Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 29 April, 2010

व्यक्तित्वाचा 'अर्क' साकारणारी अर्कचित्रे

पणजीतील कला अकादमीत आयोजित केलेल्या भरत जगतापांच्या व्यक्तिचित्रणांच्या प्रदर्शनाला भेट देऊन त्यांच्याशी बातचीत करण्याचा योग आला तेव्हा ते
व्यक्तिचित्र काढतच होेते. त्यांच्याबरोबर चित्रांची माहिती घेत असतानाच त्यांनी ज्या अनेक सुप्रसिद्ध आणि कलाक्षेत्रात दिग्गज मानले गेलेली चित्रे काढली त्यांच्याशी झालेल्या भेटीचे प्रसंग त्यांना तसेच्यातसे आठवत होते. किंबहुना त्यांनी काढलेल्या जवळपास प्रत्येक चित्राशी एकेक कथा जुळलेली आहे.
लक्ष्मण यांची प्रेरणा
भारतीय व्यंगचित्रकारीतेत अत्युच्चस्थानी असलेले आर. के. लक्ष्मण यांची भेट ही श्री. जगतापांच्यासाठी प्रेरणादायी ठरली. सांगलीला लक्ष्मण जनस्थान पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यावर इतरांबरोबर जगतापही त्यांची स्वाक्षरी घेण्यास उत्सुक होते. लक्ष्मण यांच्या हातात त्यांनी चित्रांची फाईलच दिली. लक्ष्मण यांनी ती पूर्ण चाळली. त्यांना पी. ए. संगमाचे चित्र फार आवडले. त्यांनी स्वाक्षरीसह चित्रावर "फारच चांगले' असा शेरा देऊन जगताप यांना शाबासकी दिली. ते चित्र या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. तेथूनच जगतापांच्या चित्रावर अर्क चित्रकाराची मोहोर उमटली. असे अनेक किस्से जगतापांच्या खजिन्यात आहेत. जगतापांनी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयामधून कमर्शियल आर्ट या विषयात जरी जी.डी आर्ट केले असले तरी त्यांची वृत्ती मुळात पेंटरची होती. त्यातही त्यांना व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपणा जाणवत असे. तरुण वयात एकीकडे भरपूर पैसे देऊ शकणाऱ्या कमर्शियल आर्टचे क्षेत्र खुणावत होते, तर मनात ऊर्मी होती व्यक्तिचित्रणाची. त्यामुळे त्यांची मानसिक ओढाताण होऊ लागली. त्या अवस्थेतून बाहेर काढण्यास त्यांचे मार्गदर्शक तुळशीदास तिळवे साहाय्याला आले. त्यांनी स्पष्ट शब्दांत जगतापांना पेंटिंग आणि व्यक्तिचित्रणाकडे वळण्याचा सल्ला दिला आणि जगतापांची कला बहरली.
श्री. जगताप व्यंगचित्रे काढत नाहीत. ते व्यक्तीच्या अस्तित्वात डोकावतात. ते पूर्ण चित्र काढण्याच्या भरीस पडत नाहीत. त्यांना चित्र काढणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरच तिचे व्यक्तिमत्त्व भावते आणि त्याचवेळी त्यांना जे आकलन होते त्यानुसार त्या व्यक्तीचा चेहरा कागदावर ते साकारतात. जगतापांनी गोव्यातील अनेक व्यक्तींची अर्कचित्रे काढली आहेत. ती पाहण्याजोगी आहेत.
चित्र काढताना व्यक्ती जर अबोल असेल, तटस्थपणे चित्र काढून घेण्यासाठी बसली असेल तर तिचे चित्र काढताना जणू त्यांचा कोंडमारा होतो. ज्या क्षणी एखाद्या वाक्याने वा काही कारणाने तो मुखवटा गळून पडतो किंवा व्यक्ती दिलखुलासपणे बसते, तिच्या डोळ्यातील भाव बोलके होतात त्याच क्षणी जगतापांचे काम सोपे होते.
व्यक्तिमत्त्वाचा अर्क
जगताप अर्कचित्रे काढतात म्हणजे काय तर ज्या व्यक्तीचे चित्र काढायचे असते तिच्या सर्वसाधारण बाह्य परिवेशापलीकडे जाऊन तिच्या मनातील भाव त्यातील गुंतागुंत, नजरेत उठणारे भावतरंग या सर्वांचे मिळून जे रसायन त्यांना भावते ते त्या चित्रात उतरते. तो त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा जणू अर्क इसेन्स असतो. म्हणून जगतापांच्या व्यक्तिचित्रणांना अर्क चित्रे म्हणायचे. आमच्या गप्पागोष्टी होत असतानाच त्यांनी तिथेच एक चित्र काढले. त्यांनी त्या हातात जणू भाळा रूपी भासणारी लेखणी बहाल केली. व्यक्ती कशी दिसते, व्यक्ती कशी असते त्यापेक्षा जगतापांना ती त्याक्षणी कशी भावते यावर त्या चित्राचे रेखाटन ठरते. अन्य वेळी दुसऱ्या मानसिक स्थितीत तीच व्यक्ती जगतापांच्या पकडीत आली तर त्यानुसार ते त्या वेळच्या "अर्क'ला कागदावर बंदिस्त करून ठेवणार. प्रत्येक व्यक्तिगणिक येणारा नवा अनुभव आपोआपच जगतापांच्या रेखाटनाला नवी दिशा देतो. त्यात तोचतोचपणा येत नाही.
बोलक्या रेषा
जगतापांचे रेषांवर प्रभुत्व आहे. निरनिराळ्या आकारांच्या जाडीच्या, लांबीच्या रेषांचा वापर करून जगताप तरल, संवेदनात्मक चित्रे काढतात. वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रीटो हे त्या रेखाविष्काराने भारावले होते. "तुमच्या रेषा बोलतात' हा त्यांचा अभिप्राय जगतापांनी उराशी जपला आहे. प्रख्यात व्यंगचित्रकार वसंत सरवटेंच्या आगमनावेळी काही कारणाने जगताप कार्यालयाबाहेर गेले होते.त्यांची चित्रे पाहून वसंत सरवटे तब्बल दीड तास प्रतीक्षा करत थांबले. त्यांनतर त्यांची जगतापांशी झालेली भेट अविस्मरणीय ठरली.
ही अर्कचित्रे काढताना जगतापांनी काय साधन, कुठले रंग वापरायचे याचे बंधन ठेवलेले नाही. जलरंग, खडू ते ऍक्रिलीक रंग सर्व प्रकारच्या रंग माध्यमातून त्याची अर्क चित्रे साकार होतात.
पेंटिंगची ऊर्मी
आपल्या भविष्यातील कामाविषयी त्यांच्या काही कल्पना आहेत. आपल्या कलेवर खरा कलाकार कधीच समाधानी नसतो. सध्याच्या दिवसभराच्या नोकरीच्या रगाड्यात त्यांची ऑईल पेंटिंगची ऊर्मी दबली जाते आहे. नव्या भन्नाट कल्पना मनात साकार होऊन छळत राहतात. त्यातील थोड्याच पूर्णपणे साकार होतात. जगतापांची काही पेन्टिंगही प्रदर्शनात ठेवली होती. त्या चित्रातील व्यक्ती व तिच्या भोवतालच्या वातावरणाचे चित्रण बरेच काही सांगून जाते. पुढे जाऊन मनसोक्तपणे पेन्टिंग करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला. बारक्या रेषांच्या जाळ्यांनी भव्य दिव्य व्यक्तिमत्त्वे जणू तोलून धरणारा हा मनस्वी कलाकार आपली वेगळी पाऊलवाट चोखाळतो आहे हे त्या अर्क चित्रांमधून जाणवत राहते.

No comments: