Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 23 April, 2009

पोर्तुगीज एप्रिलक्रांतीचा वर्धापनदिन उद्यापासून, स्वातंत्र्यसैनिक चवताळले

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) : पोर्तुगीजांना गोव्यातून पिटाळून लावल्याच्या घटनेला ३७ वर्षे संपली तरी पोर्तुगीज संस्कृतीचा उदोउदो करण्याचा करंटेपणा अजूनही येथे सुरूच आहे. त्यांच्या जोखडातून गोव्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या सर्वस्वाचा होम केला व सालाझारशाहीचे फटके सहन केले. या पार्श्वभूमीवर,गोवा विद्यापीठातील पोर्तुगीज भाषा विभाग व "इन्स्टीटुटो कामोइस' यांच्या संयुक्त विद्यमाने पस्तीसाव्या पोर्तुगीज एप्रिलक्रांतीचा वर्धापनदिन महोत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यातील स्वातंत्रसैनिक अक्षरशः चवताळले आहेत.
२४ ते २६ एप्रिल असे तीन दिवस हा महोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात माहितीपट, चित्रपट व व्याख्यानाचा समावेश आहे. त्यामुळे स्वातंत्रसैनिकांनी या महोत्सवाला तीव्र हरकत घेतली आहे. या महोत्सवाचे गोव्यासाठी कोणतेही महत्त्व नसताना पोर्तुगीजांचे गोडवे गाणारा हा महोत्सव विद्यापीठाच्या सहकार्याने साजरा करण्यामागील प्रयोजन काय, असा खडा सवाल स्वातंत्र्यसैनिकांनी केला आहे.याबाबत विद्यापीठाला खडसावून जाब विचारण्याचा निर्धार ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक नागेश करमली यांनी केला आहे.
गोवा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमाला हजर राहणे उचित न समजणारे तथाकथित पोर्तुगिजधार्जीणे लोक अशा महोत्सवात मात्र उजळ माथ्याने मिरवतात.पोर्तुगिजांनी गोमंतकीयांवर कसे भयानक अत्याचार केले व येथील लोकांचा कसा छळ केला याची जाणीव केवळ स्वातंत्रसैनिकांना व गोव्याचा मुक्तीलढा इतिहास माहीत असणाऱ्यांना कळेल.गोव्यात राहून अजूनही पोर्तुगिजांचे समर्थन करणारी पिढी इथे आहे व या पिढीला सरकारकडून सहकार्य मिळणे म्हणजे स्वातंत्रसैनिकांच्या त्यागावर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचेही श्री.करमली म्हणाले. मुळात एप्रिल क्रांतीमुळे पोर्तुगालात हुकूमशाहीचा अस्त होऊन लोकशाही प्रस्थापित झाली. सालाझारशाहीचा अस्त याच क्रांतीमुळे झाला.
पोर्तुगालमध्ये झालेल्या या क्रांतीचा वर्धापनदिन गोव्यात साजरा का म्हणून करावा व या महोत्सव साजरा करणाच्या कार्यक्रमांत गोवा विद्यापीठाने आपले सहकार्य का म्हणून द्यावे,असा सवाल यावेळी श्री.करमली यांनी केला.गोवा विद्यापीठाकडून आपले राष्ट्रीयदिन किती प्रमाणात साजरे केले जातात, याचा हिशेब द्यावा,असाही टोला त्यांनी यावेळी हाणला.राज्यातील पोर्तुगिजधार्जीण्या संस्थांकडून हे कार्यक्रम साजरे करण्यास कोणतीही हरकत घेण्याचे कारण नाही परंतु सरकारने त्यात सहभागी व्हावे हे अत्यंत आक्षेपार्ह असून हा स्वातंत्रसैनिकांचा व पर्यायाने स्वाभिमानी गोमंतकीयांचा अपमान आहे,असेही श्री.करमली म्हणाले.
देशात ब्रिटिश राणीचा वाढदिवस साजरा केला जातो का, फ्रेंच क्रांतीचे गोडवे भारतात गायले जातात का,असे एकामागोमाग एक सवाल करून श्री.करमली यांनी मग गोव्यातच पोर्तुगिजांचा उदोउदो का केला जातो,असा बिनतोड सवाल विचारला.ही क्रांती लिस्बन येथे २५ एप्रिल १९७४ साली झाली होती. यासंदर्भात काही पत्रकारांनी विद्यापीठ सूत्रांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी यात पोर्तुगीज उदात्तीकरणाचा भाग नसून पोर्तुगिजभाषा विभागाचा हा वार्षिक कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले.

No comments: