Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 20 December, 2010

कॉंगे्रसचा हिंदूद्वेष पुन्हा उघड

- एकाही घोटाळ्याचा उल्लेख नाही
- मुकुल वासनिकांना मारहाण
- सोनियांचा कार्यकाळ पाच वर्षांचा

नवी दिल्ली, दि. १९
कॉंगे्रसच्या ८३ व्या महाअधिवेशनाला आजपासून राजधानी दिल्लीजवळील बुराडी या गावात प्रारंभ झाला. स्वत:च्या अध्यक्षपदाची कारकीर्द तीन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढविणारी घटना दुरुस्ती मंजूर करून घेताना कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अल्पसंख्यक आणि बहुसंख्यक जातीयवाद दोन्ही देशांसाठी घातक असल्याचे मत व्यक्त करून पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादाला तोंड ङ्गोडले आहे. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा आणि आदर्श सोसायटीचा घोटाळा यासारख्या मोठ्या घोटाळ्यांमध्ये कॉंगे्रस पक्षच अडकला असतानाही ‘भ्रष्टाचाराला या देशात मुळीच स्थान नाही आणि भ्रष्टाचार आम्ही कदापि खपवून घेणार नाही,’ असे सोनिया गांधी यांनी जाहीरपणे सांगितले, तर त्यांच्याच उपस्थितीत दिग्विजयसिंग यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोंडसुख घेत हिंदूत्ववादी संघटना देशाला घातक असल्याची टीका केली.
धर्माच्या नावाखाली होणारा कुठलाही दहशतवाद कॉंगे्रसला मान्य नाही, दहशतवादाचे हे दोन्ही स्वरूप एकसारखेच आहेत, असे सोनिया गांधी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. विकिलिक्स केबलला कॉंगे्रस नेते राहुल गांधी यांनी हिंदू दहशतवाद हा लष्क­र­- ए- तोयबापेक्षाही घातक आहे, असे वादग्रस्त उद्गार काढून देशभरात वाद निर्माण केला होता. यातून पुत्र राहुलचा बचाव करण्याचाच सोनिया गांधी यांचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले. त्याचवेळी सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादावर केवळ चिंता व्यक्त केली.
या वर्षात २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा आणि आदर्श सोसायटीचा घोटाळा यासारखे तीन मोठे घोटाळे घडले असताना आणि राष्ट्रकुल घोटाळ्यामुळे देशाची जगभरात बदनामी झाली असताना सोनियांनी आपल्या भाषणात मात्र या घोटाळ्याचा साधा उल्लेखही केला नाही. भ्रष्टाचार निपटण्यासाठी आपल्या सरकारकडे पाच सूत्री कार्यक्रम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कॉंग्रेस अधिवेशनात
कार्यकर्त्यांनाच बदडले
नवी दिल्ली, दि. १९ ः कॉंगे्रस पक्षाच्या ८३ व्या अधिवेशनात आज या पक्षाचा खरा चेहरा समोर आला. बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या दारुण पराभवासाठी कॉंगे्रसचे प्रभारी मुकुल वासनिक हेच पूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप बिहारमधील नेते व कार्यकर्त्यार्ंंनी करून त्यांच्याशी झोंबाझोंबी केली. यावेळी बिहारी कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.
कॉंगे्रसच्या दोन दिवसीय अधिवेशनाला आजपासून येथे सुरुवात झाली. या अधिवेशनासाठी सर्वच राज्यातून कॉंगे्रसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे दाखल झाले आहेत. बिहारमधूनही कॉंगे्रसचे नेते आणि कार्यकर्ते येथे आलेत. मुकुल वासनिकांना पाहताच त्यांच्या संतापाचा पारा वर चढला. वासनिक यांचे स्वार्थी धोरणच बिहार निवडणुकीत कॉंगे्रसच्या दारुण पराभवासाठी कारणीभूत ठरले. वासनिक यांनी प्रामाणिक आणि निष्ठावंतांना डावलून आपल्या मर्जीतील लोकांना तिकीट विकले, असा आरोप या कार्यकर्ते व नेत्यांनी केला.
अधिवेशनाच्या व्यासपीठावर वासनिक ध्वनिक्षेपक यंत्रणा नीट करीत असताना बिहार नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वासनिकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. वासनिकांना तात्काळ पक्षातून हाकलण्याची मागणी केली. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने अधिवेशनातील सर्वांचेच लक्ष या गोंधळाकडे वेधले गेले. सेवादलाच्या काही पदाधिकार्‍यांनी बिहारी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.
बिहारचे नेते, कार्यकर्त्यांची वासनिकविरोधी घोषणाबाजी सुरू असतानाच अधिवेशनाच्या एका ठिकाणाहून वासनिक समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू झाली. यामुळे अधिवशनस्थळातील वातावरण चांगलेच तापले होते. अलिकडेच झालेल्या बिहार निवडणुकीत कॉंगे्रसला केवळ चार जागा मिळाल्या, अनेकांना हजारापेक्षा कमी मते मिळाली. याचा अर्थ काय, असा संतप्त सवाल बिहारी नेते व कार्यकर्त्यांनी केला.
बिहारींच्या घोषणा सुरूच असताना पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करणार्‍या बिहारी कार्यकर्त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे सभास्थळी एकच धावपळ निर्माण झाली. यानंतर काही वरिष्ठ नेत्यांनी येऊन गोंधळ घालणार्‍या कार्यकर्त्यांची समजूत घातली आणि स्थिती निवळली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या गोंधळाने मात्र महात्मा गांधीजींच्या शांतता आणि प्रेम या मार्गावर वाटचाल करण्याचा दावा करणार्‍या कॉंगे्रस पक्षाचा खरा चेहरा जनतेपुढे उघड झाला आहे.
दिग्विजयसिंगांची बेताल बडबड सुरूच
नवी दिल्ली, दि. १९ ः एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना खरा धोका हिंदू दहशतवाद्यांकडूनच होता, अशी बेताल बडबड करणारे कॉंगे्रसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी आपली बडबड सुरूच ठेवताना आज थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध गरळ ओकली आहे. भाजप आणि संघाचे वागणे जर्मनचा हुकूमशाह हिटलरसारखेच आहे, अशी ङ्गुत्कार त्यांनी काढली.
हिटलरने यहुदींना लक्ष्य बनवून आपल्या कारवायांना राष्ट्रवादाचे नाव दिले होते. त्याचप्रमाणे संघ आणि भाजपदेशातील मुस्लिमांना लक्ष्य बनवून आपल्या कारवायांना राष्ट्रवादाचे नाव देत आहेत, असे अकलेचे तारे दिग्विजयसिंग यांनी कॉंगे्रस महाअधिवेशात तोडले. भाजप आणि संघाची संकुचित विचारधारा हे आज देशापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. संघ परिवाराचे लोक देशात हिंसा आणि जातीय द्वेष पसरवित आहेत. तिथेच कॉंगे्रस पक्षाची वाटचाल महात्मा गांधी यांच्या शांतता आणि प्रेम या सिद्धांतावर आधारित आहे.
संघाच्या बाल शाखांमधून हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचे शिक्षण दिले जाते. न्यायपालिका, प्रशासन आणि देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांमध्ये भाजपा आणि संघाच्या लोकांचा शिरकाव झालेला आहे. याचे जिवंत उदाहरण मालेगाव स्ङ्गोटातील आरोपी कर्नल पुरोहित यांना झालेली अटक आहे.
भाजपाविषयी आपले विषारी मत व्यक्त करताना ते म्हणाले, लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेमुळेच देशातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. भाजपा आणि संघाच्या लोकांनी अयोध्येत बाबरी मशिदीचा विध्वंस केला. हा देशाच्या प्रतिष्ठेवर बसलेला सर्वात मोठा डाग आहे, तो मिटविण्याचे प्रयत्न कॉंगे्रस पक्ष करीत आहे, अशीही गरळ त्यांनी ओकली.

No comments: