Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 16 May, 2010

मद्यार्क घोटाळ्यातील अनेकांचे धाबे दणाणले

महत्त्वाची कागदपत्रे आणि संगणक जप्त
नवनियुक्त अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांचा दणका
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी पर्दाफाश केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बेकायदा मद्यार्क घोटाळ्याची सगळी सूत्रे वास्को येथील अबकारी कार्यालयातून फिरत होती. वास्को अबकारी कार्यालयाचे निरीक्षक वामन सापेरकर यांच्या कार्यालयीन संगणकावरून पंजाब, उत्तरप्रदेश, आसाम आदी राज्यांतून विविध कथित कंपन्यांच्या नावाखाली मद्यार्क आयातीचे अर्ज व इतर पत्रव्यवहार झाल्याची खात्रीलायक माहिती उघडकीस आली आहे. नवनियुक्त अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने केलेल्या कारवाईत सदर संगणक व इतर काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
प्राप्त माहितीनुसार पी. एस. रेड्डी यांनी खात्यातील सर्वच व्यवहारांवरील आपली पकड घट्ट करताना खात्याचा कारभार सुधारण्यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे. अबकारी आयुक्तपदाचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी लगेच अनेक अबकारी निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश जारी करून अनेकांची नव्या ठिकाणी रवानगी केली आहे. वास्को अबकारी कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या एका अबकारी निरीक्षकाला कार्यालयीन संगणकावर अनेक संशयास्पद व्यवहारांची माहिती सापडली. त्यांनी तात्काळ ही माहिती अबकारी आयुक्तांच्या नजरेस आणून दिल्यानंतर या सर्व माहितीचा थेट संबंध पर्रीकर यांनी पर्दाफाश केलेल्या बेकायदा मद्यार्क आयात घोटाळ्याशी जुळत असल्याचे दिसून आले आहे. संगणकावरील ही माहिती उघड झाल्याचे लक्षात येताच वास्को अबकारी निरीक्षक वामन सापेरकर यांना घामच फुटला. त्यांनी यासंबंधीची संपूर्ण माहिती देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. पर्रीकर यांनी विधानसभेत या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे सादर केली होती. मुरगाव- जुवारीनगरस्थित "इंडो आशा लंका' व "वास्को द गामा डिस्टीलरी' या कंपनीच्या नावाखाली बेकायदा मद्यार्क आयातीचा व्यवहार झाल्याचे या कागदपत्रांतून उघड झाले होते. मुळात या दोन्ही मद्य उत्पादन कंपन्या सध्या मंदावल्या आहेत व त्यांच्याकडून केवळ नाममात्र अबकारी कर गोळा होतो, अशी माहिती खुद्द सरकारने विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली होती. पर्रीकर यांनी मात्र पंजाब व इतर काही राज्यांतील अबकारी खात्यांकडून माहिती अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीनुसार या दोन्ही कंपनीच्या नावाखाली लाखो लिटर मद्यार्क राज्यात आयात केल्याची यादीच सादर करून सर्वांना चकित केले होते. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्यांच्या नावाखाली मद्यार्क आयात करण्यासाठी झालेल्या पत्रव्यवहारांचा तपशील वास्को कार्यालयातील संगणकावर सापडल्याने या घोटाळ्यात थेट अबकारी खात्याचे अधिकारीच गुंतले असण्याची शक्यता बळावली आहे. या घोटाळ्यात आंतरराज्य टोळीच कार्यरत असून त्यांचा हा छुपा व्यवहार अत्यंत नियोजनबद्ध रीतीने सुरू आहे, अशीही शक्यता खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
दरम्यान, या वादग्रस्त कंपनीच्या नावाखाली नेमके मद्यार्क आयात करण्यासाठीचे अर्ज कुणी केले. त्यांनी आयातीसंदर्भात बनावट परवाने मिळवले कसे व या आयातीसाठीचे कोट्यवधी रुपये नेमके कुणी अदा केले, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारचा कोट्यवधींचा कर बुडवून सर्रासपणे सुरू असलेल्या या व्यवहाराचे सूत्रधार कोण हे आता लवकरच उघड होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी त्या दृष्टीने आपल्या हालचाली वेगवान केल्या असल्या तरी त्यांना सरकारकडून कितपत सहकार्य मिळते यावरच पुढील चौकशीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. या घटनेसंबंधी माहिती मिळवण्यासाठी श्री. रेड्डी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते वैयक्तिक कामानिमित्त राज्याबाहेर गेल्याचे कळते.
गोव्यातून पत्रादेवी सीमेवरून मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्य वाहतूक होत असल्याचे प्रकरण उघडकीस येताच श्री. रेड्डी यांनी पत्रादेवी अबकारी तपासनाक्याचे प्रभारी अबकारी उपनिरीक्षक श्रीकांत वळवईकर यांना तात्काळ निलंबित केले होते. पाठोपाठ वास्को अबकारी कार्यालयातील हा प्रकार उघडकीस आल्याने पुढील आठवड्यात आणखी काही अबकारी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत या कारवाईसंबंधी कोणती भूमिका घेतात हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.

No comments: