Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 28 April, 2010

लोकसभेत पंतप्रधानांविरुद्ध भाजपकडून हक्कभंग नोटीस

नवी दिल्ली, दि. २७ : 'आयपीएल तसेच फोन टॅपिंगच्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची आवश्यकता नाही, याप्रकरणी संयुक्त संसदीय समिती स्थापन केली जाणार नाही,' असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी संसदेबाहेर सांगून संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग केलेला आहे, अशा आशयाची हक्कभंगाची नोटीस भाजपाच्या खासदारांनी आज बजावली. लोकसभेचे महासचिव पी. डी. आचारी यांच्याकडे ही नोटीस सादर करण्यात आलेली आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी संयुक्त संसदीय समितीची मागणी फेटाळण्याची घोषणा संसदेबाहेर केल्याबद्दल लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. यानंतर भाजपाच्या खासदारांनी पंतप्रधानांविरुद्ध हक्कभंगाची नोटीस बजावली. गोपीनाथ मुंडे तसेच यशवंत सिन्हा यांच्याकडून दिल्या गेलेल्या हक्कभंगाच्या या नोटिशीमध्ये ५० खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ""सभागृहाचा हा अवमान आहे. पंतप्रधानांनी संसदेतच बोलायला हवे होते. या प्रकरणी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंंग यांनी सभागृहात निवेदन द्यायलाच पाहिजे,''अशी मागणी सुषमा स्वराज यांनी केली.

No comments: