Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 24 December, 2010

कामत सरकारला दीर्घ रजेवर पाठवणेच योग्य

भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा.पार्सेकर यांचा टोला

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)
मुक्तिदिन सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करताना राज्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल असायला हवी होती, पण आघाडी सरकारातीलच एक घटक आपल्याच सरकारला धमकी देत सुटला आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत एकतर दिल्लीवारी किंवा मंदिरवारीत व्यस्त आहेत. या सरकारला सामान्य जनता विटली आहे व त्यामुळे या सरकारला दीर्घ रजेवर पाठवणेच योग्य ठरेल, असा सणसणीत टोला भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज येथे पत्रपरिषदेत लगावला. प्रा. पार्सेकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून कॉंग्रेस आघाडी सरकारला चांगलेच फैलावर घेतले. भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर हेही यावेळी हजर होते.
प्रा. पार्सेकर म्हणाले, आघाडी सरकारचा घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांना वगळून मिकी पाशेको यांची वर्णी लावण्यावरून जे तांडव सुरू आहे ते पाहता या सरकारने सुवर्णमहोत्सवी वर्षारंभीच राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. राजकीय अस्थिरता, ठप्प प्रशासन, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ आदींमुळे त्रस्त बनलेल्या सामान्य लोकांबद्दल या सरकारला ना खंत ना खेद. एकीकडे कॉंग्रेसचा दहा नेत्यांचा गट सरकार पाडण्याची धमकी देतो तर दुसरीकडे मुख्यमंत्री मुरली वाजवण्यात गर्क आहेत, हे चित्रच जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहणारे ठरले आहे.
मिकी यांना रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच हे राजकीय नाट्य घडवून आणले असल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्यातून मुख्यमंत्र्यांचा ढोंगीपणा उघड झाल्याचा गंभीर आरोप प्रा.पार्सेकर यांनी केला. मंत्रिमंडळात कुणाचा समावेश करावा अथवा करू नये याचा पूर्णाधिकार मुख्यमंत्र्यांना असतो.अशावेळी श्रेष्ठींकडे बोट दाखवून मुख्यमंत्री वेळ मारून नेत आहेत. गोमंतकीय जनतेने हा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना दिला आहे; पण ते या जनाधाराचा अनादर करीत असल्याचा ठपकाही प्रा. पार्सेकर यांनी ठेवला.
सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे दोनशे कोटी रुपये मागितले होते व ते मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले होते. हे पैसे कुठे गेले याचा कोणताही हिशेब सरकारकडे नाही. हे सरकार वाहतूकदारांच्या परवाना शुल्कांत भरमसाट वाढ करून त्यांच्या पोटावर का लाथ मारत आहे,असा खडा सवालही प्रा.पार्सेकर यांनी केला. मुख्यमंत्री मंदिरवार्‍या करतात खरे; पण मंदिरात चोर्‍यांचे प्रमाण वाढत चालले आहे याकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. खुद्द मडगाव परिसरातील मंदिरांत बहुतांश चोर्‍या झाल्या आहेत, हेही प्रा.पार्सेकर यांनी पत्रकारांच्या निदर्शनाला आणून दिले.
जुझे व नीळकंठ यांना वगळून मिकींना मंत्रिमंडळात घेण्याचा विषय हा राष्ट्रवादीचा अंतर्गत मामला आहे व त्यात भाजपला काडीचाही रस नाही, असे प्रा.पार्सेकर म्हणाले.

No comments: