Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 26 April, 2010

बैठकीपूर्वीच मोदी निलंबित

आजची बैठक केवळ सोपस्कार!
मुंबई, दि. २५ : आयपीएलच्या उद्या होणाऱ्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत आपण सहभागी होऊ, एवढेच नव्हे तर बैठकीची अध्यक्षताही करू , असे ललित मोदी यांनी आज आपल्या ट्विटरवरील संदेशात सांगून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मोदींच्या या आकस्मिक निर्णयाचा धसका घेऊन बीसीसीआयने त्यांना आजच्या अंतिम सामन्यानंतर अर्थात बैठकीपूर्वीच निलंबित करण्याचा निर्णय घेतला,असे रात्री उशिरा सूत्रांनी उघड केले. त्यापूर्वी, आयपीएलचा कमिशनर या नात्याने बैठकीचा अजेंडाही आपण गव्हर्निंग कौन्सिलला पाठवून दिला आहे, असे मोदींनी म्हटले होते. या सर्व बाबींकडे बघितल्यास आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची उद्या सकाळी १० वाजता होणारी बैठक हा केवळ सोपस्कार ठरणार आहे, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. निलंबन झाल्यास मोदी या बैठकीस उपस्थित राहू शकतील का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राजीनामा देण्यास स्पष्ट नकार देत तसेच मला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास काही लोेेकांचे पितळ उघड करण्याची धमकी देणाऱ्या ललित मोदींनी आता उद्याच्या बैठकीत सहभागी होण्यासारखा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. उद्याच्या बैठकीत आपण आयपीएलचे आयुक्त म्हणून सहभागी होऊ; एवढेच नाही तर बैठकीची अध्यक्षताही करू . त्यासाठी आपण आयपीएलच्या गव्हनिर्र्ंग कौन्सिलकडे बैठकीचा अजेंडाही पाठवून दिला आहे, असेही त्यांनी म्हटले होते. मोदींच्या या निर्णयाने बीसीसीआयला अडचणीत आणल्याचे बोलले जात आहे.
याआधी बीसीसीआयने ललित मोदी यांना त्यांच्या अनुपस्थितीत बरखास्त करण्याची योजना आखली होती. आता मोदी व बीसीसीआय यांच्यात संघर्षाची तयारी झाली आहे, असे दिसते. मोदी बैठकीला हजर राहणार असे समजताच बीसीसीआयच्या येथील मुख्यालयातही मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या आहेत. बीसीसीआयच्या आज रविवारी झालेल्या बैठकीत मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर, उपाध्यक्ष अरुण जेटली, प्रसार व अर्थ समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव एन. श्रीनिवासन, मुख्य प्रशासकीय अधिकारी रत्नाकर शेट्टी, आयपीएलचे उपाध्यक्ष निरंजन शहा उपस्थित होते.
आयपीएलमधील आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने देशभर छापे टाकण्याचे सत्र प्रारंभ केले असून व या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्र स्थानी ललित मोदी आहेत. याशिवाय कमीत कमी तीन संघांत त्यांची अप्रत्यक्ष भागीदारी असल्याचा आरोपही केला जात आहे. दरम्यान, बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रो. रत्नाकर शेट्टी आज सकाळी वानखेडे स्टेडियम येथे पोेहोचले व उद्या सकाळी १० वाजता बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यावतीने सचिव श्रीनिवासन यांनी आमंत्रित केलेल्या बैठकीला अंतिम रूप दिले. उद्याच्या बैठकीला आपण उपस्थित राहू, असे स्पष्ट संकेत ललित मोदी यांनी दिल्याने त्यांचा उद्देश स्पष्ट दिसत असला तरी त्यांना पदावरून दूर करणे हेच आमचे धोरण ठरले आहे. भारतीय क्रिकेटला त्यांनी काळिमा फासली आहे, असे बीसीसीआय सूत्रांनी म्हटले आहे.
ललित मोदी यांच्यामागे आर्थिक घोटाळ्याचे झेंगट लागलेले पाहून मोदींनी आपणहून पदाचा राजीनामा द्यावा यासाठी आज दुसऱ्या दिवशीही प्रयत्न सुरू होते. बीसीसीआयमधील बहुतांश लोक मोदींच्या विरोधात असले तरी आपल्या मागे आयपीएल संघांतील काही मालक उभे राहतील, अशी अशा मोदींना वाटत आहे.

No comments: