Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 28 September, 2010

गोमेकॉ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील लाखोंची विमा रक्कम "गायब'

तिस्क उसगाव, दि.२७ (प्रतिनिधी)- गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील डॉक्टर ते शिपायांपर्यंत सर्वच कर्मचाऱ्यांच्या वेतनातील विम्याचा हप्ता म्हणून कापून घेण्यात आलेली जून ते सप्टेंबर या काळातील रक्कम अद्याप संबंधित खात्यातर्फे विमा आस्थापनात भरण्यात आलेली नाही. यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. ही माहिती संबंधित सरकारी सूत्रांनी आज दिली. या प्रकाराची सरकारी पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील डॉक्टर ते शिपायापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनातील काही रक्कम दर महिन्याला विम्याचा हप्ता म्हणून कापून घेण्यात येते. ही एकूण रक्कम सुमारे वीस लाख रुपये एवढी भरते. मार्च ते सप्टेंबर पर्यंतचा कर्मचाऱ्यांच्या विम्याचा हप्ता संबंधित खात्यातर्फे भरण्यात आला नव्हता. मात्र वेतनातील रक्कम मात्र कापून घेण्यात येत होती. गेल्या महिन्यात डॉक्टरपासून शिपायापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना या संदर्भात विमा आस्थापनाकडून स्मरणपत्रे आल्यानंतर कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे या संदर्भात चौकशी केल्यानंतर गेल्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मार्च ते मे २०१० पर्यंतची विम्याची रक्कम संबंधित खात्यातर्फे भरण्यात आली. मात्र जून ते सप्टेंबरपर्यंतच्या विम्याच्या रकमेचा भरणा अद्यापही झाला नसल्याची माहिती पुढे आली आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात एकूण दो हजार कर्मचारी आहेत. प्रति महिना वीस लाख यानुसार गेल्या चार महिन्यांची एकूण सुमारे ८० लाख रुपये एवढी प्रचंड रक्कम भरण्यात न आल्याने या प्रकरणाची ज्येष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी संबंधित डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

No comments: