Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 25 December, 2010

नार्वेकरांविरुद्ध म्हापसा पोलिसांत गुन्हा नोंद

मुलाच्या जन्मदाखल्यात फेरफार!
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)
खोटी माहिती देऊन मुलाच्या जन्मदाखल्यात फेरफार केल्याची पोलिस तक्रार माजीमंत्री तथा गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. दयानंद नार्वेकर यांच्याविरुद्ध म्हापसा पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. डॉ. शेखर साळकर यांनी ही तक्रार केली असून पोलिसांनी ऍड. नार्वेकर यांच्यासह त्यांची पत्नी सौ. सुषमा नार्वेकर, मुलगा गणेशराज ऊर्फ अनिश, बार्देश तालुक्याचे कार्यकारी न्यायदंडाधिकारी पी आर. बोरकर आणि म्हापसा पालिकेचे जन्ममृत्यू नोंदणी अधिकारी यांच्याविरोधात ‘भा.द.सं’च्या ४५५, ४६७, ४६८ कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. गेल्या महिन्यात सादर केलेल्या या तक्रारीची आज नोंद करून घेण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍड. नार्वेकर यांनी आपला मुलगा गणेशराज याला क्रिकेटमध्ये विशिष्ट वयोगटातील सामन्यांत खेळवणे शक्य व्हावे यासाठी त्याची जन्मतारीख बदलली आहे. तसेच, जन्माचे ठिकाणही बदलले आहे. हे फेरफार करण्यासाठी त्यांनी प्रतिज्ञापत्रावर खोटी शपथ घेऊन ही माहिती दिल्याचे डॉ. साळकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. गणेशराज याची जन्मतारीख २८ फेब्रुवारी १९९३ अशी असून त्याचा जन्म पर्वरी येथील चोडणकर नर्सिंग होममध्ये झाला होता. मात्र ही जन्मतारीख बदलून ती १ सप्टेंबर १९९३ करण्यात आली. तसेच, जन्म म्हापसा येथे झाला असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली. हे प्रतिज्ञापत्र म्हापसा पालिकेच्या जन्ममृत्यू नोंदणी अधिकार्‍याने आणि बार्देश तालुक्याचे कार्यकारी न्यादंडाधिकार्‍याने ग्राह्य धरून त्यांना जन्मदाखल बदलून दिला. हा जन्मदाखला त्यांनी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात सादर केल्याचे तक्रारीत पुढे म्हटले आहे.
प्राथमिक चौकशीत यात तथ्य आढळून आल्याने म्हापसा पोलिसांनी तक्रारीत नमूद केलेल्या सर्व संशयितावर गुन्हा नोंदवला आहे. संशयितांची चौकशी केली केली जाणार असल्याचे म्हापसा पोलिसांनी सांगितले. याविषयीचा अधिक तपास म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजेश कुमार करीत आहेत.

No comments: