Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 1 May, 2010

अखेर कदंब महामंडळाला सहावा वेतन आयोग लागू

मे महिन्यापासून वाढीव वेतन मिळणार
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): कदंब महामंडळ कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासंबंधीच्या करारावर अखेर आज कामगारदिनाच्या पूर्वसंध्येला स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी महामंडळ कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २००६ पासून लागू होणार आहेत. २५ टक्के थकबाकी यावर्षी दिली जाईल व उर्वरित थकबाकी २०११ ते २०१८ पर्यंत वार्षिक हप्त्यांनी फेडण्यात येणार आहे. पुढील मे महिन्यापासून महामंडळ कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
कामगार आयुक्त व्ही. बी. एन. रायकर व उपायुक्त फातिमा रॉड्रिगीस यांच्यासमोर कदंब महामंडळ व कर्मचारी संघटना यांच्यात हा करार झाला. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो, व्यवस्थापकीय संचालक व्हिनिसियो फुर्तादो तसेच कर्मचारी संघटनेतर्फे अध्यक्ष ज्योकीम फर्नांडिस, कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, ऍड. राजू मंगेशकर आदी नेते हजर होते. कामगारदिनाच्या पूर्वसंध्येला हा करार होणे हे सुचिन्ह आहे व यापुढे कामगारांना अशाच पद्धतीने हे सरकार न्याय देईल, असा आशावाद कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी व्यक्त केला.
कदंब महामंडळ कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात येईल, अशा असंख्य घोषणा सरकारकडून करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे पुढे करून कर्मचाऱ्यांना झुलवत ठेवण्याचे प्रकार घडल्याने अखेर कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळेच सरकारला या करारावर स्वाक्षऱ्या करणे भाग पडले. हा आयोग लागू करणे कदंब महामंडळाला शक्य नव्हते. केवळ मुख्यमंत्री दिगंबर कामत व वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पुढाकार घेऊन हा प्रस्ताव मान्य केला व त्यामुळेच ते शक्य झाले, असे यावेळी श्री. रेजिनाल्ड म्हणाले. कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे व महामंडळाला नफा मिळवून द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कदंब महामंडळ कर्मचारी संघटनेचे कायदा सल्लागार ऍड. माधव बांदोडकर यावेळी उपस्थित होते. उशिरा का होईना पण अखेर सरकारने कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करून त्यांना न्याय दिला, यामुळे संघटनेतर्फे सरकारचे अभिनंदन करण्यात आले. महामंडळाचे कर्मचारी सदैव प्रामाणिकपणे काम करून महामंडळाच्या प्रगतीसाठी झटतील, असेही यावेळी सांगण्यात आले. संध्याकाळी ६ वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होती. करारावर स्वाक्षऱ्या होताच कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला.

No comments: