Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 25 April, 2009

बाये-सुर्ला केंद्रावर २७ रोजी फेरमतदान

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीसाठी काल २३ रोजी झालेल्या मतदानावेळी उत्तर गोव्यातील साखळी या नव्या मतदारसंघात बाये सुर्ला या १८ क्रमांकाच्या मतदानकेंद्रावरील मतदानयंत्रात बिघाड झाल्याने या मतदानकेंद्रावर फेरमतदान घेण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम ५८(२) यानुसार हे फेरमतदान येत्या २७ एप्रिल रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होईल. गोव्यात एखाद्या मतदानकेंद्रावर तांत्रिक किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव फेरमतदान घेण्याची ही पहिलीच घटना आहे.
याप्रकरणी राज्य मुख्य निवडणूक अधिकारी अजित श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार साखळी मतदारसंघातील १८ क्रमांकाच्या बाये सुर्ला मतदानकेंद्रावर मतदान झाल्यानंतर मतदानयंत्रावरील बेरीज व प्रत्यक्षात निवडणूक अधिकाऱ्यांकडे असलेली आकडेवारी यात मोठ्या प्रमाणात तफावत जाणवली. या मतदान केंद्रावर एकूण ८१० मतदारांची नोंद आहे. मतदानयंत्राव्दारे मतदान केले जात असले तरी प्रत्यक्षात प्रत्येक मतदानकेंद्रावर एकूण मतदान किती झाले याची नोंद निवडणूक अधिकाऱ्यांकडेही असते. मतदान संपल्यानंतर मतदानयंत्राला सील ठोकताना प्रत्यक्ष निवडणूक अधिकाऱ्यांकडील बेरीज मतदानयंत्रावरील बेरजेशी जुळवली जाते व नंतरच मतदानयंत्र सील केले जाते. सुर्ला येथील या मतदानकेंद्रावरील यंत्राव्दारे मात्र भलतेच आकडे मिळत असल्याने ही गोष्ट ताबडतोब मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या नजरेस आणून देण्यात आली. आज याप्रकरणी अभ्यास केल्यानंतर या मतदानकेंद्रावर फेरमतदान घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला.

No comments: