Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 22 December, 2010

जुझेंना वाचवण्यासाठी हळर्णकरांचा बळी!

मिकींना शह देण्यासाठी कॉंग्रेसची नियोजित खेळी
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): मुरगाव पालिका निवडणूक प्रचारावेळी महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी माजी पर्यटनमंत्री तथा बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांच्यावर हात उगारल्याच्या घटनेची गंभीर दखल राष्ट्रवादी कॉंग्रेस श्रेष्ठींनी घेतली होती. मुरगावमधील या घटनेनंतर कॉंग्रेसमधील मिकी विरोधकांशी जुझे यांनी जमवलेले सूत श्रेष्ठींच्या कानावर पोहोचल्यानेच त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याचे निश्‍चित झाले होते, अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. मात्र जुझे यांना या गंडांतरातून वाचवण्यासाठीच कॉंग्रेसने पक्षाचे सरचिटणीस विजय सरदेसाई यांना म्होरक्या बनवून पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांना बळीचा बकरा बनवले, अशी जोरदार चर्चा सध्या राष्ट्रवादीत सुरू आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींनी पक्षाचे मंत्री जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांना राजीनामा सादर करण्याचे आदेश देऊन ४८ तास उलटले तरीही उभयतांनी अद्याप या आदेशाचे पालन केलेले नाही. मिकी पाशेको यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी जुझे फिलिप डिसोझा यांचे मंत्रिपद काढून घेण्याचे ठरले आहे; पण या कटात नीळकंठ हळर्णकर यांनाही हकनाक गोवून कॉंग्रेसच्या एका गटाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला खिंडार पाडण्याची व्यूहरचना आखल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, नीळकंठ हळर्णकर यांनी जुझे फिलिप डिसोझा यांची साथ सोडावी, असा संदेश पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. मात्र हा प्रकार म्हणजे जुझे फिलिप डिसोझा यांचा विश्‍वासघात ठरेल व त्यामुळे आता माघार नाही, असा पवित्रा नीळकंठ हळर्णकर यांनी घेतल्याने ते या कटात सर्वस्वी फसले गेल्याची भावना राष्ट्रवादीच्या गोटात पसरली आहे.
दक्षिण गोव्यात कॉंग्रेसचे सरचिटणीस विजय सरदेसाई हे पक्षांतर्गत राजकारणाचे मुख्य सूत्रधार बनण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या दोन्ही मंत्र्यांना गुप्त बैठकीचे आमंत्रणदेऊन त्यांना पाचारण केले खरे; परंतु या बैठकीची छायाचित्रे व वृत्त पत्रकारांमार्फत सर्वत्र पसरवून कॉंग्रेसच्या या गटाने जुझे फिलिप यांच्यासह नीळकंठ हळर्णकर यांनाही या कटात पद्धतशीरपणे गोवले. मिकी पाशेको यांना विरोध करण्यासाठी पक्षाचे दोन्ही मंत्री एकत्र आहेत असाच आभास या राजकीय नाट्यातून तयार करण्याचा हा मुत्सद्दी डाव आखला गेला, अशीही खात्रीलायक माहिती समोर आली आहे. नीळकंठ हळर्णकर हे राजकारणात नवखे आहेत व त्यामुळे नियोजित पद्धतीने त्यांना या कटात ओढून कॉंग्रेसकडून राष्ट्रवादीला शह देण्याचीच खेळी रचली गेली, अशी राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांची भावना बनली आहे.

No comments: