Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 21 May, 2010

खवळलेल्या पर्वरीवासीयांची पाण्यासाठी पणजीत धडक

मुख्य अभियंत्यांना घेतले फैलावर

पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - पाच दिवसांपासून पाण्याचा एक थेंबही नळाला आला नसल्याने खवळलेल्या नागरिकांनी आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आल्तिनो येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंते श्री. चिमुलकर यांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरले. तसेच, येत्या ३० मेपर्यंत पर्वरी भागात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास बांधकाम खात्यासमोर तसेच पर्वरी भागात पाणीपुरवठा विभागाचे काम पाहणाऱ्या अभियंत्यांच्या घरासमोर आंघोळ केली जाईल, असा इशारा पर्वरीवासीयांनी दिला आहे.
या इशाऱ्यानंतर येत्या ३० मेपर्यंत पाणीपुरवठा व्यवस्थित केला जाईल, असे आश्वासन श्री. चिमुलकर यांनी दिले. तसेच, तोपर्यंत जादा टॅंकर पाठवून पाणीपुरवठा केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, पर्वरी येथे असलेल्या पाणीपुरवठा केंद्रात पूर्णवेळ साहाय्यक तसेच कनिष्ठ अभियंत्याची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून येथील लोकांना आंघोळीसाठी सोडाच पिण्यासाठीही पाणी उपलब्ध झालेले नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम खात्यावर ताशेरे ओढूनही बांधकाम खात्याने त्यावर कोणतीच उपाययोजना आखलेली नाही. आज आम्ही आमच्यावर ओढवलेली परिस्थिती कथन करण्यासाठी आलो आहोत. दुसऱ्यावेळी येथे येऊन आंघोळ करणार आणि तुम्हालाही घालणार, असा इशारा याप्रसंगी पर्रीकर यांनी मुख्य अभियंत्यास दिला.
व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याने यावेळी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांनी भाग घेतला होती. पर्वरी येथे पाणीपुरवठा केंद्रात साहाय्यक अभियंता उपलब्ध होत नसल्याने तसेच पाणी कधी येणार, याची माहिती मिळवण्यासाठी दूरध्वनी केल्यास तो उचलण्यासाठी कोणीही तेथे उपलब्ध नसतो. त्यामुळे आल्तिनो येथील मुख्यालयावर ही धडक दिली असल्याचे श्री. पर्रीकर म्हणाले.
नळ जोडणी देण्यासाठी साहाय्यक अभियंता मंत्र्याचे नाव सांगून २५ हजार रुपये मागणी करतो, असा आरोप पर्वरीवासीयांनी केला. तसेच "चर्चिल ब्रदर्स'चे फुटबॉलपटू पर्वरी येथे राहत असून त्यांना दर दिवशी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र लोकांनी टॅंकरची मागणी केल्यास आठवडाभर टॅंकर उपलब्ध होत नाही, अशी माहिती किशोर अस्नोडकर यांनी मुख्य अभियंत्यास दिली.
यावेळी मोठ्याप्रमाणात पोलिस फौजफाटा ठेवण्यात आला होता. पणजी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर, पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर, आगशि पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेष कर्पे, जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त व अन्य पोलिस उपस्थित होते.
.. सोमवारपर्यंत मुदत ः पर्रीकर
पर्वरी पठारावर नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाहीत. त्यामुळे तेथे लक्षपूर्वक पाणीपुरवठा करावा लागतो. सध्या सरकारचे अर्धे मंत्रिमंडळ विदेशात असून जनतेकडे लक्ष देण्यासाठी कोणीच उपलब्ध नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव हेही काही दिवसांपूर्वी विदेशात होते. वाढदिवस असल्याने ते गोव्यात आले आहे. येत्या सोमवारपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. तरीही बांधकाम खात्याने यावर योग्य तोडगा न काढल्यास कडक भूमिका घेतली जाणार असल्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

No comments: