Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 24 December, 2010

राजकीय नाट्याचा फैसला आता नाताळनंतरच होणार

राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर कॉंग्रेस श्रेष्ठींची दिरंगाई

पणजी, दि.२३(प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचे नेते मिकी पाशेको यांच्या मंत्रिमंडळ समावेशास विरोध दर्शवण्यासाठी काल संध्याकाळी कॉंग्रेस नेत्यांनी सरकार पाडण्याची धमकी दिल्यानंतर आज सकाळपासूनच राजकीय घडामोडी तीव्र बनल्या. मुख्यमंत्री दिगंबर कामत व सरकारातील नाराज गटाचे नेतृत्व करणारे चर्चिल आलेमाव यांनी राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांची स्वतंत्र भेट घेतली. उभयतांनी राज्यपालांना राजकीय परिस्थितीची जाणीव करून दिल्याची खबर आहे. याप्रकरणी पक्षाचे प्रभारी तथा राष्ट्रीय सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांनाही या घडामोडींची कल्पना दिली असता आधी नाताळ साजरा करा, मगच काय ते पाहू, असा सल्ला देत त्यांनीही राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर वेळकाढू धोरण अवलंबल्याने हा गुंता तात्काळ सुटण्याची शक्यता मावळली आहे.
मिकी पाशेको यांना विरोध दर्शवण्यासाठी कॉंग्रेसचा गट सक्रिय बनल्यानंतर आज सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सकाळी ११ वाजता राजभवनवर राज्यपालांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास त्यांनी याविषयावर चर्चा केल्याची खबर आहे. राजभवनातून बाहेर पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांना मात्र डावलले.
नंतर सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता आपण राज्यपालांना नाताळाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, असे सांगून त्यांनीही मुख्य विषयाला बगल दिली. कॉंग्रेसमधील मिकी विरोधी गटाने आज मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानावर भेट घेतली व त्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली. या गटाने व्यक्त केलेली भावना आपण श्रेष्ठींपर्यंत पोहचवणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, याप्रकरणाची संपूर्ण माहिती हरिप्रसाद यांच्यापर्यंत पोहचवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. काही पत्रकारांनी हरिप्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता नाताळ साजरा केल्यानंतरच आपण गोव्यात येऊ व मगच याविषयी तोडगा काढू, अशी भूमिका त्यांनी घेतली. मिकी पाशेको यांच्या मंत्रिमंडळ समावेशावरून कॉंग्रेस श्रेष्ठींनीही सावध भूमिका घेतली आहे. याप्रकरणी वेळकाढू धोरण अवलंबून राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुढील व्यूहरचना काय असेल याकडे कॉंग्रेसचे लक्ष लागून राहिले आहे.
राष्ट्रवादीच्या आदेशाचे पालन व्हावे
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस श्रेष्ठींकडून जो आदेश मिळाला आहे त्याचे तात्काळ पालन व्हावे, अशी इच्छा प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी व्यक्त केली. याप्रकरणी तोडगा निघेल असा आशावाद व्यक्त करून कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेली बंडखोरी हा त्यांचा अंतर्गत मामला आहे व त्यात राष्ट्रवादीला अजिबात रस नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या आदेशाची कल्पना मुख्यमंत्री कामत यांनी बी.के.हरिप्रसाद यांना दिली आहे व त्यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींशी विचारविनिमय करून पुढील निर्णय कळवण्याचा संदेश त्यांना दिल्याचेही प्रा.सिरसाट म्हणाले. राष्ट्रवादी श्रेष्ठींच्या आदेशांचे पालन होत नसेल तर या पक्षापुढे अन्य पर्याय खुले आहेत व त्याबाबत श्रेष्ठी काय तो निर्णय घेतील,असे ते म्हणाले.

No comments: