Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 31 May, 2008

येडियुरप्पा यांचा थाटात शपथविधी

..30 सदस्यीय मंत्रिमंडळ
..शेतकरी व परमेश्वराला साक्षी ठेवून शपथ
..सहाही समर्थक अपक्षांना स्थान

बंगलोर, दि.30 - दक्षिणेत आज खऱ्या अर्थाने कमळ फुलले. कर्नाटकात आज भाजप स्वबळावर सत्तारूढ झाला. राष्ट्रीय राजकारणाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने ही घटना अतिशय महत्त्वाची असल्याचे मानले जाते. अतिशय थाटात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. येडियुरप्पा यांच्यासोबतच अन्य 30 सदस्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, भाजपला पाठिंबा देणाऱ्या सर्वच सहाही अपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
राज्य विधानसभेच्या प्रांगणात झालेल्या अतिशय दिमाखदार समारंभात राज्यपाल रामेश्वर ठाकूर यांनी येडियुरप्पा आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विशेष म्हणजे, सर्वच सदस्यांना कॅबिनेटचा दर्जा देण्यात आलेला आहे. भाजपच्या तीन महिला उमेदवार निवडणुकीत विजयी झाल्या असल्या तरी शोभा कारंडलाजे या एकमेव महिला सध्या मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या आहेत.
यापूर्वीही येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. पण, त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला जदएसचा पाठिंबा होता. अवघ्या एकाच आठवड्यात जदएसने पाठिंबा काढून राज्याला राष्ट्रपती राजवटीच्या स्वाधीन केले होते. राजकीय इतिहासात प्रथमच भाजपाने कर्नाटकात स्वत:चे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे भाजपाने यावेळी खऱ्या अर्थाने दक्षिण दिग्विजय केला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
येडियुरप्पा यांच्यासह सर्वच सदस्यांनी शेतकरी आणि परमेश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतली. शपथ घेणाऱ्या सदस्यांमध्ये गोविंद कार्जोल, के. एस. ईश्वरप्पा, व्ही. एस. आचार्य, सी. एम. उदाशी, रामचंद्र गौडा, डॉ. मुमताज अली खान, आर. अशोक, एस. ए. रवींद्र नाथ, जी. जनार्दन रेड्डी, विश्वेश्वर हेगडे कागेरी, बी. एन. बच्चेगौडा, जी. करुणाकरा रेड्डी, बी. श्रीरामुल्लू, बसवराज बोम्मई, शोभा कारंडलाजे, सुरेशकुमार, रेवे नाईक बेलामागी, कृष्ण पालीमार, ई. एस. कृष्णय्या शेट्टी, अरविंद लिंबावली, पी. व्यंकटरामणप्पा, नरेंद्र स्वामी, एच. हलाप्पा, डी. सुधाकर, लक्ष्मण सवादी, गुलहट्टी शेखर, रूद्राप्पा निरानी, एस. के. बेल्लुबी आणि शिवराज तांगडागी यांचा समावेश आहे. यातील आठ सदस्य हे भाजप-जदएस मंत्रिमंडळातही मंत्री राहिले आहेत.
या मंत्रिमंडळात शपथ घेणारे डॉ. मुमताज अली खान हे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.
सुमारे अर्धा तास चाललेल्या या शानदार शपथविधी सोहळ्याला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी, भाजपाध्यक्ष राजनाथसिंग, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, रालोआचे संयोजक जॉर्ज फर्नांडिस, याशिवाय, राज्य कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खारगे, आर. व्ही. देशपांडे आणि पूर्वीच्या विधानसभेचे अध्यक्ष कृष्णा आदी उपस्थित होते.
राज्य मुख्यालयात आतषबाजी
राज्य विधानसभेत भाजप सरकारचा शपथविधी सोहळा सुरू असताना भाजपच्या राज्य मुख्यालयात फटाक्यांच्या आतषबाजीने हा आनंद साजरा करण्यात आला. भाजप कार्यकर्ते फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदाने नाचले.
राष्ट्रपती राजवट उठवली
येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तारूढ होण्याच्या काही तास आधीच राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी कर्नाटकातील राष्ट्रपती राजवट उठविण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. राष्ट्राध्यक्षा सध्या शिमल्यात असून, तिथेच त्यांनी या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आणि आवश्यक ते आदेश जारी करण्यासाठी हा अध्यादेश केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठविला.
या राज्यातील राष्ट्रपती राजवटीची मुदत 19 मे रोजी संपली होती. याच काळात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यांनी वाढविण्यात आली होती.

No comments: