Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 21 April, 2009

हिंमत असेल तर राजीनामे द्याच

चर्चिल बंधूंना मिकी यांचे आव्हान

बाणावलीत रंगला राजकीय नाट्याचा दुसरा अंक

मडगाव, दि. २० (प्रतिनिधी) - हिंमत असेल तर चर्चिल व ज्योकिम या आलेमाव बंधूंनी आमदारकीचे राजीनामे द्यावेत. त्यांच्याशिवायही आम्ही सरकार चालवू शकतो, असे जोरदार आव्हान देऊन पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी आज बाणावली येथील जाहीर सभेत चर्चिल बंधू विरुद्ध कॉंग्रेस यांच्यातील वादात आणखी तेल ओतण्याचेच काम केले आहे. या कलगीतुऱ्यामुळे दक्षिण गोव्यातील कॉंग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांची अवस्था कमालीची बिकट झाली आहे.
काल मांडोप नावेली येथे आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत चर्चिल व ज्योकिम यांनी अपात्रता प्रकरणावरून आकांडतांडव केले होते. त्याला आलेमाव बंधूंचे परंपरागत प्रतिस्पर्धी पाशेको यांनी त्याच भाषेत उत्तर दिले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री दिगंबर कामत व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्या उपस्थितीत मिकींनी हे आव्हान दिल्याने उभय नेते स्तंभित झाले.
आपल्या मंत्रिमंडळांतील व आपल्याच पक्षाच्या दोघा मंत्र्यांवर मित्रपक्षाचा मंत्री जाहीर टीका करताना ती मुकाट्याने ऐकण्याखेरीज त्यांच्याकडे पर्यायच उरला नाही. काल याच भाषेत चर्चिल व ज्योकिम यांनी मिकी व पर्यायाने गोव्यातील स्थानिक पक्षनेत्यांना जोरदार आव्हान दिले होते. तेव्हादेखील मुख्यमंत्री कामत व प्रदेशाध्यक्ष शिरोडकर यांना मौन पाळून ती टीका ऐकावी लागली होती.
बाणावली या मिकी यांच्या मतदारसंघातील गावात आयोजित या सभेला चांगली उपस्थिती होती व त्यात प्रामुख्याने मिकींचे कार्यकर्ते व समर्थक होते हे मिकींच्या वाक्यावाक्याला पडणाऱ्या टाळ्यांवरून दिसून येत होते. काल असेच वातावरण मांडोप सभेत होते. चर्चिल बंधूंनी सरकार पाडण्याबाबत दिलेले आव्हान आपण स्वीकारत असल्याचे मिकी यांनी जाहीर केले.
चर्चिल बंधूंनी उगाच वल्गना करू नयेत. भाजप सरकारही आपणच घडवले व पाडले आणि नंतर कॉंग्रेस सरकारही आपणच घडवले असा दावा करताना त्यामुळेच या लोकांना मंत्रिपदें मिळाली. आता हिंमत असेल तर सरकार पाडूनच दाखवा. सर्वांना घरी बसविण्याची वल्गना करणाऱ्या या चर्चिल बंधूंना अपात्र ठरवून घरी बसवल्यानंतरच आपण नेमको कोण आहोत हे त्यांना त्यांना कळून चुकेल, असे मिकी म्हणाले.
या सभेत मुख्यमंत्री, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष व कॉंग्रेस उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांचीही भाषणे झाली. कालच्या मांडोप नावेली येथील व आजच्या बाणावली सभेतील वाक्युध्दाचा अन्य मतदारसंघांतील कॉंग्रेस मतदानावर तर परिणाम होणार नाही ना या चिंतेने कॉंग्रेस नेत्यांचे चेहरे काळवंडल्याचे चित्र दिसून आले.
मांडोप नावेली सभेचे ठळक वृत्त आज सर्वच दैनिकांनी प्रसिध्द केल्यानंतर, कॉंग्रेस नेते पक्षांत आलबेल असल्याचा जो देखावा करत होते त्याचे पुरते वस्त्रहरण झाले. परिणामी सुभाष शिरोडकर व सार्दिन यांना घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन कालच्या सभेबाबत स्पष्टीकरण करावे लागले. तथापि, बुडत्याचा पाय खोलात या उक्तीनुसार ते आणखीनच अडचणीत आले.

No comments: