Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 19 April, 2009

बोगदेश्वर मंदिर पाडण्याच्या नोटिशीमुळे वास्कोत तणाव

वास्को, दि. १८ (प्रतिनिधी)- येथील बोगदा (भरत लाइनजवळ)गेल्या कित्येक वर्षांपासून असलेल्या श्री बोगदेश्वर देवस्थानच्या नूतनीकरणास आक्षेप घेत एमपीटीने बांधकाम पाडण्याची नोटिस जारी केल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. उद्या रविवारपासून या देवस्थानचा उत्सव सुरू होत असून एमपीटीतर्फे सोमवारी कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेता येथील स्थिती चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मंदिराशिवाय येथील काही घरांनाही नोटिस जारी करण्यात आली आहे.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार १९३४ पासून येथे असलेल्या श्री बोगदेश्वर देवस्थानच्या समितीने गेल्या १५-२० वर्षांपूर्वी मंदिराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले होते. परंतु, आर्थिक समस्या निर्माण झाल्याने ते काम तात्पुरते थांबवण्यात आले होते. आता निधी उपलब्ध झाल्याने नूतनीकरण पुन्हा हाती घेण्यात आले असून रविवारपासून उत्सवही सुरू होणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात "वाढावळ' होणार आहे. बोगदा भागाचा "राखणकार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराचे बांधकाम पाडण्याची नोटिस देण्यात आल्याने स्थानिक चवताळले आहेत. आज संध्याकाळी देवस्थान समितीने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी देवळात बैठक आयोजित केली होती. यावेळी अखिल गोवा मंदिर सुरक्षा समितीचे राजेंद्र वेलिंगकर, देवळाच्या समितीचे अध्यक्ष केशव खवणेकर, उपाध्यक्ष संजय सातार्डेकर तसेच शेकडोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.
एमपीटीच्या कृतीचा जोरदार निषेध करताना देवळाला अजिबात हात लावू दिला जाणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. एमपीटीने सध्या या ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा जवान तैनात केले असून उत्सवानिमित्त साफसफाई करण्यासाठी गेलेल्या समितीच्या सदस्यांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले.
या मंदिराच्या समितीची नोंदणी झालेली असून त्यांच्यापाशी आवश्यक कागदपत्रेही आहेत. रखडलेले नूतनीकरणाचे काम आता पुन्हा हाती घेण्यात आले असता त्यावर आक्षेप घेणारी नोटिस जारी करण्यात आली आहे. यामुळे येथे संतापाची लाट उसळली असून मंदिर सुरक्षा समितीचा स्थानिकांना पूर्णपणे पाठिंबा असेल, असे राजेंद्र वेलिंगकर यांनी गोवादूतशी बोलताना सांगितले. देवस्थानला अजिबात धक्का लागू दिला जाणार नाही, गरज पडल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हा प्रकार म्हणजे हिंदुत्वावर हल्लाच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. बजरंग दलाचे जयेश नाईक यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, या घटनेचे वास्को शहराच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटले आहे.

No comments: