Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 24 April, 2009

देशभरात दुसऱ्या टप्प्यात सरासरी ५५ टक्के मतदान

नवी दिल्ली, दि. २३ - पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या तुलनेत देशात आज झालेल्या लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान समाधानकारक झाले असल्याची माहिती उपनिवडणूक आयुक्त बालकृष्णन यांनी आज येथे दिली. हिंसाचाराच्या तुरळक घटना वगळता देशात सर्वत्र अतिशय शांततेत आणि सुरळीत मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आले. देशभरात आज सरासरी ५५ टक्के मतदान झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. १२ राज्य व केंद्र शासीत प्रदेशातील १४० लोकसभा मतदार संघांमध्ये आज दुसऱ्या टप्प्यात मतदान घेण्यात आले. झारखंड आणि बिहारमधील नक्षलवादी हल्ल्याच्या घटनामुळे या दुसऱ्या टप्प्यातील मतदानालाही हिंसाचाराचे गालबोट लागलेच.
१६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळी नक्षलवादी हल्ल्यामध्ये बिहार, झारखंड आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये १८ जण मृत्युमुखी पडले होते. यात ५ मतदान अधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले.
राहुल गांधी यांनी गांधी घराण्याचा परंपरागत मतदार संघ असलेल्या उत्तर प्रदेशच्या अमेठीमधून पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शरद पवार यांनी महाराष्ट्रातील आपला बारामती मतदार संघ मुलगी सुप्रिया सुर्वेसाठी सोडून स्वत: माढा मतदार संघाची निवड केली आहे. सुषमा स्वराज मध्य प्रदेशातील विदिशामधून तर रामविलास पासवान बिहारच्या हाजीपूर मतदार संघातून उभे आहेत.
तसेच केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री कमल नाथ हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून आपले भाग्य आजमावीत आहेत. याशिवाय अखिलेश प्रसाद सिंग (पूर्व चम्पारण, बिहार), रघुवंश प्रसाद सिंग (वैशाली, बिहार) आणि रघुनाथ झा (वाल्मीकिनगर, बिहार) हे नावाजलेले उमेदवारही दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत एकूण २,०४१ उमेदवार निवडणूक लढवीत असून यात १२१ महिला उमेदवारांचा समावेश आहे. राज्यांचा विचार करता दुसऱ्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील २०, आसाममधील ११, बिहारमधील १३, गोवामधील २, जम्मू-काश्मीरमधील १, कर्नाटकातील १७, मध्य प्रदेशातील १३, महाराष्ट्रातील २५, ओरिसातील ११, त्रिपुरातील २, उत्तर प्रदेशातील १७ आणि झारखंडमधील ८ लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे.

No comments: