Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 22 December, 2010

दिल्लीतच बसून सरकार चालवा भाजपची मुख्यमंत्र्यांवर तोफ

पणजी, दि. २१ (पत्रक): प्रत्येक बारीकसारीक गोष्टीसाठी दिल्लीकडे धावणार्‍या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी तिथेच बसून सरकार चालवावे, असा औपरोधिक सल्ला भारतीय जनता पक्षाने दिला आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय शिमग्याविषयी चर्चा करून हा वाद सोडवण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांचे पक्षश्रेष्ठी भेटत नाहीत आणि हतबल असलेले मुख्यमंत्री स्वतः कोणता निर्णयही घेऊ शकत नाहीत, अशी निर्नायकी अवस्था सध्या राज्यात उद्भवल्याची टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी केली आहे.
गोवा मुक्तिदिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करताना एका बाजूला गोव्यातील तमाम जनता हर्षोल्हासित होऊन हा अनोखा उत्सव साजरा करत होती, तर दुसर्‍या बाजूने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्लज्जपणाचा कळस ठरलेला राजकीय शिमगा सुरू होता. या सरकारला गोमंतकीयांच्या भावनांचे आणि त्यांच्या सुख दुःखांचे कोणतेही सोयर सुतक लागून राहिलेले नाही हेच या घटनेवरून सिद्ध होते, असेही श्री. पर्वतकर यांनी म्हटले आहे.
अनेक बेगडी योजनांच्या घोषणा करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी मुक्तिदिन सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पदार्पणालाच जागोजागी आंदोलन करत असलेल्या कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांकडेही लक्ष देण्यासाठी वेळ काढावा, असा सल्ला भाजपने दिला आहे. बदली कदंब बस चालक अन्याय असह्य झाल्यामुळे आमरण उपोषणालाच बसले होते. वारंवार दिल्लीच्या वार्‍या करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी या सामान्य नागरिकांवर आपल्या जिवावर उदार होण्याची पाळी का आली याचाही थोडा विचार करून पाहावा. मुख्यमंत्री वेळोवेळी अनेक आकर्षक घोषणा करण्यात वाकबगार आहेत. पण त्या घोषणांचे पुढे काय होते हे त्यांचे त्यांनाच आठवत नसते, असा टोला पर्वतकर यांनी हाणला आहे.
आम्ही गोव्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असलो तरी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी गोव्याची मुक्ती दिल्लीस्थित कॉंग्रेस श्रेष्ठींकडे गहाण टाकली आहे व त्यामुळेच अगदीच बारीकसारीक गोष्टींसाठीही त्यांना श्रेष्ठींकडेच पदर पसरावा लागतो, अशी जहाल टीका भाजपने केली आहे. एका मुक्त राज्याचे आपण मुख्यमंत्री आहोत व आपल्या राज्यासाठी हितकारक असलेले निर्णय आपल्यालाच घ्यावयाचे आहेत, हेच राज्याचे मुख्यमंत्री विसरले आहेत हे गोमंतकीयांचे दुर्दैव नाही काय, असा सवालही भाजपने उपस्थित केला आहे.

No comments: