Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 19 December, 2010

मशालींच्या तेजाने उजळली गोमंतभूमी

पणजी, दि.१८(प्रतिनिधी): गोवा मुक्तीदिन सुवर्णमहोत्सवाला आज इथे मोठ्या दिमाखात आरंभ झाला. संध्याकाळी तीन विविध ठिकाणांहून निघालेल्या मशाल मिरवणुकीने पणजी शहर लखलखीत प्रकाशाने उजळून निघाले. ‘भारत मात की जय’, ‘जय हिंद’च्या घोषणांनी अवघी राजधानी दुमदुमली. तिन्ही मशाल मिरवणुकांचे आझाद मैदानावर मीलन होताच राष्ट्रभक्ती व राष्ट्राभिमानाने ओतप्रोत असेच वातावरण पसरले. हुतात्मा स्मारकाला वंदन करून उपस्थितांनी गोवा मुक्तीलढ्यात प्राणार्पण केलेल्यांना शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
आज मुक्तीदिन सुवर्णमहोत्सवी उद्घाटन सोहळा आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला होता. कला अकादमी, डॉ. बाबासाहेब आंबेेडकर उद्यान व आल्तिनो येथील जॉगर्स पार्क येथून तीन भव्य मशाल मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांत मोठ्या प्रमाणात शालेय, विद्यालयीन, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेतला. कला अकादमीकडील मिरवणुकीत मुख्यमंत्री दिगंबर कामत, कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, पणजी महापौर कॅरोलिना पो, अन्य नगरसेवक, स्वातंत्र्यसैनिक व नागरिक हजर होते. भाजपतर्फे आयोजित केलेल्या मशाल मिरवणुकीचे नेतृत्व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर तसेच भाजप समर्थक नगरसेवकांनी केले होते. या तिन्ही मिरवणुकांची सांगता आझाद मैदानावर झाली. या ठिकाणी समाज कल्याणमंत्री सुदिन ढवळीकर, सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, वरिष्ठ सरकारी अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक व नागरिक हजर होते. यावेळी उपस्थितांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. मुख्यमंत्री कामत व अन्य मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्राभिमान हाच देशाचा पायाः नागेश करमली
कोणताही देश राष्ट्राभिमानावरच आपले भवितव्य घडवत असतो व त्यामुळे राष्ट्राभिमान बाळगा,असे आवाहन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी केले. गोवा मुक्तीलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी गोवा हे पूर्ण राज्य पाहायला मिळालेच पण त्याहीपेक्षा मुक्तीलढ्याच्या सुवर्णमहोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणे हे परमभाग्य असल्याचे ते म्हणाले.
स्वातंत्र्याचा लाभ प्रत्येकाला मिळावाः मुख्यमंत्री
राज्यातील प्रत्येक नागरिकाला जेव्हा स्वातंत्र्यांचा लाभ मिळेल तेव्हाच आपण खर्‍या अर्थाने स्वतंत्र झालो, असे समजावे लागेल, असे मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले. या राज्याच्या मुक्तीसाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता पूर्णपणे आपले आयुष्य झोकून दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांमुळेच आपल्याला हा दिवस पाहायला मिळतो, असे ते म्हणाले.
इतिहास विसरू नकाः मनोहर पर्रीकर
आपल्याला खर्‍या अर्थाने राष्ट्राचा विकास व प्रगती करायची असेल तर इतिहास अजिबात विसरता कामा नये, असे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर म्हणाले. या सुवर्णमहोत्सवानिमित्त आपल्याला सिंहावलोकन करावे लागेल व आपण गेल्या पन्नास वर्षांत नेमके कुठे पोचलो आहोत हे पाहणे उचित ठरेल, असे ते म्हणाले. गोव्याच्या भवितव्याच्या दृष्टीने आगामी काळ महत्त्वाचा ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
दिशाहीन व निरुत्साही आयोजन
गोवा मुक्तीदिन सुवर्णमहोत्सवाच्या सरकारी आयोजनात अजिबात प्राण नव्हता हे मात्र प्रकर्षाने जाणवत होते. एरवी यशस्वी कार्यक्रम आयोजनाची ख्याती प्राप्त केलेल्या कला आणि संस्कृती खात्याकडे शेवटच्या क्षणी ही जबाबदारी सोपवण्यात आल्यानेही काही प्रमाणात गोंधळ उडाला. व्यासपीठावरील छोटासा बॅनर, तसेच आझाद मैदानावरील काळोख, संगीत बँडकडून देशभक्तिपर गीतांऐवजी इंग्रजी गीतांचे सादरीकरण आदी अनेक गोष्टी नागरिकांना खटकत होत्या. या कार्यक्रमाला एकाही मंत्र्याची हजेरी लाभली नाहीच; पण त्यात मशाल मिरवणुकीची सांगता होताच जमविण्यात आलेले विद्यार्थीही परत निघाल्याने खुच्यार्र् रिकाम्या राहिलेल्या दिसत होत्या. भाजपतर्फे आयोजित मशाल मिरवणुकीतील विद्यार्थी व पणजीतील काही नागरिक उपस्थित होते म्हणून काही प्रमाणात लाज राखली गेली. सुदिन ढवळीकर, व्हिक्टोरिया फर्नांडिस, पांडुरंग मडकईकर व मुख्यमंत्री कामत मात्र यावेळी हजर होते.

No comments: