Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 29 September, 2010

अयोध्येचा उद्या निकाल

दुपारी ३.३०ची वेळ निश्चित - देशात सर्वत्र सतर्कतेचा इशारा
सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली

नवी दिल्ली/लखनौ, दि. २८ : सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या मालकी हक्काबाबत गेल्या ६० वर्षांपासून अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुरू असलेल्या खटल्याच्या निकालाचा मार्ग मोकळा झाला असून सर्वोच्च न्यायालयाने निकालावरील स्थगिती उठवल्यानंतर लगेचच ओएसडी हरी शंकर दुबे यांनी लखनौ येथे, या खटल्याचा निकाल आता येत्या गुरुवार ३० सप्टेंबरला दुपारी साडेतीन वाजता जाहीर केला जाईल, असे सांगितले.
सरन्यायाधीश न्या. एस. एच. कपाडिया, न्या. के. एस. राधाकृष्णन् व न्या. आफताब आलम यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज ही सुनावणी केली. खंडपीठाने या वादाशी संबंधित सर्व पक्षकारांची बाजू दोन तास ऐकून घेतल्यानंतर, त्रिपाठी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका कोणतेही कारण न देता फेटाळण्याचा निर्णय जाहीर केला.
अयोध्याप्रकरणी हिंदू महासभा व सुन्नी वक्फ बोर्ड या दोन प्रमुख पक्षकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरील अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल गेल्या २४ सप्टेंबर रोजी अपेक्षित होता. परंतु, माजी सनदी अधिकारी रमेशचंद्र त्रिपाठी यांनी हा निकाल पुढे ढकलावा, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने ती दाखल करून घेत त्यावर २८ सप्टेंबर रोजी सुनावणी करण्याचे सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला जवळपास आठवडाभरासाठी स्थगिती दिली होती.
निकालानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याने न्यायालयाबाहेर तोडगा काढण्यासाठी एक संधी देण्यात यावी व निकाल लांबणीवर टाकण्यात यावा, असे याचिकाकर्ता त्रिपाठींचे म्हणणे होते. निकाल लांबणीवर टाकण्यामागची पाच कारणेही त्यांनी याचिकेत नमूद केली होती. त्रिपाठींना फटकारताना न्यायालयाने कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास सरकार सक्षम असल्याचे म्हटले. तुम्हांला फारच उशिरा जाग आली असून तुम्ही न्यायालयाचा उगाच वेळ खात आहात, असेही न्यायालयाने त्रिपाठींना फटकारले. इतके दिवस तुम्ही गप्प का बसला होता? न्यायालयात हा वाद सुरू होता तेव्हाच आपण यावर आपले मत का दिले नाही, असेही न्यायालयाने म्हटले. तसेच इतर मुद्यांवर न बोलण्याची सूचना केल्यानंतर त्रिपाठींच्या वकिलांचा युक्तिवाद संपुष्टात आला. या वादावर न्यायालयाबाहेर सामोपचाराने तोडगा निघण्याची सुतराम शक्यता हिंदू महासभा व सुन्नी वक्फ बोर्डाने फेटाळून लावली होती. निर्मोही आखाड्यानेही आपली बाजू मांडताना साठ वर्ष आम्ही निकालाच्या प्रतीक्षेत असल्याचे म्हटले होते, तसेच हा वाद सामंजस्याने सोडविण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले असल्याने न्यायालयाचा निकाल अंतिम असेल असे म्हटले आहे. कुठल्याही स्थितीत निकाल पुढे ढकलू नये, अशी भूमिका हिंदू महासभेने मांडली. हा वाद सामोपचाराने सुटण्याची सुतराम शक्यता नसल्याने तो पुढे ढकलण्यात येऊ नये, अशी भूमिका सुन्नी वक्फ बोर्डाने घेतली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाची अधिकृत प्रत अलाहाबाद उच्च न्यायालयाला तातडीने पाठविण्यात आली आली. त्यानंतर येत्या गुरुवार ३० सप्टेंबरला दुपारी साडे तीन वाजता अयोध्येचा निकाल जाहीर करण्यात येईल, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धर्मवीर शर्मा १ ऑक्टोबरला निवृत्त होत आहेत. निवृत्त होण्यास शेवटचे काही तास बाकी असताना ते या अत्यंत महत्त्वाच्या खटल्याचा निकाल जाहीर करणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या या निकालात सर्वांत महत्त्वाची भूमिका जर कोणी बजावली असेल तर ती केंद्र सरकारने. ऍटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांना न्यायालयाने जेव्हा आपली भूमिका मांडण्यास सांगितले तेव्हा, ते म्हणाले की, या वादासंदर्भात जी अनिश्चितता निर्माण झाली आहे ती संपुष्टात यावी. वहानवटी यांनी जर निकाल पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडली असती वा त्रिपाठींच्या मुद्यांना पाठिंबा दर्शविला असता तर कदाचित अयोध्येचा निकाल आणखी लांबणीवर पडला असता. परंतु, सरकारने यात मुळीच रस न दाखविल्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा या संदर्भातील निकाल आता अटळ झाला.
-------------------------------------------------------------
रमेशचंद्र त्रिपाठी यांनी सादर केलेले मुद्दे :
१) दिल्लीत ३ ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर अयोध्या निकालाचा परिणाम होऊ शकतो.
२) उत्तरेत पुराने थैमान घातले आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे या समस्या सोडविण्यात केंद्राला अडचणी येऊ शकतात.
३) अमेरिकेत कुराण दहन केल्यामुळे विशिष्ट धर्माच्या लोकांमध्ये असलेला संताप यामुळे उफाळून येऊ शकतो.
४) २६/११ ला मुंबईवर झालेल्या हल्ल्याचाही या निकालाशी संबंध असल्याने निकाल तातडीने देणे धोकादायक आहे.
५) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अयोध्या निकालामुळे देशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
--------------------------------------------------------------
आता तीन न्यायाधीशांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष!
अयोध्येतील वादग्रस्त जागेची मालकी कोणाची यासंदर्भातील निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला हिरवा कंदील दाखविल्याने आता सर्वांचे लक्ष उच्च न्यायालयाच्या ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागले आहे. या विशेष खंडपीठात तीन न्यायाधीश असून त्यांत न्या. धर्मवीर शर्मा, न्या. सुधीर अग्रवाल व न्या. एस. यू. खान यांचा समावेश आहे.
या खटल्याची सुनावणी करण्यासाठी १० जुलै १९८९ रोजी खंडपीठाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आत्तापर्यंत यात १४ वेळा बदल झाले. या विशेष खंडपीठाने यासंदर्भातील पहिली सुनावणी ७ ऑगस्ट १९८९ रोजी केली.
पहिल्या विशेष पीठात न्या. के. सी. अग्रवाल, न्या. यू.सी. श्रीवास्तव व न्या. एस. एच. ए. रिजवी होते. एक वर्षानंतर हे पीठ बदलण्यात आले.
१९९३ साली हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि १९९५ मध्ये पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे परत आले. परत आल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीठात न्या. ए. पी. मिश्रा, न्या. अब्दुल रहीम चौधरी व न्या. आय. पी. वसिष्ठ होते. सध्याच्या विशेष पीठाच्या आधी न्या. सैय्यद रफत आलम, न्या. सुधीर अग्रवाल व न्या. धर्मवीर शर्मा यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती.
विशेष पीठाने २६ जुलै रोजी अयोध्या वादाची सुनावणी पूर्ण करून निकाल सुरक्षित ठेवला.
------------------------------------------------------------------
अयोध्येचा वाद आहे तरी काय?
गेल्या ६० वर्षांपासून अयोध्या वाद अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुरू असून येत्या गुरुवार ३० सप्टेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे. तीन न्यायमूर्ती असलेल्या या खंडपीठातील एक न्यायमूर्ती १ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यापूर्वीच खटल्याचा निकाल देणे अपेक्षित आहे.
समजा असे झाले नाही तर पुन्हा एकदा नव्याने वेगळे खंडपीठ स्थापन करावे लागेल व संपूर्ण खटला पुन्हा एकदा नव्याने सुरू करावा लागेल. या खटल्याला आता आणखी वेळ लागू नये म्हणून निकाल लवकरात लवकर लागावा, अशीच सर्वांची अपेक्षा आहे. हा निकाल तसा २४ सप्टेंबरलाच लागला असता परंतु निवृत्त सरकारी अधिकारी रमेशचंद्र त्रिपाठी यांनी हा निकाल लांबवण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ती सर्वोच्च न्यायालयानेे आज फेटाळून लावली आहे.
यानंतर आता अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ विशेष खंडपीठाला अयोध्या वादाचा निकाल द्यावयाचा आहे. यात प्रामुख्याने वादग्रस्त जमिनीची मालकी कोणाकडे आहे? श्रीरामाचा जन्म याच ठिकाणी झाला होता का? आणि जर मंदिर पाडून या जागी मशीद बांधण्यात आली असेल तर ते योग्य आहे का? या महत्त्वपूर्ण मुद्यांवर निकाल देण्यात येणार आहे. येत्या गुरुवार ३० सप्टेंबर घोषित होणाऱ्या या निकालाकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
देशभरात 'हाय अलर्ट' जारी
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी हायकोर्टाच्या निकालाला हिरवी झेंडी दाखविल्याने ३० रोजी जाहीर होणाऱ्या या निकालाच्या दृष्टीने देशातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोपरी ठरला आहे. या कारणानेच आज केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी तातडीने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि ३० तारखेला अयोध्या प्रकरणाचा हायकोर्टात निकाल लागणार हेही स्पष्ट झाले. या घडामोडी होताच चिदंबरम यांनी गृहमंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा जातीने आढावा घेतला. या बैठकीला गृहमंत्रालयातील सर्व उच्चाधिकारी तसेच गुप्तहेर संघटनांचे प्रमुखही उपस्थित होते.
सहा राज्ये अतिसंवेदनशील
आजच्या बैठकीत गृहमंत्रालयाने सहा राज्ये अतिसंवेदनशील घोषित केली आहेत. त्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, केरळ, तामिळनाडू यांचा समावेश आहे.
देशातील ३२ ठिकाणे संवेदनशील
गृहमंत्रालयाने तातडीने घेतलेल्या आढावा बैठकीत देशातील ३२ शहरांना संवेदनशील मानले आहे. त्यातील चार ठिकाणे उत्तरप्रदेशातील आहेत. मोठ्या विमानतळांजवळ तसेच महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात राहणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ पीठात होणाऱ्या निकालाच्या सुनावणीसाठी गृहमंत्रालयाने मागील आठवड्यात काही उपाययोजना केल्या होत्या. त्यांची नव्याने अंमलबजावणी सुरू झाली आहे.
निकालाच्या दिवसापासून राष्ट्रकुलच्या आयोजनस्थळालाही विशेष सुरक्षा प्रदान केली जाणार आहे. खेलग्राम तसेच स्टेडियमच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
----------------------------------------------------------
अयोध्या निकाल प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाने अनिश्चितता संपवली : भाजप

नवी दिल्ली, दि. २८ : अयोध्या प्रकरणातील हायकोर्टाचा निकाल लांबणीवर न टाकण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असून आजच्या निकालाने याविषयीच्या सर्व अनिश्चितता संपविल्या आहेत. पण, गुरुवारी येणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांनी शांतता आणि सौहार्द कायम राखले पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीने केले आहे.
भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. आजच्या या निकालाने देशातील अनिश्चिततांना पूर्णविराम दिला आहे. गुरुवारी हायकोर्टाचा निकाल येणार आहे. तो निकाल काय असावा, हे सांगण्याचे काम आमचे नाही आणि कोणाचेही नाही. निकाल आल्यावरच त्यावरील प्रतिक्रिया देऊ. त्यापूर्वी त्याविषयी आमच्याकडून काही सांगणे अयोग्य आहे.
त्या निकालानंतरही काही न्यायालयीन प्रक्रियांना वाव राहणार आहे. त्यामुळे लोकांनी गुरुवारी येणाऱ्या निकालाने उत्तेजित न होता शांतता आणि सौहार्द कायम राखले पाहिजे, असे आवाहन जावडेकर यांनी पक्षाच्या वतीने केले.
भाजपच्या आणखी एक प्रवक्त्या निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आमच्या पक्षाला अयोध्या प्रकरणाचा निकाल लांबणीवर टाकणे अपेक्षितच नव्हते. त्यामुळे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आम्ही स्वागतच करू. आजच्या निकालाने हायकोर्टाच्या निवाड्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे, असेही त्या म्हणाल्या.
कॉंग्रेसकडूनही स्वागत
कॉंग्रेस पक्षानेही आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या स्वागत केले आहे.
पक्षाचे महासचिव जनार्दन द्विेवेदी म्हणाले की, आम्ही या निकालाचे स्वागतच करतो. अयोध्या प्रकरणी एकतर सामोपचाराने तोडगा काढावा किंवा न्यायालयाच्या निर्णयाचा आदर व्हावा, अशी भूमिका आमच्या पक्षाने नेहमीच घेतली आहे. आजच्या निर्णयामुळे आता हायकोर्टाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. पण, त्या निकालाचा देशवासीयांनी स्वीकार करणे गरजेचे आहे. निकालानंतर देशात शांतता आणि सौहार्द राहील याची जबाबदारी नागरिक म्हणून प्रत्येकाची असल्याचेही द्विवेदी म्हणाले.
न्यायालयीन प्रक्रिया लांबविण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली : रा. स्व. संघ
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाऊन उच्च न्यायालयाचा निकाल लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, हा प्रयत्न केवळ न्यायालयीन प्रक्रिया लांबविण्याचा होता. आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने या प्रयत्नांना खीळ बसली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
रा. स्व. संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही भावना व्यक्त केली. ते म्हणाले की, आजच्या निकालामुळे अयोध्या प्रकरणातील खटल्याची न्यायालयीन प्रक्रिया एक पाऊल पुढे सरकली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेला तसा फारसा अर्थ नव्हता. त्यात स्थानिकांच्या जनभावनाही नव्हत्या. त्यामुळे ही याचिका फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने योग्य तो निवाडा केला आहे. ही याचिका फेटाळण्याच्याच लायकीची होती. आता ही याचिका फेटाळल्याने संपूर्ण देशाचे लक्ष गुरुवारी येणाऱ्या हायकोर्टाच्या निकालाकडे लागले आहे, असेही राम माधव म्हणाले.
अयोध्यावासीयांचा जीव भांड्यात पडला
सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालामुळे अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख निश्चित झाली. त्यामुळे अयोध्यावासी काहीसे समाधानी दिसले.
फजाबादच्या राममनोहर लोहिया अवध विद्यापीठातील अर्थशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. एस. सी. तिवारी म्हणाले की, अयोध्येतील प्रत्येकजण निकालाची वाट पाहतो आहे. यापूर्वी हा निकाल लांबणीवर पडल्याने साऱ्यांचीच निराशा झाली होती. आता निकाल आणखी लांबणीवर पडू नये एवढीच अपेक्षा आहे. आजच्या सर्वोच्च न्यायालयाची भूमिका स्वागतार्हच आहे.
मुळात अयोध्या-फजाबाद ही शहरे या निर्णयामुळे सर्वाधिक प्रभावित होणारी आहेत. जेव्हा-जेव्हा अयोध्या प्रश्न ऐरणीवर आला तेव्हा अयोध्येत संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली. एकदा हे प्रकरण निकालात निघाले की, कायमचा वाद मिटेल आणि अयोध्या तसेच आसपास शांतता राहील.
अशीच प्रतिक्रिया अयोध्येतील व्यापारी जनमेजय त्रिपाठी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, २४ सप्टेंबरच्या निकालामुळे मागच्या आठवडाभरापासून येथे अतिशय तणावाची स्थिती होती. लोकांचे मुक्तपणे फिरणेही कठीण होऊन बसले होते. या स्थितीमुळे अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांचीही संख्या रोडावली आहे. त्याचा परिणाम आमच्या उद्योगावर झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अयोध्येत केवळ पोलिस आणि पत्रकारच सक्रिय आहेत. बाकी सारेच थंड बस्त्यात होते. आता ही अनिश्चिततेची स्थिती कधी संपेल, याची वाट आहे.
अयोध्या खटल्यातील वकील काय म्हणतात..
अयोध्या प्रकरणातील निकाल लांबणीवर टाकण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर या मूळ प्रकरणाशी संबंधित सर्व वकील महोदयांनी दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाच्या होत्या.
रविशंकर प्रसाद
सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल अतिशय आश्वासक आहे. अयोध्या प्रकरणातील निकाल लवकर लागावा ही देशाचीच इच्छा होती. निकालानंतर लोक त्याचा खुल्या मनाने स्वीकार करतील, अशी आशाही आपण बाळगायला हरकत नाही. पण, हा निकाल लांबणीवर टाकण्यासाठी करण्यात आलेली याचिका संशयाला वाव देणारी असल्याचे यापूर्वीच मी नमूद केले होते. अनेक पंतप्रधान झाले, शंकराचार्य आणि अगदी माजी राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांनीही या प्रकरणी याचिका दाखल केली. पण, कोणाच्याच प्रयत्नांना यश आले नाही. अशा स्थितीत हे कोणीतरी श्रीमान त्रिपाठी महोदय आले. त्यांचे आकस्मिक याचिका दाखल करणे अतिशय चमत्कारिक असल्याचे मत हिंदू महासभेचे वकील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले.
जाफरयाब जिलानी
आजचा निकाल आमच्या बाजूने नाही तर अयोध्या प्रकरणाचा खटला लढणाऱ्या सर्वच पक्षांच्या बाजूने लागला आहे. सर्वांनाच लवकर निकाल लागणे अपेक्षित आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, देशातील घटनांचा न्यायालयातील प्रकरणांशी संदर्भ जोडणे चुकीचे आहे, ही बाब आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली आहे. राष्ट्रकुल, बिहार निवडणूक, ओबामांचा दौरा अशी कारणे दाखवून सुरक्षेचा मुद्दा समोर केला जातो आणि निकाल पुढे ढकलला जातो. चर्चेविषयीचा केंद्राचा दृष्टिकोनही तथ्यहीन आहे. त्यांनी स्वत: याविषयी काहीही केलेले नाही. चर्चेचे काय घेऊन बसलात? चर्चा तर हायकोर्टाच्या निकालानंतरही होऊ शकते, अशी प्रतिक्रिया सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील जाफरयाब जिलानी यांनी व्यक्त केली.
रंजना अग्निहोत्री
सर्वोच्च न्यायालयाने योग्य तो निवाडा दिला. आता उच्च न्यायालयातून येणाऱ्या मुख्य खटल्याच्या मुख्य निकालाची वाट आहे, असे जगद्गुरू शंकराचार्य यांच्या वतीने अयोध्या प्रकरण लढविणाऱ्या वकील रंजना अग्निहोत्री म्हणाल्या.
चर्चेने अयोध्या प्रकरणाचा निपटारा शक्यच नाही : विहिंप
अयोध्या प्रकरणी चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघणे शक्यच नाही आणि आता त्यासाठी फारशी वाटही पाहिली जाऊ नये, अशी सुस्पष्ट आणि ठाम भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे.
विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोकजी सिंघल म्हणाले की, आता निर्णय उत्तरप्रदेशातील उच्च न्यायालयाला घ्यायचा आहे. तो निर्णय मान्य राहील की नाही, असे वारंवार विचारले जाते. पण, आमचे यावर म्हणणे आहे की, राम मंदिराचा निर्णय हा एक राष्ट्रीय निर्णय आहे. संत-महंतांनी याला कोर्टाचा निर्णय मानलेले नाही. आपल्याला सर्वांना मिळून अयोध्येत राम मंदिर उभारायचे आहे, असेच आपले म्हणणे असल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले.
विनय कटियार
अयोध्या प्रकरणाचा निकाल २४ सप्टेंबर रोजीच लागणार होता. पण, सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेमुळे हा निकाल लांबणीवर पडला. हा निर्णय लांबणीवर टाकण्यामागे काही तत्त्वे निश्चितपणे कार्यरत होती. न्यायालयीन प्रक्रिया लांबविण्याचा कट रचणारे हे कोणते घटक आहेत, याचा छडा लावला पाहिजे. त्याचा तपास झाला पाहिजे. एरवी उच्च न्यायालयाचा जो निर्णय राहील तो आम्हांला मान्य असेल, असे भाजप नेते विनय कटियार म्हणाले.
कल्याणसिंग
लखनौ खंडपीठाने आपला निर्णय आणखी लांबवू नये. हा निर्णय हिंदूंच्या बाजूने लागावा, अशी आमची इच्छा आहे. पण, जर असे झाले नाही तर संसदेत याविषयी वेगळा कायदा करून मंदिर उभारले पाहिजे. अयोध्या निकालामुळे सुरक्षा व्यवस्था बिघडेल असे म्हणणाऱ्या सरकारने ताबडतोब सत्ता सोडली पाहिजे, असे उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग म्हणाले.
हायकोर्टाच्या निकालानंतरही चर्चा होऊ शकते : निर्मोही आखाडा
अयोध्या प्रकरणी नेहमीच चर्चेद्वारे तोडगा काढण्यासाठी तयारीत असणाऱ्या निर्मोही आखाड्याने उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निर्णयानंतरही चर्चा होऊ शकते, अशी आगळी-वेगळी भूमिका घेतली आहे.
निर्मोही आखाड्याचे महंत भास्करदास म्हणाले की, आम्ही निकाल लांबणीवर न टाकण्याच्या आजच्या निकालाचे स्वागत करतो आणि गुरुवारी येणारा निकालही आम्हांला मान्य राहील. पण, त्या निकालानंतर चर्चेची गरज भासली तर आम्ही त्यासाठी तयार राहू. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही चर्चेचे मार्ग बंद होणार नाहीत, असेही ते म्हणाले.
राममंदिरविरोधी निर्णय स्वीकारू नये
जनता पार्टीचे सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल समयोेचित असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी अयोध्येतील राममंदिरविरोधी काही निर्णय लागला तर तो हिंदूंना स्वीकृत राहणार नाही, हेही स्पष्ट केले.
डावेही निकालाने खूष
सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीसह सर्व डावे पक्ष खूष झाले आहेत.
१९९२ मध्ये बाबरी ढाचा पाडल्यानंतर आम्ही हे प्रकरण न्यायालयाच्या माध्यमातूनच सोडविले जावे, हीच भूमिका घेतली होती. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निवाड्याचा मार्ग मोकळा केला आहे, असे माकपाचे महासचिव प्रकाश कारत म्हणाले.
लोकांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अफवेकडे लक्ष देऊ नये आणि कोणाच्याही भडकवण्याने उत्तेजित होऊ नये, असे भाकपाचे डी. राजा यांनी म्हटले आहे.
कायदेमंत्री मोईली आनंदले
आदरणीय सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. त्यांनी आता अयोध्या प्रकरणातील निकालाचा मार्ग प्रशस्त करीत चित्र स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण भिजत घोंगडे ठेवले नाही,ही अतिशय समाधानाची बाब आहे. केंद्र सरकारला यातून धर्मनिरपेक्ष आणि सकारात्मक वातावरण अपेक्षित असल्याचे मत केंद्रीय कायदेमंत्री वीरप्पा मोईली यांनी व्यक्त केले.
शरद पवार
अयोध्या प्रकरणी गुरुवारी जो काही निकाल लागेल तो सर्वांनीच स्वीकारला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
विमानेही सज्ज राहणार
आकस्मिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशभरात १६ जागी अतिरिक्त सुरक्षा पथके तैनात करण्यात येणार आहे. ही पथके दहा मिनिटांच्या अल्पावधीतील सूचनेनंतर विमानांनी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार किमान आठ स्थानांवर भारतीय वायुदलातील आयएल-७६ आणि एएन-३४ ही विमाने सज्ज ठेवण्यात येणार आहेत. या आठ स्थानांमध्ये प्रामुख्याने अहमदाबाद, कोईंबतूर आणि दिल्लीचा समावेश आहे. सुरक्षेच्या दृष्टीने उत्तर प्रदेशकडे जास्त लक्ष देण्यात आले असल्याचेही या सूत्राने सांगितले.

No comments: