Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 17 May, 2010

सीरियल्समध्ये महिलांचे अवास्तव चित्रण - रिमा

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - सध्या विविध इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांवर सुरू असलेल्या अनेक "सीरियल्स'मध्ये बायका कटकारस्थाने रचतात, शिवाय त्या नखरेल दाखवल्या जातात; हे पूर्ण चुकीचे आणि अवास्तव आहे, अशी तीव्र नाराजी आज "तू तू मै मै' फेम प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांनी व्यक्त केली. त्या आज कला अकादमीच्या ब्लॅकबॉक्समध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतीत मिश्किल शैलीत बोलत होत्या. "तू तू मै मै' मालिकेतील माझ्या सासूच्या भूमिकेमुळे अनेक घरातील पुरुष "रिलॅक्स' झालेत, असे अनुभव ऐकायला मिळाले. एके दिवशी जगप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी मात्र सुनेला इतक्या मिठ्या मारून तिचे एवढे गालगुच्चे घ्यायलाच पाहिजेत काय, असा खोचक प्रश्नही मला विचारल्याचीही आठवण रिमा यांनी उपस्थित श्रोत्यांना सांगितली.
मी वयाच्या चौदाव्या वर्षी रंगभूमीवर प्रवेश केला. अनेक नाटके केली "सीरियल्स'मध्येही काम केले. मात्र याच क्षेत्रात करिअर करीन असे तेव्हा वाटले नव्हते. जेव्हा मला "मैने प्यार किया' हा चित्रपट मिळाला आणि तो तुफान गाजला तेव्हा या क्षेत्रात झोकून देण्याचा निर्णयावर मी ठाम झाले. युनियन बॅंकेत असलेल्या नोकरीवर पाणी सोडले आणि अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. सुरुवातीला या भव्य समुद्रात अनेक गंटागळ्या खाल्ल्यात. समुद्राचे खारे पाणी तोंडा नाकातही गेले, असे अनुभव त्यांनी कथन केले.
या मायानगरीत मला काही चांगली माणसेही भेटली. भक्ती कुलकर्णी, चंद्रकांत गोखले, विक्रम गोखले, निळू फुले, लालन सारंग, दामू केंकरे, सई परांजपे, जयंत दळवी, अमोल पालेकर पु ल. देशपांडे अशा दिग्गजांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सुरुवातीला नाटकाच्या तालीम आणि प्रयोगामुळे महाविद्यालयात जाणे जमत नव्हते. त्यामुळे मुक्त विद्यापीठातून महाविद्यालयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या दरम्यान नाटके सुरूच होती, असे त्यांनी सांगितले.
१९७८ नंतर छोट्या पडद्यावर प्रवेश केला, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. चित्रपटांच्या सतत चित्रीकरणामुळे घुसमट व्हायला लागली. त्यावेळी मी पुन्हा रंगमंचावर प्रवेश केला. गुजराती, इंग्रजी, हिंदी, मराठी अशा अनेक नाटकांत त्यांनी भूमिका बजावल्यात. "ती फुलराणी' हे माझे पहिले व्यावसायिक नाटक होते. या नाटकाचा संपूर्ण प्रवास म्हणजे माझे "सोनेरी दिवस' होते, असे त्यांनी नमूद केले.
गोव्यात आधी झापांच्या मंडपातील रंगमंचावर नाटके व्हायची. त्यावेळी रंगमंचावर अनेक किस्से घडायचे. एकादा तर एक नट रंगमंचाची फळी घसरून अर्धा खाली गेला होता. मात्र त्यावेळी प्रेक्षकांना ही एक नवीन "ट्रिक' असावी असे समजून लोकांनी टाळ्या पिटल्या अशी आठवण त्यांनी सांगितली. त्यावेळी उपस्थित प्रेक्षकांतही हास्याची लकेर उमटली. एकूणच ही दिलखुलास मुलाखत अत्यंत रंगतदार ठरली.

No comments: