Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 30 April, 2010

यशवंत सिन्हा झारखंडचे मुख्यमंत्री?

सोरेन यांच्याकडून भाजपची माफी
नवी दिल्ली, दि. २९ - लोकसभेत कपात सूचनेच्या विरोधात झारखंड मुक्ती मोर्चाने मतदान केल्याने नाराज झालेल्या भाजप नेतृत्वाने काल सोरेन सरकारचा पाठिंबा मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सत्तात्यागाची पाळी आलेल्या मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी भाजप नेतृत्त्वाची माफी मागितली असून, आता मुख्यमंत्रिपदासाठी ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांचे नाव पुढे आले आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू असून उपमुख्यमंत्रिपद झारखंड मुक्ती मोर्चाला द्यायचे असा पर्याय पुढे आला आहे. आणखी एक उपमुख्यमंत्रिपद देऊन भाजपचे अर्जुन मुंडा यांनाही योग्य स्थान देण्यात येणार आहे,असे सूत्रांनी सांगितले.
काल रात्री भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना पाठविलेल्या एसएमएसमध्ये सोरेन यांनी दोन पर्याय सुचविले आहेत. त्यापैकी पहिला आपले चिरंजीव हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रिपद आणि भाजपला उपमुख्यमंत्रिपद आणि दुसऱ्या पर्यायात भाजपला मुख्यमंत्रिपद आणि त्यांच्या पक्षाला उपमुख्यमंत्रिपद देण्याची सूचना असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
सोरेन यांचा एसएमएस आल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाच्याच सहकार्याने झारखंडमध्ये सत्ता स्थापन करण्याची भारतीय जनता पक्षाने तयारी चालविली आहे. भाजप आणि विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये सादर केलेल्या भाववाढ आणि स्थगन प्रस्तावावर कॉंग्रेसच्या बाजूने मतदान केल्याचे उघड झाल्यानंतर, भाजपने तातडीने त्यांच्या नेतृत्त्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. परिणामी सरकार अल्पमतात आले होते. सरकार कोसळणार आणि राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होणार, याची जाणीव झाल्यामुळे शिबू सोरेन यांनी कॉंग्रेसची दारे वाजविण्यास सुरवात केली. परंतु, कॉंग्रेसने नेहमीच्या पद्धतीने त्यांना झुलवत ठेवले मात्र कोणताही निर्णय घेतला नाही. सोरेन यांच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्याबाबत त्या पक्षाची उदासीनता लक्षात आल्यानंतर, शिबू सोरेन यांनी पांढरे निशाण फडकावत भाजपपुढे शरणागती पत्करली.
बुधवारी रात्री शिबू सोरेन यांनी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना एसएमएस करून, भाजपने सरकार स्थापन करावे आणि आपले चिरंजीव हेमंत सोरेन यांना उपमुख्यमंत्रिपद द्यावे, असा प्रस्ताव ठेवला.
राज्यातील परिस्थिती पाहता यशवंत सिन्हा यांच्यासारखे सर्वसमावेशक नेतेच ही धुरा योग्य प्रकारे सांभाळू शकतील, अशी भाजपच्या नेत्यांची भावना आहे. त्यामुळे त्यांचेच नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. हेमंत सोरेन यांना उपमुख्यमंत्रिपद दिल्यानंतरही आणखी एक उपमुख्यमंत्री हे पद निर्माण करून, भाजपच्या नेत्याकडे त्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

No comments: