Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 30 April, 2010

'काकुलो'तर्फे रविवारी 'स्वरांजली'

नामवंत कलाकारांचा समावेश
पणजी, दि. २९ (सांस्कृतिक प्रतिनिधी): गोव्यातील नामांकित काकुलो उद्योग समूहाने आता सांस्कृतिक व कला क्षेत्रातही प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. काकुलो उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय मोहनबाब काकुलो यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रविवार दि. २ मे रोजी कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात "स्वरांजली' या भव्य संगीत मैफलीचे आयोजन केले गेले आहे. यापुढे दरवर्षी १८ एप्रिल रोजी मोहनबाब काकुलो यांच्या वाढदिनी अशाच संगीत संमेलनाचे आयोजन होईल, अशी घोषणाही आज करण्यात आली.
काकुलो उद्योग समूहातर्फे आज बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मनोज काकुलो यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी सूरज काकुलो, कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई व डॉ. राजीव कामत उपस्थित होते.
स्वर्गीय मोहनबाब काकुलो यांना संगीताची व विशेषतः नाट्यसंगीताची विलक्षण आवड होती. काकुलो हे बार्देश तालुक्यातील कांदोळी या गावचे घराणे व तेथील विविध धार्मिक, सांस्कृतिक तथा इतर कार्यक्रमांत हे कुटुंब नेहमीच अग्रेसर असते. स्वर्गीय मोहनबाब यांच्या स्मृतीनिमित्त कांदोळी गावात काकुलो संगीत अकादमी सुरू करण्यात आली आहे व त्यात होतकरू व संगीताची आवड असलेल्या मुलांना संगीत शिक्षण दिले जाते. संगीत क्षेत्रात गोमंतकीय कलाकारांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी काकुलो समूह यापुढे विशेष लक्ष देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, या नव्या उपक्रमाची सुरुवात दणक्यात व्हावी या उद्देशाने येत्या २ मे रोजी "स्वरांजली' संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफलीत साभिनय नाट्यगीत गायनस्पर्धा, जुगलबंदी, अदाकारी अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असेल. या संपूर्ण कार्यक्रमात स्थानिक गोमंतकीय कलाकारांबरोबरच गोव्याबाहेरील नामवंत कलाकारही सहभागी होणार आहेत. सवेश - साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेसाठी आमंत्रित कलाकारांनाच संधी देण्यात आली आहे. या स्पर्धेत संजय धुपकर, सिद्धी सुर्लकर, कृष्णा कोटकर, कोमल साने, शांताराम गोवेकर, उषा च्यारी, कृष्णा च्यारी, सिद्धी नाईक, रामनाथ नाईक व संपदा उपाध्ये हे कलाकार भाग घेतील. त्यांना ऑर्गनवर दामोदरभाई शेवडे व तबल्यावर तुळशीदास नावेलकर साथ देतील.
जुगलबंदी सत्रात सतार, व्हायोलीन, तबला व मृदंगवादनाचा आस्वाद रसिकांना घेता येईल. रवींद्र च्यारी (सतार), रतीश तगडे (व्हायोलीन), उस्ताद फजल कुरेशी (तबला) व श्रीधर पार्थसारथी (मृदंग) हे कलाकार यात भाग घेणार आहेत.
अदाकारी हा खास नाट्य व भक्तिगीतांचा कार्यक्रमही या निमित्ताने होणार आहे. यात सुरेश बापट, अनुराधा कुबेर, नीलाक्षी पेंढारकर व नीलेश शिंदे आदी कलाकार भाग घेतील. त्यांना ऑर्गनवर मकरंद कुंडाळे व तबल्यावर दयेश कोसंबे साथ देतील. निवेदन डॉ. अजय वैद्य व संगीता अभ्यंकर करणार आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला असेल, अशी घोषणाही आयोजकांनी केली आहे.

No comments: