Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 27 September, 2010

वाळपईत भाजपतर्फे संतोष हळदणकर

खाणींचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - माजी आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी वाळपई मतदारसंघात लादलेल्या पोटनिवडणुकीत त्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून संतोष हळदणकर यांच्या नावाची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. येत्या मंगळवारी उमेदवारी अर्ज सादर केला जाणार आहे. सामान्य कार्यकर्ता म्हणून वर आलेल्या संतोष यांच्या नावाला सर्वांकडून मान्यता मिळाल्यानंतर आणि केंद्रीय समितीने मान्यता दिल्यानंतर आज ही घोषणा करीत असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, गोव्याच्या प्रभारी आरती मेहरा, प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर तसेच उमेदवार संतोष हळदणकर उपस्थित होते.
संतोष याची जन्मभूमी आणि कर्मभूमी ही वाळपईच आहे. त्यामुळे २४ तासही ते लोकांसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यांना भेटण्यासाठी वाळपईकरांना पणजीत यावे लागणार नाही,असे पार्सेकर यावेळी म्हणाले. तसेच, विश्वजित राणे यांचा अहंकार आणि गुरमी मोडून काढण्यासाठी राज्यभरातील पक्षाचे सर्व कार्यकर्ते संतोष यांच्यामागे भक्कमपणे उभे राहणार असल्याचे श्री. पार्सेकर यांनी यावेळी सांगितले. संतोष यांचा स्वतंत्र व्यवसाय असून पदवीपर्यंत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. ते माजी आमदार तथा माजी उपसभापती नरहरी हळदणकर यांचे बंधू आहेत.
ही निवडणूक विश्वजित राणे यांनी वाळपईकरांवर लादलेली आहे. स्वतःच्या हितासाठी आणि कॉंग्रेस प्रवेश करण्यासाठी वाळपईच्या लोकांना वेठीस धरले आहे. कारणाशिवाय राज्यावर आर्थिक बोजा टाकलेला आहे. मंत्री असताना राजीनामा देऊन कॉंग्रेस पक्षाला आपण आपल्या पायाशी आणले हेच विश्वजित यांनी राजीनामा देऊन सिद्ध केले आहे, अशी टीका यावेळी पार्सेकर यांनी केली.
विश्वजित राणे विकासकामांच्या बढाया मारत असले तरी वाळपईत त्यांनी सुरू केलेला एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. इस्पितळाचा प्रकल्प हा "पीपीपी' तत्त्वावर एका इस्रायली कंपनीला चालवायला देण्यासाठीचा घाट घातला आहे. यात त्यांचे ईप्सित दडलेले आहे. लोकांच्या भल्यासाठी हे इस्पितळ बांधले जात नाही, असा आरोप यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. त्याप्रमाणे, बस स्थानकाचाही प्रकल्प रखडलेला आहे. या निवडणुकीत त्यांनी विकासकामासाठी खर्च केलेल्या २०० कोटी रुपयांचा हिशेब मागणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
श्री. राणे यांनी तरुणांना ज्या नोकऱ्या दिलेल्या आहेत त्या त्यांना नकोशा झालेल्या आहे. "ड' वर्गाच्या या नोकऱ्या दिल्या आहेत. वाळपईतून पणजी येण्यासाठीच त्याचे वेतन प्रवासखर्चात जात असल्याच्या अनेकांच्या तक्रारी असल्याचे ते म्हणाले. वाळपई मतदारसंघात ३ ते ४ हजार तरुण बेकार असल्याची माहिती यावेळी श्री. पर्रीकर यांनी दिली.
विश्वजित राणे हे १२ महिन्यांपैकी ५ महिने विदेशात असतात. त्यांची भेट घ्यायचीच असेल तर वाळपईच्या लोकांना पणजीत येऊन दिवसभर खोळंबत थांबावे लागते. तसेच, स्वार्थी हेतूने विकासकामे केली आहेत, असा दावा यावेळी संतोष हळदणकर यांनी केला.


उमेदवार संतोष हळदणकर
खाण आणि पर्यावरण प्रचाराचे मुख्य विषय असणार आहे. तसेच, विश्वजित राणे यांनी भ्रष्टाचार कशा पद्धतीने केला आहे ते वाळपईच्या मतदारांना दाखवून दिले जाणार आहे. नवीन खाणी सुरू करण्यात विश्वजित राणे यांचा हात आहे. या खाणी सुरू झाल्यास संपूर्ण सत्तरी धोक्यात येणार आहे. वाळपईचे निसर्ग सांभाळून ठेवायचे असेल तर, भारतीय जनता पक्षाच्यामागे उभे राहा, हेच आम्ही मतदारांना सांगणार आहोत, असे यावेळी उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर संतोष हळदणकर यांनी सांगितले.


आरती मेहरा
कॉंग्रेस पक्षाकडे पाहिल्यास त्यात लोकशाही नसून हुकूमशाही असल्याचे दिसून येते. पैसा आणि बाहुबलावर वाळपईचे उमेदवार जिंकून येण्याची स्वप्ने पाहत आहेत. आत्मविश्वास असणे यात काही गैर नाही. परंतु, अहंकार आणि गुरमी असलेल्या नेत्यांना जनता योग्य स्थान दाखवते. अशा नेत्यांना जनता मान्य करीत नाही. वाळपई मतदारसंघात २७ पोलिंग बूथ आणि साडेसतरा हजार मतदार आहेत. या सर्व मतदारांकडे आम्ही जाऊ आणि "भाजप' का पाहिजे हे पटवून देऊ, असे मेहरा यांनी सांगितले.

लक्ष्मीकांत पार्सेकर
एका कुटुंबातील एकालाच तिकीट द्यावे, हे धोरण कॉंग्रेस पक्षाने बदलल्याचे या पोटनिवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आम आदमीचे सरकार राहणार नाही. संस्थानिक आणि मंत्र्यांच्या मुलांनाच कॉंग्रेस पक्ष तिकिटे देणार असल्याचे उघड झाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव आणि गृहमंत्री रवी नाईक यांची मुले उमेदवारीचे बाशिंग बांधून उभी असल्याचे उघड झाले आहे.

No comments: