Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 8 February, 2009

भाषेच्या अस्तित्वासाठी संघर्ष हवा डॉ. यशवंत पाठक यांचे प्रतिपादन माशेल साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन

माशेल, ता. ७ प्रतिनिधी : भाषेला जेव्हा मातृभाषा असे संबंधतो. त्यावेळी भाषेच्या मुळाशी मातृसत्व असते ते सत्व जपून त्याचे सवर्धन व जतन करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागत आहे. ज्या भाषेत आज महाराष्ट्रातील गावात आणि गोमंतकात लिहिले जाते तीच मराठी भाषा असल्याचे मानले जाते. तथापि, खरी मराठी भाषा जर आम्हाला पाहायची असेल संत ज्ञानेश्वरांच्या काळात जावे लागेल. ज्या भाषेमुळे आत्मानुभूतीची जाणीव होते आणि त्यानंतर शब्द जे शब्द येतात तीच मराठी भाषा होय, असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. यशवंत पाठक यांनी माशेल येथे आयोजित २७ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष पु. शि. नार्वेकर, पूर्वाध्यक्ष श्रीराम कामत, स्वागताध्यक्ष डॉ. विठ्ठल ठाकूर, कार्याध्यक्ष ऍड. विनायक नार्वेकर, प्रमुख कार्यवाह, प्रेमानंद नाईक तसेच गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष सुरेश नाईक उपस्थित होते. येथील मराठी साहित्य सहवास आयोजित गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या २७ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे श्री. पाठक यांच्या हस्ते करण्यात आले.
भाषेचा खरा नायक सर्वसामान्य माणूस आहे. या सर्वसामान्यांच्या नसानसात मराठी भिनली आहे. मराठीचा आवाका बघता विज्ञानात, नागरिकशास्त्रात तसेच भाजी बाजारांतही बोलता आले पाहिजे. भाषा वर्तमानात जगत असते. ज्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नसते ते भूतकाळात जातात. मराठी हा आमचा श्वास आहे. कारण ती जाणिवेची खोली असलेली भाषा आहे. शब्द पुस्तकात असतात. पण अनुभव बाहेर मिळतो. त्याची जाणीव समाजात मिळते. भाषा ही बोलण्याच्या अनुभवाची घटक आहे. त्यातून निर्माण झालेले साहित्य माणसांना प्रगल्भ बनविते. दु:खावर मात करते. मराठीच्या संघर्षासाठी अशी संमेलने गावागावातून आयोजित करून विचारांचे मंथन करावे, असे आवाहन पाठक यांनी केले.
ऍड. विनायक नार्वेकर यांनी उपस्थित मराठीप्रेमी, साहित्यिक, स्वागत सभासद, प्रतिनिधी यांचे स्वागत करून प्रास्ताविकात, माशेल साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी सांगितली.
संमेलनाध्यक्ष पु. शि. नार्वेकर उर्फ दादा यांच्या प्रांजळ भाषणाने उपस्थित मंडळी हेलावून गेली. ते म्हणाले, माझ्याकडून फार मोठ्या मार्गदर्शनाची अपेक्षा करू नका. कारण मी विद्वान नाही. साहित्यिक ही उपाधी लोक मला लावतात. साहित्य व साहित्यिक या फार मोठ्या संकल्पना आहेत. मी केवळ पांढऱ्यावर काळे करणारा लेखक आहे. साहित्यिक म्हणून अध्यक्षपदी माझी निवड झाली असे मी मानत नाही. माझी मराठीनिष्ठा हेच माझ्या निवडीमागील कारण असावे, असे मला प्रामाणिकपणे वाटते.
याप्रसंगी स्वागताध्यक्षांचेही मराठीचा जयजयकार करणारे भाषण झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष पु.शि. नार्वेकर यांच्या हस्ते उत्कृष्ट साहित्यकृतीबद्दल डॉ. एस. एस. नाडकर्णी यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. तसेच श्रीराम कामत यांच्या विश्वचरित्र कोषाच्या पाचव्या खंडाचे मेघना कुरूंदवाडकर यांच्या "एकटी' या कथासंग्रहाचे संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या "मालिनी पौर्णिमा' या स्मरणिकेचे प्रकाशन श्री. नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री पाठक यांच्या हस्ते पु. शि. नार्वेकरांचा, तर सुरेश नाईक यांच्या हस्ते श्रीराम कामत यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
त्यापूर्वी सकाळी ९ वाजता ढोल, ताशे, टाळ, मृदंग यांच्या निनादात लेझीम, फुगडी, घोडेमोडणी, धालो, धनगर व मुलांच्या वेशभूषा पथकासह वरगाव -माशेल येथील श्री शांतादुर्गेच्या मंदिराकडून हजारो मराठीप्रेमींच्या सहभागाने निघालेल्या साहित्यादिंडीने संमेलनाच्या कार्यक्रमाचा दिमाखदार शुभारंभ झाला. साहित्य दिंडी माशेल मुख्य बाजारपेठेतून संमेलन स्थळी आल्यावर २७ सुहासिनीनी दिंडीचे आरती ओवाळून भव्य स्वागत केले.
यावेळी सभामंडपात प्रा. गोळ मयेकर, प्रकाश वेळीप, भिकू पै. आंगले, शशिकला काकोडकर, सुरेश वाळवे, दै. गोवादूतचे संपादक राजेंद्र देसाई, सहसंपादक गंगाराम म्हांबरे, डॉ. काशिनाथ जल्मी, उत्तर गोवा शिवसेना प्रमुख दामू नाईक आदी मान्यवर व हजारो मराठीप्रेमी मंडळी उपस्थित होती. येथील देवकीकृष्ण मैदानावर उभारलेल्या आकर्षक आणि भव्य बा.द. सातोस्कर नगरीत अनेक साहित्यिक कार्यक्रम होणार आहेत.
उद्घाटन सत्रातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी आपल्या सुंदर आवाजात प्रभावीरीत्या करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रेमानंद नाईक यांनी आभार मानले.

No comments: