Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 24 April, 2009

दोन निवडणूक अधिकाऱ्यांचा ओरिसात उष्माघातामुळे मृत्यू

भुवनेश्वर, दि. २३ - ओरिसामध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू असताना उष्माघातामुळे दोन वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला तर अन्य दोन अधिकारी आजारी पडल्याचे वृत्त आहे.
मयूरभंज आणि किओंझार जिल्ह्यात अनुक्रमे पवित्र मोहन मुदुली आणि सोमनाथ मोहंती या अधिकाऱ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. यापैकी मोहंती यांचा काल रात्रीच मृत्यू झाल्याचे समजते. मुदुली यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मयूरभंजचे जिल्हाधिकारी सुरेेश वशिष्ठ यांनी सांगितले. या दोन अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे ओरिसात उष्माघातामुळे दगावणाऱ्यांची संख्या ३० वर पोहोचली आहे.
अन्य दोन अधिकारी आजारी झाल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पंतप्रधानांचे सपत्नीक मतदान
गुवाहाटी, दि.२३ ः पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांनी आज गुवाहाटी संसदीय क्षेत्रात लोकसभेसाठी मतदान केले.
सकाळी ११ वाजताच्या सुमारास पंतप्रधान आपल्या पत्नीसह गोपीनाथ बोरदोलई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथून ते हेलिकॉप्टरने खानपारासाठी रवाना झाले. कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांनी दिसपूर येथील राजकीय उच्च विद्यालयात मतदान केले. आसाममधून राज्यसभेचे सदस्य असणाऱ्या मनमोहन सिंग यांची मतदारसंख्या ७२६ आणि त्यांच्या पत्नीची मतदारसंख्या ७२७ होती. मतदान केल्यानंतर ते पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले. यापूर्वी त्यांनी २००४ आणि २००६ च्या निवडणुकीत मात्र आसाममध्ये येऊन मतदान केले नव्हते.

No comments: