Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 1 May, 2010

उद्याची चिंबल ग्रामसभा वादळी ठरण्याची शक्यता

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): चिंबल पंचायतीची महत्त्वपूर्ण ग्रामसभा उद्या रविवार दि. २ मे रोजी बोलावण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीत अनेक महत्त्वाचे विषय चर्चेला येणार असून पंचायत मंडळ आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ग्रामस्थांना हे विषय उपस्थित करण्यास मज्जाव करणार असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ग्रामसभेसाठी लेखी स्वरूपात दिलेल्या प्रश्नांची सरपंच चंद्रकांत कुंकळ्ळकर यांनी अर्धवट व खोटी उत्तरे देऊन बोळवण केली आहे. हे विषय ग्रामसभेत चर्चेला येऊ न देण्याचा चंग त्यांनी बांधल्याने ही ग्रामसभा वादळी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या काही ग्रामसभांत सरपंच चंद्रकांत कुंकळ्ळकर यांनी ग्रामसभेचे कामकाज अवैध पद्धतीने हाताळले आहे. आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून ग्रामस्थांना विविध प्रश्न उपस्थित करण्यास अटकाव केला जातो व महत्त्वाच्या विषयांवर चर्चाच करण्यात येत नाही, ग्रामसभेचे इतिवृत्त चुकीच्या पद्धतीने लिहिले जाते अशी तक्रार चिंबल ग्रामसेवा कला आणि सांस्कृतिक मंचतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामसभेचा मूळ उद्देशच नष्ट होत असून केवळ बळाचा वापर करून ग्रामस्थांवर दबाव घालण्याचा प्रयत्न पंचायत मंडळाकडून होत असल्याचा आरोपही मंचाने केला आहे. ग्रामस्थांना पंचायत मंडळाचे निर्णय मान्य नसतील तर त्यांनी उच्चपदस्थांकडे तक्रार करावी, असे जाहीर वक्तव्य करण्यापर्यंत सरपंचांनी मजल मारली आहे, अशीही माहिती यावेळी मंचतर्फे देण्यात आली.
चिंबल पंचायतीसमोर अनेक समस्या व अडचणी आहेत. या भागातील वृक्षसंहार, मेगा प्रकल्पांचा सुळसुळाट, अतिरिक्त झोपडपट्ट्या, कचऱ्याची दुर्गंधी, अनुसूचित जमातीच्या लोकांच्या शेतांची नासाडी व संशयास्पद "आरोग्य सिटी' प्रकल्प असे अनेक गंभीर विषय ग्रामसभेत चर्चिले जाणे आवश्यक आहे. मात्र पंचायत मंडळ हे विषय ग्रामसभेत उपस्थितच करू देत नसल्याचा आरोपही मंचतर्फे करण्यात आला आहे.
यंदा राष्ट्रीय पातळीवर ग्रामसभा वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यामुळे चिंबल पंचायत मंडळाकडून ग्रामसभेच्या नावाखाली ग्रामस्थांची चाललेली फजिती व लोकशाहीची चाललेली थट्टा संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी बंद करावी व ग्रामस्थांना न्याय द्यावा, असे आवाहन मंचतर्फे करण्यात आले आहे.

No comments: