Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 27 September, 2010

"मधू कोडा'पासून सावध राहा

आरती मेहरांचे सत्तरीवासीयांना आवाहन

वाळपई, दि. २६ (प्रतिनिधी)- वाळपई पोटनिवडणूक १८ ऑक्टोबर रोजी होणार असून त्या दृष्टीने वाळपई भाजपने बैठका सुरू केल्या आहेत. त्यातील महत्त्वाची बैठक आज दुपारी वाळपईत भाजप उमेदवार संतोष हळदणकर यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी भाजप केंद्रीय प्रभारी आरती मेहरा, प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर, माजी आमदार नरहरी हळदणकर, डिचोली जि.पं. सदस्य शिल्पा नाईक, माजी आमदार विनय तेंडुलकर, माजी आमदार सदानंद शेट तानावडे, उल्हास अस्नोडकर, वासुदेव परब, मंगलदास गावस, डॉ. प्रमोद सावंत आदींची उपस्थिती होती. यावेळी आरती मेहरा म्हणाल्या, की सध्या सत्तरी तालुक्यावर महासंकट आले असून येणारा काळ हा धोक्याचा आहे. कारण अशा निसर्गरम्य तालुक्यावर गोव्यातील "मधू कोडा'चे भूत बसले आहे. हा मधू कोडा या तालुक्यात स्वार्थासाठी खाणी सुरू करू पाहत आहे. त्यामुळे जनतेने वेळीच सावध राहावे, असे मेहरा म्हणाल्या. महिला सशक्तीकरणाच्या नावे पैशाची उधळपट्टी सुरू असून अशाने महिला लाचार बनत चालल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना व अन्नसाठा मोठ्या प्रमाणात असताना कॉंग्रेस सरकारने धान्य कुजवून दारू बनवण्याचे षड्यंत्र सुरू केले, अशी टीका त्यांनी केली.
कॉंग्रेस सरकारने गेली ५३ वर्षे सत्ता भोगली पण लोकांना फक्त लाचार बनविले. सत्तेच्या जोरावर हुकूमशाही, गुंडगिरी, मार्गाने देशाला विकले आज अनेक समस्या भेडसावत असून त्या तशाच आहे. निवडणुकीच्या वेळी पैसा ओतून मते घेणाऱ्या कॉंगे्रस पक्षाला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे. वाळपईत गेल्या तीन वर्षापासून विश्वजीतांनी पैशांच्या जोरावर स्वार्थापोटी खाणी सुरू केल्या. वाळपईच्या हॉस्पिटलचे इस्त्रायलीकरण करण्याचा घाट विश्वजीतांनी घातला असून, सत्तरीवासीयांना ही धोक्याची घंटा आहे. गोविंद पर्वतकर म्हणाले, की या मतदारसंघात २०० कोटींची कामे झाली असे सांगणाऱ्या विश्वजितांनी लोकांना पूर्ण झालेल्या कामांची यादी द्यावी. कदाचित पूर्ण झालेले काम व निविदा काढलेले काम यातील फरक राणेंना कळत नसावा. फक्त पायाभरणीच्या पाट्या लावण्यापलीकडे काहीच झाले नाही. साटर्‌रेसारख्या गावातील (दुर्गम)पुल अपूर्ण अवस्थेत मुद्दामहून ठेवला हाच काय त्यांचा निःपक्षपातीपणा? गरज नसताना हेदोडे, दाबोस हे पुल खाणींसाठी बांधले. म्हणून अशा व्यक्तींपासून सावध झाले पाहिजे. नाहीतर येत्या काळात विश्वजित सांगेल ते सर्वांना करावे लागेल. कारण त्यावेळी सर्व जण पैसे घेऊन मिंधे झाले असतील, म्हणूनच लोकांनी आत्ताच योग्य निर्णय घेतला पाहिजे.
नरहरी हळदणकर म्हणाले, की सत्तरीचे शेतकऱ्यांचे प्रश्न आजही पडून आहेत. भाजपने प्रश्न सोडवण्यासाठी सुरू केलेले काम मुद्दामहून विश्वजितांनी बंद केले. अर्थातच शेतकऱ्यांचा विकास कॉंग्रेस व राणेंना झालेला नको आहे, हे स्पष्ट होते. सत्तरीत राजकारण हे कोणाची मक्तेदारी नाही. व प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्यास राणेंनी पाहू नये, असा सल्लाही यावेळी दिला. मंडळाचे अध्यक्ष नारायण गावस यांनी आभार मानले. यावेळी निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

No comments: