Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 25 May, 2008

कॅसिनो हाकला, मांडवी मोकळी करा - पुंडलिक नाईक

पणजी, दि. 24 (प्रतिनिधी)- कॅसिनो हा भयानक जुगार आहे. सद्सद्विवेकबुद्धी शाबूत असलेला आणि प्रामाणिक असलेला नागरिक त्याला विरोध करणारच, अशा शब्दांत प्रसिद्ध कोकणी लेखक तथा कोकणी अकादमीचे अध्यक्ष पुंडलिक नाईक यांनी कॅसिनोबद्दची आपली भूमिका जाहीररीत्या मांडली. कॅसिनोमुळे केवळ श्रीमंतांचेच नुकसान होईल व त्याची झळ सामान्य गोमंतकीयांना बसणार नाही असे अजब तर्कशास्त्र मांडणाऱ्यांची कीव करावीशी वाटते, अशा शब्दांत त्यांनी कॅसिनो समर्थकांची चांगलीच खरडपट्टी काढली.
कॅसिनोच्या विषयावरून सध्या सुरू असलेल्या गदारोळसंदर्भात नाईक यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न "गोवादूत'ने केला असता या जुगाराला कडाडून विरोध झाला पाहिजे, असे ते म्हणाले. गोवा हे आदर्श राज्य असल्याचे आपले राजकारणी विविध व्यासपीठांवरून सांगतात. अशा वेळी आदर्श राज्यात जुगारासारखी गोष्ट कशी बसते आणि जुगारात कोणता आदर्श या लोकांना दिसतो, असा सवालही त्यांनी केला.
जुगार हे न संपणारे व्यसन आहे. त्यात माणसाला साथीदाराचीही गरज भासते. ते एक सामूहिक व्यसन आहे. मदिरा व मदिराक्षी हा कॅसिनोचा अविभाज्य भाग आहे. एकवेळ दारू येथे उपलब्ध होऊ शकेल, परंतु या धंद्याची गरज भागविण्यासाठी मदनिका कोठून येणार? जुगाऱ्यांची लैंगिक भूक कोण भागवणार, की इथल्या गरीब महिलांचा त्यात बळी जाणार, असा सवाल त्यांनी केला.
या राज्यात जत्रा, नाटक, काले या निमित्ताने काही ठिकाणी जुगार चालतो तेव्हा शासन - पोलिस त्याला विरोध करतात. छापा टाकतात आणि धरपकडही करतात. सरकार जुगार ही एक वाईट गोष्ट आहे हे मान्य करते. मग कॅसिनोला प्रोत्साहन का? सरकारला श्रीमंत बिघडले तर चालते. हे श्रीमंत इथले, या देशाचे नागरिक नाहीत का? कॅसिनो विदेशी लोकांसाठी आहे असे मानले तर "हे विश्वची माझे घर' या न्यायाने ते आपलेच लोक नाहीत का? श्रीमंत बिघडले, परदेशी बिघडले तर त्याचा मोठा धोका नाही याचा अर्थ काय, असा संतप्त सवालही त्यांनी केला.
"एक वेळ दारू परवडली परंतु जुगार नको' असे डॉ. काशिनाथ जल्मी एकदा म्हटल्याचे आपणास आठवते. डॉ. जल्मी यांचे हे म्हणणे खरे आहे. एखाद्या माणसाच्या दारू पिण्याला मर्यादा असू शकते. जुगाराला ही मर्यादा नसते. घरदार विकून कफल्लक होतो तेव्हाच माणूस जुगार थांबवतो. या व्यसनापायी लाखो लोक आयुष्यातून उठले आहेत. कॅसिनोसारख्या हायफाय जुगारामुळे तर अनेक प्रकारचा अपप्रवृत्ती वाढीला लागतात. त्यामुळे समाजासाठी घातक ठरणारा कॅसिनो गोव्याला अजिबात परवडारा नाही, त्याला कडाडून विरोध करावाच लागेल, असेही नाईक यांनी सांगितले.
मांडवीच्या पात्रात कॅसिनो बोटी नागरून ठेवण्याच्या आणि तेथेच हा व्यवसाय चालविण्याच्या कृतीलाही पुंडलिक नाईक यांचा तीव्र विरोध आहे. ते म्हणाले, कॅसिनो वाईट ही गोष्ट वेगळीच तथापि, हा ऑफ शोअर, म्हणजे खोल समुद्रातील कॅसिनो आहे. मग हा कॅसिनो मांडवी नदीत का? मांडवी नदीचे एक ठरलेले आगळे वेगळे सौंदर्य, आकार आणि तिच्या पात्राच्या मर्यादाही आहेत. या नदीत कोणत्या आकाराच्या आणि किती कोणत्या जहाजांनी वाहतूक करायची याला एक मर्यादा आहे. कॅसिनोची महाकाय जहाजे तेथे उभीच करता येणार नाही. शिवाय मांडवी म्हणजे काही बंदर नाही. तुम्हाला मोठी जहाजे उभी करायची असतील तर ती मुरगाव बंदरात करा. मांडवीत अडथळे निर्माण केल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. सरकारने स्वतःहोऊन अशा लोकांवर कारवाई केलेली बरी. अन्यथा लोकांनाच एक दिवस कायदा हाती घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
गोव्याला काय हवे काय नको याचा ताळेबंद हवा. मांडवीच्या पात्रात कोणत्या आकारापर्यंतची जहाजे शोभू शकतील इथपासून ते येथे किती उंचीपर्यंतच्या इमारती उभ्या राहतील याचाही एक निश्चित हिशेब असला पाहिजे असे ते म्हणाले. ज्येष्ठ कोकणी लेखक रवींद्र केळेकर यांनी एकदा गोव्याच्या सुंदर प्रदेशात माडापेक्षा काहीही उंच होता कामा नये, असे म्हटलेले वाक्य नाईक यांनी पुन्हा उद्धृत केले. सुंदर - सुबक गोवा याचा अर्थ आधी समजून घ्या आणि नंतरच काय ते ठरवा. गोव्याची जनतेला आम आदमी असे संबोधण्याची पद्धत या सरकाने सुरू केली. अनेकजण "आम आदमी जाम' अशी त्याची खिल्लीही उडवतात. मात्र एक गोष्ट खरी की हा आम आदमी कधी नव्हे इतका आता सक्षम बनला आहे. तो आपल्या हक्कांबाबत जागृत झालेला आहे. सरकार कुचकामी ठरत असताना आणि सोयीचे निर्णय घेत असताना आम आदमी प्रसंगी हक्कांसाठी रस्त्यावरही उतरू लागला आहे. विशेषतः गावातील महिलाही त्यात मागे नाहीत. अशी जागृती सामान्य लोकांमध्ये कधीच झालेली नव्हती. या आम आदमीला आत कोणीच गृहीत धरू नये. सरकारने त्यामुळे कॅसिनोंबाबत निर्णय घेताना सावधगिरी बाळगलेली बरी. अन्यथा या स्फोटक वातावरणात खवळलेले लोक कधी कायदा हातात घेतील आणि कोणाला कोठे पळवून लावतील ते सांगता यायचे नाही असा सूचक इशाराही पुंडलिक नाईक यांनी दिला.

No comments: