Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 13 February, 2009

बोरीत मिनी बसला अपघात

पाच गंभीर, दहा जखमी
फोंडा, दि. १२ (प्रतिनिधी) - टॉपकोला बोरी येथे आज (दि.१२) संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास मडगाव-फोंडा मार्गावरील मिनी बसला (जीए ०१ डब्लू ४५०१) झालेल्या अपघातात पंधरा जण जखमी झाले असून त्यातील पाच गंभीर जखमींना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. सदर बस बेदरकारपणे चालवली जात होती, असे प्रवाशांकडून सांगण्यात आले.
गंभीर जखमींमध्ये आइस्क्रीम विक्रेता पारस मांगजी गुजर (बोरी), संगीता वासुदेव नाईक (वळवई), स्वेता नाईक (ढवळी), सुरेश राम (रायबंदर) आणि धनेश पंडित (रायबंदर) यांचा समावेश आहे.
जखमीमध्ये शमशाद बी (म्हार्दोळ), पंढरीनाथ पी. कुडतरकर (वारखंडे फोंडा), यशोदा गांवकर (वळवई), संजना केरकर (कुंकळ्ये म्हार्दोळ), वासंती बोरकर ( बोरी), माया गोकुळदास सतरकर ( राय सालसेत), रोझी जुझे मास्कारेन्हस ( ओपा खांडेपार), सुखदा सुभाष सिनारी (राय सालसेत), रेमेडियन डिसोझा ( शिरोडा), किशनलाल महादेव गोडकीया (गिरी म्हापसा) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.
बस भरधाव वेगाने फोंड्याला येत होती. बोरी येथे "टॉपकोला'हून बोरी सर्कलकडे जाणाऱ्या विरुद्ध दिशेला असलेल्या एका आइस्क्रीम विक्रेत्याच्या गाड्याला आणि विक्रेता पारस गुजर याला बसने धडक दिली. त्यानंतर विरुद्ध दिशेच्या आधी एका दुचाकी वाहनाला व नंतर रस्त्याच्या बाजूच्या एका माडाला जोरदार धडक दिल्यानंतर बस बाबनी नाईक यांच्या घरावर कलंडली. यात आइस्क्रीमच्या गाड्याचा चुराडा झाला. तसेच श्री. नाईक यांच्या घराच्या छताचे नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक मंजुनाथ देसाई, वाहतूक पोलीस निरीक्षक सलीम शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातील जखमींना फोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ आणण्यात आले. गंभीर जखमींवर प्रथमोपचार करून बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठविण्यात आले आहे. मिनी बसच्या चालक संजय लक्ष्मण दांडे (बेतोडा) याला फोंडा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. उपनिरीक्षक संजय दळवी, हवालदार जे. फर्नांडिस, हवालदार सुरेंद्र कोमरपंत व इतरांनी पंचनामा केला. सदर बस वेगात होती. तसेच तिचा चालक बस चालवताना मोबाईलवरून संभाषण करीत होता, असे सांगण्यात आले. जादा प्रवासी मिळविण्यासाठी बस चालकांत स्पर्धा लागते. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडतात, असेही नागरिकांनी सांगितले.
बोरी गावातील वाढत्या वाहतुकीमुळे टॉपकोला, बोरी पंचायत या भागात नेहमी अपघात होता. या भागातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी बोरी पंचायतीने पोलीस खात्याकडे केली आहे. ही माहिती सरपंच वीरेंद्र सावकार यांनी दिली. तसेच साकव बोरी , टॉपकोला येथे दुपारच्या वेळी विद्यालय सुटल्यानंतर मुलांची गर्दी होते. त्यावेळी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस तैनात करण्याची गरज आहे, असेही सरपंचांनी सांगितले.

No comments: