Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 22 April, 2009

सार्दिनला अपात्र ठरवा 'युगोडेपा'ची मागणी

सोनियांना दिलेली कृष्णमूर्ती वादग्रस्त ठरण्याची शक्यता
मडगाव, दि. २१ (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात फातोर्डा मैदानावर झालेल्या प्रचारसभेदरम्यान कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधींना दिलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या कास्यमूर्तीबाबत "युनायटेड गोवन डेमोक्रॅटिक पार्टीने ("युगोडेपा'ने) निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून ही मूर्ती कॉंग्रेसच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मूर्तीबरोबरच कॉंग्रेस उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांनी कोलवा येथील अवर लेडी ऑफ मेरसेस चर्चला दिलेले झेरॉक्स यंत्र व लॅपटॉप हे तेथील कॅथॉलिक मतदारांना प्रलोभित करणारे असल्यानेे त्यांना निवडणूक लढवण्यापासून अपात्र ठरवा अशी मागणी तक्रारीद्वारे केली आहे .
"युगोडेपा'चे सरचिटणीस ऍड. राधाराव ग्रासियश यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, त्या मूर्तीची किंमत सुमारे २० लाख रु.असल्याने तो खर्च सार्दिन यांच्या निवडणूक खर्चांत अंतर्भूत करण्याची विनंती आपण या तक्रारींत केली आहे. मुख्यमंत्री व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष यांनी या प्रचारसभेत ही मूर्ती सोनिया गांधींना देऊन एक प्रकारे हिंदू धर्मीय मतदारांच्या भावनांना हात घालून त्यांना मतांसाठी आवाहन केले आहे. त्यावेळी त्या दोघांच्या मध्ये उमेदवार सार्दिन उभे होते हेही त्यांनी तक्रारीबरोबर छायाचित्र जोडून निदर्शनास आणून दिले आहे. अन्यथा राजकीय सभेत भगवान कृष्णाला आणण्याचा दुसरा कोणता हेतू असू शकतो, असा सवाल केला आहे.
तसेच सादिर्र्न यांनी कोलवा येथील अवर लेडी ऑफ मेरसीस चर्चला दिलेला लॅपटॉप व झेरॉक्स यंत्र दीड लाख रु. किंमतीचे असल्याचे तेथील फादर दिएगो फर्नांडिस यांनी १९ रोजींच्या प्रार्थनेवेळी जाहीर केले आहे.
निवडणूकीच्या जाहीरनाम्याप्रमाणे एका उमेदवाराला १५ लाख रु. पर्यंत खर्च करण्याची मुभा आहे व त्यावरून यापूर्वीच सार्दिन यांनी खर्चाची मर्यादा ओलांडल्याने तसेच त्यांनी मतांसाठी धार्मिक भावनांना साद घालून लोकप्रतिनिधीत्व कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे त्यांना निवडणूक लढवण्यापासून अपात्र ठरवावे आणि कॉंग्रेसची मान्यता काढून घ्यावी अशी मागणी युगोडेपाने केली आहे.

No comments: