी कधीच कामगारांविषयी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही अशा तीव्र शब्दात कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी कदंब मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
"वेतन वाढीची मागणी करण्यापूर्वी महामंडळाचा महसूल वाढवा' तसेच "महामंडळाला नफ्यात नेण्यासाठी कामगार काहीही करीत नाही' असे विधान करणाऱ्या रेजिनाल्ड यांच्या विरोधात कामगारांमध्येही तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यावेळी अध्यक्ष रेजिनाल्ड यांच्यावर प्रतिहल्ला चढवताना श्री. फोन्सेका म्हणाले की, त्यांनी आपल्या मर्यादेचे उल्लंघन केले असून कामगारांच्या काळजावर घातलेली जखम कधीही पुसता येणार नाही. कदंब महामंडळ हे सर्वांत मोठे महामंडळ आहे. याठिकाणी अडीच हजार कामगार आपली सेवा बजावत आहेत. या कामगारांना प्रोत्साहन देण्याचे सोडून त्यांचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप यावेळी श्री. फोन्सेका यांनी केला. कदंब महामंडळ केवळ नफ्यातच चालवायचे असल्यास "कदंब सेवा सामान्य जनतेच्या सेवेस' हे घोष वाक्य मंडळाला बदलावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
आज कामगार आयोगासमोर झालेल्या चर्चेत महामंडळातर्फे कामगारांच्या मागण्यांवर विचार व निर्णय घेण्यासाठी खास समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. या समितीत मंडळाचे अध्यक्ष तसेच अन्य व्यवस्थापकीय संचालक आहेत. महामंडळ नफ्यात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी चर्चेसाठी यावे, अशी मागणी यावेळी मंडळाने ठेवली आहे. याला जोरदार विरोध करून "आधी आमच्या मागण्या पूर्ण करा, नंतर कोणत्याही चर्चेला आम्ही तयार आहोत' अशी भूमिका कदंब कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. महामंडळाने वेळकाढू धोरण न अवलंबता त्वरित यावर तोडगा काढावा अशी मागणी श्री. फोन्सेका यांनी केली आहे.
दरम्यान, या विषयीचा पुढील निर्णय १७ रोजी कामगार आयुक्तालयात होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे.

No comments: