Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 19 December, 2010

जुझेंना वगळा, मिकींची वर्णी लावा!

मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासमोर पेचप्रसंग
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांची मंत्रिपदी वर्णी लावण्यासाठी जुझे फिलिप डिसोझा यांचा पत्ता कट होणार हे आत्ता निश्‍चित झाले आहे. त्यासंबंधीचा आदेश देणारे पत्रच आज राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश बिनसाळे व प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना सुपूर्द केले. दरम्यान, मुख्यमंत्री कामत यांनी मात्र त्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच या आदेशाची कार्यवाही करू, असे सांगून त्यांनी हा निर्णय तात्पुरता थोपवून धरला आहे.
आज दिवसभरात राजकीय घडामोडींना बराच वेग प्राप्त झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींनी दिलेल्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी पक्षाच्या दोन्ही मंत्र्यांना आपल्या पदाचे राजीनामा देण्याचे पत्र पाठवून दिले आहे. दरम्यान, श्रेष्ठींचा आदेश मानण्यास उभय मंत्र्यांनी स्पष्ट नकार दिल्याने आज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी प्रकाश बिनसाळे गोव्यात दाखल झाले. प्रा. सिरसाट यांच्या सहीनिशी एक नवे पत्र मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना आज देण्यात आले. त्यात जुझे फिलिप डिसोझा यांना वगळून मिकी पाशेको यांची वर्णी मंत्रिपदी लावण्याचे स्पष्ट आदेश दिल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मात्र या प्रकरणी सावध भूमिका घेतली आहे. आपण कॉंग्रेस श्रेष्ठींशी विचारविनिमय करून पुढील निर्णय घेणार, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, मिकी पाशेको यांच्या मंत्रिमंडळ समावेशास मंत्रिमंडळातील बहुतांश कॉंग्रेस मंत्र्यांनी आक्षेप घेतला आहे. या मंत्र्यांनी मुख्यमंत्री कामत यांनाही याची माहिती दिली असून ती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचवण्यात आली आहे. जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर हे एकत्र असून त्यांनी आपल्याला अद्याप कोणतेही पत्र मिळाले नाही, असा पवित्रा घेतला आहे. या संपूर्ण घडामोडीत मुख्यमंत्री कामत यांची मात्र विचित्र परिस्थिती बनली आहे. मिकी पाशेको यांचा मंत्रिमंडळ समावेश सरकारच्या स्थिरतेलाच धोका ठरू शकतो, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री कामत यांनी दिल्लीत पोचवल्याने त्याबाबत राष्ट्रीय स्तरावरच तोडगा काढावा, असेही त्यांनी सुचवल्याची खबर आहे.
पाशेकोंचे शपथविधीसाठी आमंत्रण
{‘H$s पाशेको यांनी आपल्या समर्थकांना रात्री ८ वाजता राजभवनावर शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले आणि प्रत्यक्षात त्यांच्या समर्थकांनी खरोखरच तिथे हजेरी लावली. राजभवनाच्या मुख्य गेटसमोरील सुरक्षा रक्षकांनी शपथविधी सोहळ्याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे सांगून या समर्थकांना परतवून लावले.
...तर राष्ट्रवादीशी फारकत घ्यावी लागेल
पाशेको यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास कॉंग्रेस पक्षातील बहुतांश मंत्री व आमदारांनी हरकत घेतली आहे. हा निर्णय लादण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी श्रेष्ठींकडून झाला तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडीतून वगळण्यात यावे, असा सुरही उमटला आहे. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीला आघाडीतून वगळल्यास सरकारच्या स्थिरतेलाच धोका पोचू शकतो. एवढेच नाही तर राष्ट्रवादीला वगळल्यास कॉंग्रेसच्या दोन आमदारांना मंत्रिपदे मिळू शकतात व सरकारही अधिक मजबूत होऊ शकते. आता सरकार टिकवायचे की मिकी पाशेको यांना मंत्रिमंडळात प्रवेश देऊन अस्थिर बनवायचे हे श्रेष्ठींनीच ठरवावे, असा संदेश मुख्यमंत्री कामत यांनी दिल्लीत पोचवून हा चेंडू श्रेष्ठींच्या दरबारातच टोलवल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

No comments: