Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 21 December, 2010

ज्येष्ठ साहित्यिक सुभाष भेंडे निवर्तले

मुंबई, दि. २० (वृत्तसंस्था)
ज्येष्ठ साहित्यिक, अर्थतज्ज्ञ व कराड येथे झालेल्या ७६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुभाष भेंडे यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.
वांद्रे येथील साहित्य सहवासातील निवासस्थानीच आज पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने गुरुनानक इस्पितळात नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. सुभाष भेंडे हे मूळचे गोव्याचे. १४ ऑक्टोबर १९३६ रोजी त्यांचा जन्म झाला. विनोदी लेखनाबरोबरच गंभीर लेखनावरही त्यांचे प्रभुत्व होते. गोवा मुक्तीनंतरच्या काळात जे अनेक लेखक-कवी पुढे आले त्यात डॉ. सुभाष भेंडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. गोमंतकीय साहित्यावरील रोमँटिसिझमचा प्रभाव पुसणार्‍यांपैकीच ते एक होते. प्रादेशिकतेच्या मर्यादेत न राहता त्यांनी केलेल्या कादंबरी लेखनातील आशयात लक्षणीय विविधता आढळते. २००३ साली कराड येथे झालेल्या ७६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
विनोदी लिखाणाबरोबरच त्यांनी अर्थशास्त्रासारख्या किचकट विषयातही तेवढ्याच समर्थपणे लेखणी चालविली. अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळविलेल्या सुभाष भेंेडे यांचे अर्थशास्त्रातील गुरू होते स्व. धनंंजयराव गाडगीळ.
डॉ. सुभाष भेंडे यांची साहित्य संपदा : साहित्य संस्कृती, किनारा, पितळी दरवाजा, निवडक गंभीर आणि गमतीदार, प्रा. धनंजयराव गाडगीळ : व्यक्ती व कर्तृत्व, हास-परिहास, उद्ध्वस्त, नेपोलियननंतर तुम्हीच, जोगीण, अंधारवाटा, पैलतीर, हसवेगिरी, द्राक्ष आणि रुद्राक्ष, स्मितकथा, मार्ग सुखाचा आदी.

No comments: