Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 25 May, 2008

विर्डी भागात प्रचंड वृक्षसंहार

निमित्त धरणाचे, नुकसान जैविक संपत्तीचे
पणजी, दि. 24 (प्रतिनिधी)- महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या विर्डी भागात धरणाचे निमित्त साधून सध्या प्रचंड जंगतोडीला सुरूवात झाली असून संपन्न जैविक विविधतेचे केंद्र समजले जाणाऱ्या या भागाचे मोठे नुकसान दिवसाढवळ्या सुरू आहे.
या घटनेमुळे येथील पर्यावरणप्रेमींत तीव्र चिंता व्यक्त होत असून जैविक संपत्तीच्या या लुटीकडे कोणीच लक्ष देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या घनदाट जंगलात अनेकदा अभ्यासदौरे किंवा निरीक्षणासाठी जाणाऱ्या पर्यावरणवाद्यांच्या मते या भागात पट्टेरी वाघ, बिबटे, पांढरे अस्वल आदी विविध जंगली जनावरांचा मुक्त संचार असतो. सध्याच्या वृक्षतोडीमुळे या जनावरांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
"म्हाडद' हे खास वृक्ष या जंगलात प्रचंड प्रमाणावर आढळतात. त्याचा वापर प्रामुख्याने फर्निचरसाठी केला जातो. त्यामुळे या लाकडाला मोठा भाव बाजारात मिळतो. साहजिकच या झाडांची कत्तल दिवसाढवळ्या सुरू आहे. "किनळ' वृक्षांचाही अशीच स्थिती आहे. हे वृक्षच येत्या काही दिवसांत या जंगलातून अदृश्य होतील, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
अलीकडेच येथील पर्यावरणवाद्यांनी विर्डी गावांतील ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन या वनसंपत्तीचे महत्त्व त्यांना सांगितले. तसेच या जंगलाच्या संरक्षणाबाबत त्यांना मार्गदर्शन केले. जंगल संपत्तीचा नायनाट करण्याच्या या व्यवहारांत राजकीय व व्यापारी लोकांचा सहभाग असल्याने त्यांच्या दबावामुळे या संपत्तीच्या रक्षणासाठी येथील लोक पुढे सरसावत नसल्याची माहिती पर्यावरणप्रेमींकडून मिळाली आहे. या गावातील बहुतेक लोक हे शेती व्यवसाय करणारे तथा गरीब असल्याने या बड्या लोकांशी दोन हात करणे त्यांना शक्य नसल्याचेही सांगण्यात आले.
जेथे जंगलतोड सुरू आहे ती जागा म्हणजे जनावरांचे मुख्य आसरा केंद्र असून ते नष्ट झाल्यास या जनावरांचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी प्रतिक्रीया पर्यावरणप्रेमी निर्मल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. या जंगलात पट्टेरी वाघ, बिबटे व पांढऱ्या अस्वलांचा संचार असल्याच्या माहितीला
श्री. कुलकर्णी यांनी दुजोरा दिला. एकीकडे गोवा व महाराष्ट्रादरम्यान विर्डी धरणासंबंधी चर्चा सुरू असताना त्याचा वनसंपत्तीची तस्करी हा चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान, या पश्चिम घाटाच्या संरक्षणासंबंधी व येथील जैविक संपत्तीच्या रक्षणासाठी निर्मल कुलकर्णी यांच्यासह राजेंद्र केरकर हेही सक्रिय कार्यरत आहेत. त्यांचे जागृती कार्य चालू असले तरी ही 'लॉबी' मोठी असल्याने त्यांचाही आवाज क्षीण झाल्याचे चित्र दिसून येते. हा संपूर्ण घाट महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक भागातील जंगलांना जोडला गेल्याने त्याला "म्हादईचे खोरे' असे संबोधले जाते. या ठिकाणी दुर्मिळ जातीचे अनेक सर्प दिसून येतात.
पश्चिम घाटाची ही अवस्था पर्यावरण व नैसर्गिक सुरक्षेसाठी धडपडणाऱ्यांसाठी अतिचिंतेचा विषय बनली आहे. या भागातील काही जागा ही खाजगी क्षेत्रात येते. शिवाय या प्रकरणात बडे व्यापारी व राजकीय लोकांचा सहभाग असल्याने सामान्य जनतेकडून त्यांना विरोध होणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही खुलेआम होणारी वृक्षांची कत्तल व जैविक संपत्तीवर घातला जाणारा घाला कोण रोखणार, असा सवाल पर्यावरणप्रेमींतून विचारला जात आहे.

No comments: