Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 20 December, 2010

सेवा हाच मानवधर्म माना - श्रीपाद वडेर स्वामी


म्हार्दोळ महालसा संस्थानात अयुतचंडी महोत्सव


पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)
सेवा हाच मानवधर्म मानून प्रत्येकाने आपले कार्य करत राहिले पाहिजे. कर्म करताना फळाची अपेक्षा धरू नये. मात्र आपल्या देवावर श्रद्धा ठेवावी. देवावरील श्रद्धा व भक्ती आपल्याला देवतांच्या अनुग्रहास पात्र ठरविते असे आशीर्वचनपर उद्गार श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे स्वामी परमपूज्य श्रीमद् विद्याधिराजतीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींनी म्हार्दोळ येथे काढले.
म्हार्दोळच्या श्री महालसा संस्थानात मंदिर पुनर्स्थापनेला ४५० वर्षे होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या ७ नोव्हेंबरपासून अयुतचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले होते. या यागाच्या आज झालेल्या समारोपाच्या सोहळ्यात स्वामीजी आशीर्वचनपर मार्गदर्शन करत होते. यावेळी कैवल्य मठाधीश श्रीमद् शिवानंदतीर्थ स्वामीजीही उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर मुख्यमंत्री दिगंबर कामत, पर्तगाळी जीवोत्तम मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, महालसा संस्थानचे अध्यक्ष विनोद कामत तसेच अन्य मान्यवर आसनस्थ होते. या कार्यक्रमाला मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, सचिव राजीव वर्मा, डॉ. एम. मुदास्सिर उपस्थित होते.
गोमंतक ही पुण्यभूमी आहे. इथल्या मंदिरांमुळे तिला देवभूमी ही संज्ञाही प्राप्त झाली आहे. मंदिरातील देवावर आपण नेहमी श्रद्धा, निष्ठा व भक्ती ठेवून देवाला शरण गेले पाहिजे असे स्वामीजींनी पुढे सांगितले. देवाची भक्ती केल्याने आपले मन सात्त्विक बनते. सात्त्विक मनच आपल्याला जीवनात सुख, शांती व समाधान प्राप्त करून देते असे सांगून स्वामीजींनी श्री महालसा देवी सर्व भक्तांना सद्वासना, सद्बुद्धी व सद्प्रेरणा देवो अशी प्रार्थना केली.
कैवल्य मठाधीश श्रीमद् शिवानंदतीर्थ स्वामीजींनी देवतांच्या कृपेस आपण पात्र ठरण्यासाठी आधी त्याला शरण जायला हवे असे आपल्या आशीर्वचनात सांगितले. गोव्यात मठ आहेत तसेच त्या मठांचे अधिपतीही आहेत. अनेकांचे कुलदैवत हे गोव्यात आहे. त्यामुळे व्यवसायानिमित्त परराज्यात स्थायिक झालेले अनेकजण आपले कुलदैवत व कुलगुरूंच्या भेटीसाठी येथे येतात. तसेच गोव्यातील भक्तगण तर नेहमीच आपले दैवत व कुलगुरूंच्या भेटी घेत असतात. ही श्रद्धा व भक्ती अशीच राहिली पाहिजे असे स्वामीजी म्हणाले.
श्री महालसा संस्थानाने चतुर्थ शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त महायागाचे श्रद्धापूर्वक आयोजन करून तो यशस्वी केला. तसेच या यागामुळे सर्व भक्तांना निश्‍चितच फलप्राप्ती मिळेल असे सांगून संस्थान समितीने संस्थानाच्या अभिवृद्धीचा जो संकल्प केला आहे त्याला सुयश चिंतिले.
या चतुर्थ शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी एक लाख रुपये व त्यावर आपले आर्थिक योगदान देऊन उत्सवास हातभार लावला त्या दात्यांचा याप्रसंगी स्वामीजींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तसेच पुरोहित मदन भटजी, मंडप उभारणीसाठी, संस्थानाचे संकेतस्थळ तयार करणे, अभिवृद्धीचा आराखडा तयार केलेले वास्तुविशारद, स्मरणिका तयार करण्याकामी व हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या काही जणांचा तसेच ज्येष्ठ महाजन, संस्थानाचे माजी अध्यक्ष आदींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
स्वामीजींच्या आज्ञेने मुख्यमंत्री कामत यांनी देवस्थानच्या स्मरणिकेचे प्रकाशन तर मठ समितीचे अध्यक्ष धेंपे यांनी संस्थानाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ केला.यावेळी मुख्यमंत्री कामत व श्री. धेंपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्या स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव संपन्न झाला त्या उभय स्वामीजींना यावेळी महालसा देवीची प्रतिकृती असलेली सुवर्ण प्रतिमा भेट देण्यात आली. प्रारंभी उभय स्वामीजींच्या पाद्यपूजेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थानचे अध्यक्ष विनोद कामत यांनी सपत्नीक प. पू. विद्याधिराज स्वामी व खजिनदार सुवर्ण शेणवी नेवरेकर यांनी सपत्नीक कैवल्य मठाधीशांची पाद्यपूजा केली.
प्रारंभी अध्यक्ष श्री. कामत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राधाकांत पै काणे व मदन भटजींनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. संस्थानचे गजानन पै वैद्य यांनी आभार व्यक्त केले. विशाल पै काकोडे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.

‘गोवादूत’चा सत्कार
या चतुर्थ शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची माहिती देणारा वीस पानी खास विशेषांक ‘गोवादूत’ने आज प्रकाशित करून तो महालसा संस्थानात उपलब्ध केला होता. गोवादूतच्या या कार्याचीही यावेळी जाहीर प्रशंसा करण्यात आली. हा विशेषांक प्रकाशित करून ‘गोवादूत’नेही उत्सवास जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल ‘गोवादूत’चाही यावेळी स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘गोवादूत’चे संचालक सागर अग्नी व ज्योती धोंड यांनी हा सत्कार स्वीकारला.

No comments: