Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 1 May, 2010

गोवा अबकारी अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता, सीबीआयने मागितल्यास पुरावे सादर करू : पर्रीकर

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग (सीबीआय) ने दमण येथील कोट्यवधी रुपयांच्या अबकारी घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याप्रकरणी राज्य अबकारी आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.या घोटाळ्याचे धागेदोरे गोव्यापर्यंत असल्याचे "सीबीआय' चौकशीत निष्पन्न झाले असून पुढील आठवड्यात "सीबीआय' चे पथक गोव्यात दाखल होणार आहे. या घोटाळ्याबाबत "सीबीआय' ला काही महत्त्वाचे पुरावे प्राप्त झाल्याची खबर असून राज्य अबकारी आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांना अटक होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी यासंबंधी बोलताना सांगितले की पुढील आठवड्यात ते या घोटाळ्याबाबत आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे प्रसिद्धी माध्यमांसमोर ठेवणार आहेत. "इफ्फी-०४' प्रकरणी चौकशीसाठी "सीबीआय' ने बोलावले असता त्यावेळी अबकारी घोटाळ्याबाबतही त्यांनी आपल्याकडे विचारणा केली होती, असा गौप्यस्फोट पर्रीकर यांनी केला. आता या प्रकरणाची चौकशी करणारे "सीबीआय' पथकच गोव्यात दाखल होणार असल्याने त्यांनी आपल्याला बोलावल्यास संपूर्ण माहिती त्यांना देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही महिन्यांपूर्वी पर्रीकरांनी बेकायदा मद्यार्क आयात घोटाळा प्रकरण उघडकीस आणले होते. सुमारे साठ कोटी रुपयांचा अबकारी शुल्क चुकवण्यात आल्याचे पुरावे पर्रीकर यांनी सादर केले होते. आता या घोटाळ्यात दमण घोटाळ्याची भर पडल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ही चौकशी वित्त सचिव उदीप्त रे यांच्याकडे देऊन त्याचा फार्स केला हे आता उघड झाले. उदीप्त रे यांनी आपल्याला दुसरे पत्र पाठवले व त्यात केवळ सरकारने सांगितल्याप्रमाणेच आपण चौकशी करणार असल्याचे म्हटले होते. मुळात हे प्रकरण गुन्हेगारी स्वरूपाचे आहे व त्यामुळे त्यांनी यासंबंधीची तक्रार पोलिसांकडे करणे गरजेचे होते, असेही पर्रीकर म्हणाले. उदीप्त रे सेवामुक्त झाल्याने आता या प्रकरणाची चौकशी नव्याने होईल. या एकूण प्रकरणांत आंतरराज्य टोळ्यांचा समावेश असल्याने ही चौकशी "सीबीआय' कडेच सोपवावी, अशी फेरमागणीही पर्रीकर यांनी केली.
दरम्यान, अबकारी आयुक्त संदीप जॅकीस यांनी दमण येथून आयात केलेल्या मद्यार्काबाबतची सखोल माहिती मागवली आहे. गेल्या पाच वर्षांत दमण येथून किती मद्यार्क आयात करण्यात आला व तो कुठच्या कंपनीतर्फे करण्यात आला, याची माहिती शोधून काढली जाईल, असे सांगून त्यानंतरच या आयातीच्या वैधतेबाबत सांगता येईल,असेही त्यांनी एका वृत्तवाहिनीकडे बोलताना सांगितले.
------------------------------------------------------------------
तो 'अधिकारी' कोण?
अबकारी खात्यातील एक अधिकारी हा थेट मद्याच्या व्यवसायात गुंतला आहे व खात्यातील सर्व "सेटिंग' चे व्यवहार हाच अधिकारी करतो, अशी जोरदार चर्चा सध्या खात्यात सुरू आहे. सदर अधिकाऱ्याला काही काळापूर्वी पणजी आयुक्तालयात अबकारी आयुक्तांनी महत्त्वाच्या पदावर आणले होते. या नियुक्तीबाबत टिका झाल्याने अखेर त्याची तात्काळ बदली करण्यात आली, पण ही बदली जवळ पणजीतच करण्यात आल्याने हा अधिकारी आयुक्तालयात वारंवार येत असतो अशीही माहिती मिळाली आहे. या अधिकाऱ्यांने दक्षिण गोव्यातील एक मद्यार्क उत्पादन कंपनी कंत्राटावर घेतल्याची चर्चा खुद्द अबकारी आयुक्तालयातील काही कर्मचारीच करीत आहेत. जादाकरून दमण येथील माल हाच अधिकारी आणतो, अशी माहितीही गुप्त सूत्रांनी दिली. दमण येथे "सीबीआय' ने अबकारी घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याची खबर सर्व वर्तमानपत्रांत झळकताच पणजी बाजारात एकच खळबळ उडाली. दमण येथील आयात केलेला माल पणजीतील काही दुकानांत विक्रीसाठी ठेवण्यात आला होता व तो तात्काळ तिथून हटवण्यात आल्याचीही खबर मिळाली आहे. या अधिकाऱ्यावर वरिष्ठांची खास मर्जी असल्याने तो कुणालाही जुमानत नाही अशीही खबर आहे.

No comments: