Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 2 May, 2010

प्राणघातक हल्ला केलेला चालक मोकळा कसा?

नरेश हळदणकर याची पोलिसांकडे फिर्याद

पणजी, दि. १ (प्रतिनिधी)- फोंडा येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालवाहू ट्रकवर कामाला असलेल्या नरेश हळदणकर या युवकाला त्याच ट्रकचा चालक प्रकाश छाबडा याने डोक्यावर दंडुका मारून जखमी करण्याचा प्रकार फोंडा येथे घडला. डोक्यावर हल्ला झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत फोंडा पोलिस स्थानकात तक्रार नोंद करूनही फोंडा पोलिसांनी सदर ट्रक चालकाना केवळ समज देऊन घरी पाठवून दिल्याबद्दल श्री. हळदणकर यांनी निषेध केला आहे. डोक्यावर बारा टाके पडण्याएवढा हल्ला करूनही केवळ समज देऊन आरोपीला सोडण्याचा हा प्रकार कुठला न्याय आहे, असा सवाल त्याने केला आहे.
मूळ पोरस्कडे येथील नरेश हळदणकर हा युवक ढवळी फोंडा येथे राहतो. तो एका हॉटेलवर काम करीत होता. त्याला येथीलच एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या काही लोकांनी मालवाहू ट्रकवर कामाला बोलावले व जादा पगार देण्याचे आमिष दाखवले. त्याच्याकडून काम करून घेतल्यानंतर जेव्हा श्री. हळदणकर आपला पगार घेण्यासाठी ट्रकच्या चालकाकडे गेला तेव्हा त्याने दंडुकाच आपल्या डोक्यावर हाणला, अशी तक्रार श्री. हळदणकर याने केली आहे.
दरम्यान, या प्रकाराची पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करून घेतली आहेच वरून फिर्यादी व आरोपी हे दोघेही दारूच्या नशेत होते व त्यातूनच त्यांनी भांडण केल्याचेही म्हटले आहे. आपण दारूच्या नशेत होतो हे जरी खरे असले तरी आपल्यावर प्राणघातक हल्ला केलेल्या आरोपीला केवळ समज देऊन पोलिसांनी कसे काय सोडले, असा सवाल त्याने केला आहे. मालवाहू ट्रकवर माल उतरवण्याचे कष्टाचे काम करण्यासाठी ताकद लागते व त्यासाठी काही प्रमाणात दारूचे सेवन केले म्हणून, दारुडा ठरवून पगार न देता दंडुक्याचा प्रहार केलेल्या व्यक्तीला मोकळा सोडण्याच्या प्रकाराचा त्याने निषेध केला आहे. सदर चालकाला सोडवण्यासाठी त्या ट्रान्सपोर्ट कंपनीचे काही अधिकारी तिथे आले होते व त्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी या चालकाला सोडले. आपण याबाबत जाब विचारला असता आपल्याला पोलिसांनी दमदाटी करून घरी पाठवले अन्यथा आपल्यालाच कोठडीत घालू अशी धमकी दिल्याचीही तक्रार त्याने केली आहे.

No comments: