Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 25 December, 2010

अखेर कलमाडींच्या निवासस्थानांवर सीबीआयचे छापे

-आठ तासपर्यंत चालली कारवाई
-स्वीय सहायकाच्या घराचीही झडती


नवी दिल्ली/पुणे, दि. २४
राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीसाठी हाती घेण्यात आलेल्या योजनांचे कंत्राट देताना मोठ्या प्रमाणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या नवी दिल्ली, मुंबई आणि पुणे येथील निवासस्थाने आणि कार्यालये अशा एकूण सहा ठिकाणांवर सीबीआयच्या पथकाने आज छापे टाकले.
सीबीआयच्या ४० अधिकार्‍यांच्या पथकाने आज पहाटे एकाचवेळी कलमाडी यांच्या निवासस्थानांवर धाडी टाकल्या. आयोजन समितीच्या तीन अधिकार्‍यांना अटक केल्यानंतर चौकशी आणखी पुढे नेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज हे छापे टाकण्यात आले. राष्ट्रकुल घोटाळा उघडकीस आल्यानंतर या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कलमाडी यांच्यावर आज प्रथमच सीबीआयने धाडी टाकल्या. आज सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेले हे धाडसत्र सुमारे आठ तासपर्यंत चालले.
सीबीआय अधिकार्‍यांनी आज कलमाडी यांच्या पुण्यातील कर्वे रोड भागातील निवासस्थान, खडकवासला परिसरातील ङ्गार्म हाऊस, कार शो रूम आणि पेट्रोल पंपावरही धाडी टाकून झाडाझडती घेतली. याशिवाय कलमाडी यांचा स्वीय सहायक मनोज भुरे याच्या पुण्यातील निवासस्थानाचीही सीबीआय अधिकार्‍यांनी झडती घेतली. या धाडसत्राला प्रारंभ झाल्यानंतर लगेचच सीबीआय अधिकार्‍यांनी कलमाडी यांचे निकटवर्ती शेखर यांना सीबीआय मुख्यालयात बोलावून घेतले आणि त्यांची सखोल चौकशी केली. कलमाडी यांच्या मुंबईच्या वरळी येथील निवासस्थानीदेखील सीबीआयचे अधिकारी जाऊन धडकले आणि त्याठिकाणीदेखील त्यांनी आपली कारवाई केली.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या क्वीन्स बॅटनच्या लंडन येथे झालेल्या कार्यक्रमासाठी व्हिडिओ लावण्याचे कंत्राट वाढीव दरात लंडन येथील एका कंपनीला दिल्याच्या आरोपांप्रकरणी तपासणी करण्यासाठी आज या धाडी टाकण्यात आल्या. या धाडसत्रानंतर अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, त्यांची तपासणी करण्याचे काम सध्या सुरू आहे, असे सीबीआयच्या प्रवक्त्या बिनीता ठाकूर यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना दिली. धाडसत्रादरम्यान संगणक आणि लॅपटॉपमधून जप्त करण्यात आलेल्या माहितीचा न्याय सहायक प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सुरेश कलमाडी यांना अधिक चौकशीसाठी सीबीआय मुख्यालयात बोलावले जाऊ शकते, असेही ठाकूर यांनी सांगितले.

एकट्याने कुठलाही निर्णय घेतलेला नाही : कलमाडी
सीबीआयने आज टाकलेल्या धाडीनंतरही सुरेश कलमाडी यांचा हेकेखोरपणा अजूनही कायमच असून, आरोप सिद्ध होईपर्यंत मी पूर्णपणे निर्दोष आहे, असे सुरेश कलमाडी यांनी सीबीआच्या आठ तासांच्या छापेमारीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रकुल स्पर्धा आयोजना संदर्भात मी व्यक्तीगत स्तरावर कुठलाही निर्णय घेतलेला नसून, सर्व निर्णय आयोजन समितीच्या कार्यकारी मंडळाने सामूहिकरित्या घेतलेले आहेत, असे सांगत कलमाडी यांनी आपला बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सरकारने आयोजन समितीसाठी १५०० कोटींचे अंदाजपत्रक निश्‍चित केले होते. ही रक्कम एकूण अंदाजपत्रकाच्या ङ्गक्त चार ते पाच टक्के एवढीच आहे. याशिवाय स्पर्धेसाठी आम्ही वेगवेगळ्या मार्गाने ७०० कोटींचा महसूल गोळा केला होता, असेही कलमाडी यांनी सांगितले.
काही प्रसार माध्यमे मला दोषी ठरविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कलमाडी यांनी यावेळी केला. सीबीआय अधिकार्‍यांना आम्ही आज सर्वतोपरी सहकार्य केले आणि यापुढच्या तपासातही करीत राहू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments: