Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 18 May, 2010

मडगाव स्फोटप्रकरणी आरोपपत्र दाखल

३० पानी कागदपत्रांत "सनातन'वर थेट ठपका नाही

मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पूर्वसंध्येला मडगावात झालेला स्फोट व सांकवाळ येथे सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी सदर घटना घडल्यानंतर तब्बल सात महिन्यांनी आज राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ११ जणांविरुद्ध येथील प्रधान सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात आरोपपत्र सादर केले.
एकूण ३० पानांच्या या आरोपपत्रासोबत पुराव्यादाखल चार हजारांवर कागदपत्रे जोडली असून त्यात २५० साक्षीदारांची नावे दिली आहेत. "एनआयए'चे अधीक्षक विजयन हे आज जातीने न्यायालयात हजर होते. या आरोपपत्राचे वैशिष्ट्य म्हणजे मडगाव स्फोटानंतर काही लोकांनी त्याच्याशी संबंध जोडून ज्या सनातन संस्थेविरुद्ध रान उठवले होते व तिच्यावर बंदी घालण्यासाठी सरकारवर दबाव आणला होता त्या सनातन संस्थेवर आरोपपत्रात कोठेही ठपका ठेवण्यात आलेला नाही. उलट ती सर्वस्वी कट्टरपंथी हिंदू संघटना असल्याचे म्हटले आहे. ११ पैकी जे सहा संशयित आरोपी आहेत ते या संस्थेचे सदस्य असून त्यांचा राबता सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात होता, असे नमूद केले आहे.
मडगाव स्फोटानंतर मृत्युमुखी पडलेले मालेगौडा पाटील व योगेश नाईक तसेच विनय तळेकर, विनायक पाटील, धनंजय अष्टेकर, दिलीप माणगावकर, जयप्रकाश अण्णा, रुद्रा पाटील, सारंग अंकलकर, प्रशांत अष्टेकर व प्रशांत जुवेकर यांना आरोपी करण्यात आले आहे. त्यांपैकी मालेगौडा पाटील व योगेश हे हयात नाहीत. पाच जण अजून फरारी आहेत आणि उरलेले चौघे पोलिस कोठडीत आहेत.
आज हे आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे सकाळपासूनच सत्र न्यायालयाच्या आवारात माध्यमांच्या प्रतिनिधींनी तळ ठोकला होता. प्रत्यक्षात आरोपपत्राचा तपशील मिळेपर्यंत सायंकाळ उलटून गेली. आज आरोपींपैकी कोणालाही न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते.
खास सरकारी वकील फारीया यांनी नंतर दिलेल्या आरोपपत्रातील तपशिलानुसार मडगाव स्फोटाचा सूत्रधार म्हणून मालेगौडा पाटील व योगेश नाईक यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आला आहे. त्यांनी या स्फोटाचा कट रामनाथी येथील सनातन आश्रमात शिजविला. त्यासाठी मालेगौडा व धनंजय अष्टेकर यांनी देशाच्या विविध भागांतून सामुग्री गोळा केली व त्यातून स्फोटके तयार करून ती वापरली. त्यांनी जीए०५ ए ७८०० या वाडी-तळावली येथील सुरेश नाईक याच्या मालकीच्या स्कूटरमधून ती दिवाळीच्या पूर्वसंध्येला मडगावात आणली व "रिलायन्स प्लाझा'समोर ती ठेवली व तेथेच त्या स्फोटकांचा स्फोट झाला.
आरोपपत्रातील तपशिलानुसार स्फोट घडविण्यामागील उद्देश स्पष्ट होता. नरकासूर स्पर्धा आयोजित करून नरकासूराचा उदोउदो करणे त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे श्रीकृष्णाचे अवमूल्यन होते. म्हणून अशा स्पर्धांना विरोध करून दहशत फैलावणे व नरकासूर स्पर्धेचे आयोजक, सहभागी झालेले स्पर्धक आणि प्रेक्षक यांना इजा पोचवणे हा त्यामागील हेतू होता. या स्फोटाची पूर्वतयारी आरोपींनी फार आधी केली होती. त्यासाठी ऑगस्ट २००९ पर्यंत सारी सामुग्री विविध भागांतून गोळा केली होती, असे नमूद करताना सेकंड हॅंड मोबाईल, बॅटरी, टेप,घड्याळ,अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू , आयडी वगैरे मुंबई-कोल्हापूर येथून मिळवल्या होत्या. या वस्तू ज्यांच्याकडून मिळविल्या गेल्या त्याचे पुरावे कागदपत्रांच्या रूपात जोडले आहेत असे या आरोपपत्रात म्हटले आहे.
सनातन ही कट्टर हिंदुत्ववादाचा प्रसार करणारी संस्था असून या कट्टरवादाचे मार्शल प्रशिक्षण तिच्यातर्फे वाळपई येथील आश्रमात दिले जात होते. या आरोपपत्रांतील बहुतेक आरोपींनी ते तेथे जाऊन घेतलेले असले तरी या स्फोटात सदर संस्था गुंतल्याचा पुरावा मिळालेला नाही, असा दावा त्यात करण्यात आला आहे.
मडगाव प्रकरणातील म्होरक्या गणला गेलेले मालेगौडा पाटील याने वाळपई तसेच अन्य भागात प्रशिक्षण घेतले. नंतर रामनाथी आश्रमातच सनातनचे प्रमुख श्री. आठवले यांच्या खोली शेजारच्या खोलीत त्यांच्या बैठका होत होत्या. त्यावरून तेथेच हे कारस्थान शिजले त्यावेळी मालेगौडाचा तब्बल दहा दिवस तेथे मुक्काम होता असे आरोपपत्रात म्हटले आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या १२० ब, १२१ अ,अ ११,१६,१८२०,३४,५,६ कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. सर्व आरोपांचे स्वरूप कट रचणे, इतरांच्या जीवितास हानी पोचविण्याचा प्रयत्न करणे असे आहेत. त्यात जातीय कलह माजवणे व दंगे माजवण्याच्या प्रयत्नांचा ठपका नाही.
दिवाळीच्या पूर्व संध्येला म्हणजेच १६ ऑक्टोबर २००९ रोजी रात्री हा स्फोट झाला होता. त्यात ठार झालेले उभयता सनातनचे सदस्य असल्याने या प्रकरणाशी त्या संस्थेचा संबंध जोडून काहींनी त्या संस्थेविरुद्ध काहूर माजवले होते. तथापि, तपास संस्थांनी चौकशीअंती त्या संस्थेविरुद्ध पुरावा नसल्याचे स्पष्ट करूनही ही मंडळी शांत झाली नव्हती. उलट संधी मिळेल तेव्हा ती सनातनचे नाव घेताना दिसत होती.
या प्रकरणाचा तपास प्रथम मडगाव पोलिसांनी केला व नंतर सरकारने ते प्रकरण खास तपास संस्थेकडे सोपवण्यात आले. नंतर केंद्राच्या निर्णयानुसार ते राष्ट्रीय तपास संस्थेकडे गेले व त्यांनी सात महिन्यांत आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी अटक केलेल्या चौघांच्या कोठडीतील १८० दिवसांची मुदत उद्या ं१८ मे रोजी संपत होती व त्यांना न्यायालयाने मुक्त करू नये म्हणून आज हे आरोपपत्र दाखल होणे आवश्यक होते.

No comments: