Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 19 December, 2010

‘मोळी’ हवी की स्थिर सरकार : पर्रीकर

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): गोवा आपला मुक्तिदिन सुवर्णमहोत्सव साजरा करीत असताना राजकीय पातळीवर जो तमाशा सुरू आहे, तो गोमंतकीयांसाठी एक दृष्टांतच ठरणारा आहे. विद्यमान आघाडी सरकारातील गोंधळ पाहिला तर पन्नास वर्षांच्या उंबरठ्यावर गोव्याचे राजकीय भवितव्य काय आहे याची दारुण अवस्था पाहायला मिळते, अशी परखड प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली.
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत पर्रीकर यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणी आपली कोणतीही भूमिका नसून हा आघाडीचा अंतर्गत मामला असल्याचे स्पष्ट केले. कोणताही ताळमेळ व विचारांची बैठक नसलेले लोक एकत्र आल्याचा हा परिणाम असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. आघाडीचे घटक एकमेकांबरोबर आनंदाने नांदू शकत नाहीत, त्याचेच दर्शन या प्रकरणातून घडते. आता भविष्यात अशा ‘मोटली’ला (मोळी) निवडून द्यायचे की स्थिर व विकासाभिमुख सरकार देणार्‍या भाजपला मत द्यायचे याचा निर्णय जनतेलाच घ्यायचा आहे, असेही ते म्हणाले.
केवळ सत्तेसाठी एकत्र जमलेले हे घटक एकत्र नांदूच शकत नाहीत याचा प्रत्यय अनेक प्रकरणांतून आला आहे. आघाडीच्या एका नेत्याने आपल्याला फोन करून रात्री आठ वाजता शपथविधी सोहळ्याला आमंत्रण दिल्याचेही पर्रीकरांनी यावेळी उघड केले.

No comments: