Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 22 April, 2009

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवू भाजपचा व्यापक आराखडा घोषित

बंगळूर, दि. २१ : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत पायाभूत सुविधांसंबंधीचे पक्षाचे व्यापक धोरण जाहीर केले. एक शक्तिशाली आणि प्रगत देश बनविण्याचे उद्दिष्ट ठेवून भाजपने हा आराखडा जाहीर केला आहे. २१ वे शतक हे भारताचे शतक ठरावे यासाठी जागतिक दर्जाच्या भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा पुरविण्याचा उद्देश यामागे आहे, असे यावेळी अडवाणी यांनी जाहीर केले.
वाजपेयी यांच्या राजवटीत राष्ट्रीय महामार्ग योजना व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यासारख्या भव्यदिव्य योजना भाजपने मार्गी लावून या देशाचा कायापालट करण्याचे स्वप्न पाहिले होते. अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता हा नवा आराखडा जाहीर करण्यात येत असल्याचे अडवाणी यांनी सांगितले. देशाच्या पहिल्या ५० वर्षात दरवर्षी ११ किलोमीटर या सरासरीने महामार्गाचे काम चालले होते. १९९८ ते २००४ या भाजपप्रणीत रालोआ सरकारच्या राजवटीत हा दर ११ किलोमीटर प्रतिदिन असा झाला. सध्या संपुआच्या कारकिर्दीत दिवसाला ५ किलोमीटर अशी घसरण झाली आहे. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यास दरदिवशी २० किलोमीटर असे महामार्गाचे काम सुरू ठेवू, अशी ग्वाही या नव्या आराखड्यात देण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे कॉंग्रेसचे राज्य असूनही पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले. सुशासन, विकास आणि सुरक्षा या त्रिसूत्रीवर भाजपप्रणीत रालोआ सरकार सत्तेवर येईल, असे आश्वासन अडवाणी यांनी दिले. पायाभूत सुविधांसाठी ८० टक्के सार्वजनिक गुंतवणूक हवी, असे भाजपचे मत आहे. देशाच्या विकासात खाजगी क्षेत्राच्या सहभागाचीही गरज आहे, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांच्या समन्वयातून देशात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याची योजना भाजपजवळ आहे, असे अडवाणी यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक हाताला काम, प्रत्येक शेतीला पाणी तसेच पिण्याचे पाणी त्याचप्रमाणे वीजपुरवठा करताना प्रत्येक घर व उद्योग यांना २४ तास पुरवठा केला जाईल, यासाठी भाजपने यासंबंधीचा आराखडाच आज जाहीर केला.१०० दिवसांत ही योजना मार्गी लावू अशी घोषणा करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक शहर व गावात पक्के रस्ते बांधण्याची योजना आहे. २०१४ पर्यंत प्रधानमंत्री सडक योजना पूर्ण करण्यात येणार आहे. रेल्वे, बंदरे, जहाजबांधणी,नागरी विमानवाहतूक,दूरदळणवळण, माहिती तंत्रज्ञान,ग्रामीण व कृषी पायाभूत सुविधा आदींबाबत तपशीलवार आराखडा भाजपने तयार केला असून रालोआ सरकार सत्तेवर आल्यास त्याची अंमलबजावणी युद्धस्तरावर केली जाणार आहे, अशी ग्वाही अडवाणी यांनी यावेळी दिली.

No comments: